मुंबई(प्रतिनिधी): सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर 'आंतरराष्ट्रीय तटीय स्वच्छता दिवस' आयोजित केला जातो. भारत सरकारच्या वतीने यंदा दि. ३ जुलै ते दि. १७ सेप्टेंबर दरम्यान किनारा स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ७५ दिवस चालणाऱ्या मोहिमेस रविवार दि. ०३ जुलै पासून सुरुवात झाली.
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या 'आझादी का अम्रित महोत्सव' उत्सवाचा एक भाग म्हणून, दि. १७ सप्टेंबर रोजी देशाच्या संपूर्ण किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. इको मित्रम्' या ॲपद्वारे स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांना या मोहिमेसाठी नोंदणी करता येईल लोकांमध्ये समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसेच किनारपट्टीवरील कचरा गोळा करून त्याचे दस्तऐवजीकरण करण्यहेतू आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस साजरा केला जातो.
किनारपट्टी स्वच्छता अभियानांतर्गत 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर' ही स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. या उपक्रमात देशभरातील पर्यावरण तथा सामाजिक क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांनीही जमेल तसे योगदान द्यावे, असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी प्लॅस्टिक, काच, धातू, सॅनिटरी कचरा, कपडे इत्यादींनी युक्त हजारो टन कचरा महासागरात पोहोचतो. आणि महासागरात जाणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी प्लॅस्टिकचा सरासरी ६० टक्के वाटा असतो. अलिकडे पर्यटनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर किनारपट्ट्यांवर कचरा साचत आहे. सागरी जीवांची अन्नसाखळी आणि सागरी विश्वाला मानवी हस्तक्षेपाचा मोठा फटका बसत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारे माहिती संकलनाचे काम सुरू आहे.
या मोहिमेत पृथ्वी विज्ञान मंत्रालय , पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय , राष्ट्रीय सेवा योजना, भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , सीमा जागरण मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पर्यावरण संरक्षण उपक्रम यासह इतर सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांचाही सहभाग असेल. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रामुख्याने सागरी कचरा कमी करणे, प्लास्टिकचा कमीत कमी वापर, उगमस्थानी पृथ:करण आणि कचरा व्यवस्थापन याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भौतिक आणि वास्तविक मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग अपेक्षित आहे. 'इको मित्रम्' या ॲपचा उपयोग करता येईल. या ॲपद्वारे आपल्या आवाक्यातील समुद्र किनारपट्टीवर सेवा देण्यासाठी स्वेच्छेने नोंदणी करता येणार आहे. प्लास्टिकसारख्या घातक वस्तूंना दूर ठेवून निसर्गाची शुद्धता कशी राखू शकतो, याबाबतची माहितीही या ॲपद्वारे मिळणार आहे.