नेमका उशीर झाला की केला?

    05-Jul-2022   
Total Views |

floortest
 
 
 
बहुमत चाचणीत फडणवीस-शिंदे सरकारने विजय प्राप्त केला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ आणि विरोधात ९९ मते पडली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या पारड्यात १६४ तर राजन साळवी यांना १०७ मतं पडली. परंतु, २४ तासातच महाविकासआघाडीचा १०७ चा आकडा ९९वर घसरला. आघाडीला साधी शंभरीही गाठता आली नाही. मात्र, त्याहीपेक्षा बहुमत चाचणीला दांडी मारलेल्या आमदारांनी महाविकास आघाडीची उरलीसुरली इज्जतही धुळीस मिळाली.
 
 
 बहुमत चाचणी शिरगणतीने घेण्यात आली. मात्र, या प्रक्रियेसाठी सभागृहाचे सर्व दरवाजे शिरगणती होईपर्यंत बंद केले जातात. परंतु, महाविकास आघाडीचे काही आमदार विधानभवनात उशिरा पोहोचल्याने त्यांना बहुमत चाचणीत भाग घेता आला नाही. बहुमत चाचणी जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या बाहेर राहून मदत करणार्‍या अदृश्य हातांचे आभार मानले. त्यामुळे या दांडीबहाद्दर तथा वेळेत न पोहोचणार्‍या आमदारांना विधानभवनात पोहोचण्यास खरोखर उशीर झाला की जाणूनबुजून उशीर केला, असा यक्ष प्रश्न उभा राहतो.
 
 
काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख, जितेश अंतापुरकर, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी, माधवराव जवळगावकर यांचे मतदान हुकले. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, आण्णा बनसोडे, निलेश लंके, दत्तात्रय भरणे, दिलीप मोहिते यांनाही उशीर झाला. भाजपच्या मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप आजारी असल्याने ते पोहोचू शकले नाहीत. काँग्रेसचे सर्वाधिक आमदार गैरहजर होते, त्यामुळे ते अदृश्य हात काँग्रेसचेच होते का असाही प्रश्न निर्माण होण्यास वाव आहे. अजितदादा वेळेचे पक्के आहेत, मात्र त्यांच्या आमदारांना वेळेचे महत्त्व कळू नये? नेहमी असा प्रकार होत नाही. मात्र, नेमक्या बहुमत चाचणीलाच हे सर्व उशिरा का पोहोचले. आदित्य ठाकरे तर अगदी शेवटच्या मिनिटाला सभागृहात पोहोचले. त्यामुळे शिवसेनेने कितीही ओरडून सांगितले की, काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत आहेत. परंतु, प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. एकाचवेळी इतक्या आमदारांना उशीर कसा झाला की नेमका उशीर केला गेला, असा प्रश्न पडणे साहजिक आहे.
 
 
 
जाधवांची तडफड कशासाठी?
 
 
फडणवीस-शिंदे सरकारने सोमवारी विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. ठरावाच्या बाजूने तब्बल १६४ तर विरोधात ९९ मते पडली. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनपर प्रस्ताव पार पडला. त्यावर शिवसेनेकडून भास्कर जाधवांनी भूमिका मांडली. परंतु, जाधवांच्या या भाषणातून भूमिका कमी आणि सत्ता गेल्यानंतरचे दुःख आणि तडफड जास्त दिसत होती. एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे खरे वारसदार आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे, अशा शब्दांत जाधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. जाधवांच्या भात्यातून असे बाण बाहेर पडत होते, जसे की भास्कर जाधव हे पार पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून तळागाळातील शिवसैनिकांसोबत राहून त्यांनी मोठा लढा दिला आहे. शिंदे गटाच्या आमदारांना एकीकडे लक्ष्य करत असताना दुसरीकडे परत या म्हणून जाधवांचा केविलवाणा प्रयत्नही सभागृहाने पाहिला. विशेष म्हणजे, भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ शिवसेना उभी करण्यासाठी झटणार्‍या शिवसैनिक आमदारांना हिंदुत्वाच्या आणि तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगणे यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो. अनेकदा जाधवांनी शिवसेनेत जाऊनही आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून जाहीरपणे खदखद व्यक्त केली आहे.
 
 
रक्तपात, रक्तबंबाळ, शिवसेना संपेल यांसह अगदी रामायण, महाभारताचा उल्लेख जाधवांनी केला, त्याला सुधीर मुनगंटीवारांनी जोरदार प्रत्युत्तर देत सगळा कच्चाचिठ्ठाच बाहेर काढला. जाधव एक प्रामाणिक शिवसैनिक असल्याचा आणि सभ्यपणाचा कितीही आव आणत असले तरीही थातूरमातूर कारणासाठी त्यांनी भाजपच्या एक-दोन नव्हे, तर तब्बल १२ आमदारांना निलंबित केले होते. आता जाधव सूडाची भावना न ठेवण्याच्या गमजा मारत असताना त्यांनी सुड उगवण्यासाठी केलेली निलंबनाची कारवाई अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली होती. शिवसेनेची उरलीसुरली इज्जत वाचविण्यासाठी सेनेला राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या जाधवांची मदत घ्यावी लागली. शिंदे गटातील कट्टर शिवसैनिकांवर टीका करायला साधा कट्टर शिवसैनिक आमदारही सेनेकडे उरला नाही, यापेक्षा वाईट परिस्थिती काय असू शकते. गुलाबराव पाटलांनी वेगळे का व्हावे लागले, याची सगळी उत्तरे दिली. त्यावर वेळेवर कार्यवाही झाली असती तर भास्करराव तुमच्यावर अशी तडफड करण्याची वेळ कदाचित आलीच नसती...
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.