एका वर्षात आरेतील मेट्रो कारशेड बांधून पूर्ण होईल!

देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

    04-Jul-2022
Total Views |

Mumbai-Metro
 
 
मुंबई : “गोरेगावच्या आरे कॉलनी येथील ‘मेट्रो ३’च्या कारशेडचे उर्वरित काम सुरू झाले की, वर्षभरात कारशेड बांधून पूर्ण होऊ शकते,” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी आरेमध्ये मेट्रोची कारशेड उभारू नये म्हणून आंदोलन करणार्‍यांना ‘छद्म पर्यावरणवादी’ असे संबोधत फडणवीस म्हणाले की, “या भागात आणखी एकही झाड कापले जाणार नसून आरेतील मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करणार्‍या काही लोकांना तेथील वस्तुस्थिती माहीत नाही आणि काही आंदोलनकर्ते ‘छद्म पर्यावरणवादी’ म्हणून ‘स्पॉन्सर्ड’ असण्याची शक्यता आहे. मात्र, सर्व पर्यावरणवाद्यांचा आदर राखून आवश्यक ती चर्चा त्यांच्याशी करणार आहे,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
 
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, “पर्यावरणवाद्यांचा मी सन्मान करतो. आपले म्हणणे मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. हरित लवादा आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानेही परवानगी दिल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडचा प्रकल्प सुरू झाला. तिथे झाडे कापलेली असली, तरी कारशेडचे २५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. अशा परिस्थितीत पुन्हा या कामासाठी झाडे कापण्याची आवश्यकता नाही. त्याठिकाणी काम सुरु झाले, तर पुढच्या एका वर्षात हे काम पूर्ण होऊन ‘मेट्रो-३’ सुरू होऊ शकते.” तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत फडणवीस म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, या भागातील सगळी झाडे मिळून त्यांच्या अवघ्या आयुष्यात जेवढा कार्बन शोषून घेतील, ते काम ही मेट्रो ८० दिवसांत करेल. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने या कारशेडला आरेमध्ये परवानगी दिली होती.
 
 
मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, कारशेडसाठी आधीच झाडे कापलेली आहेत. आता पुन्हा या कामासाठी झाडे कापण्याची आवश्यकता नाही.” तसेच “मेट्रो रेल्वे हा मुंबईचा अधिकार आहे. मेट्रो नसल्याने मुंबई प्रदूषणामुळे रोज होरपळत आहे. हे पाप आम्ही चालू देणार नाही,” असेही फडणवीसांनी यावेळी बोलताना विशेषत्वाने अधोरेखित केले.