प्रोजेक्ट टायगर अंतर्गत महाराष्ट्रात सुरू झालेला पहिला प्रकल्प म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. मेळघाट हे वाघांचे खरं जंगल, म्हणून पुन्हा नावरुपास येत आहे. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात विस्तीर्ण, निबिड अन दऱ्या खोऱ्यानी युक्त जंगल म्हणजे मेळघाट. याच मेळघाट विषयी माहिती देणारा हा लेख...
महाराष्ट्रात पूर्वी वाघ म्हटलं की, आठवायचा तो मेळघाट. कारण, तो आपल्या राज्यातील पहिला आणि एकमेव व्याघ्रप्रकल्प होता. आज महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यापैकी पाच हे विदर्भात आहेत, या सर्वांपैकी सर्वात आधीचा व आकारमानाने सर्वात मोठाअसा व्याघ्रप्रकल्प म्हणजे मेळघाट. मेळघाट म्हटलं की, काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा आठवायचा तो एकच शब्द, तो म्हणजे कुपोषण. मेळघाटातील वनवासी ‘कोरकूं’मध्ये होणार्या बालमृत्यूंमुळे मेळघाट दरवर्षी महाराष्ट्रभर चर्चेत असायचा. अलीकडे मात्र कुपोषणाचा प्रश्न मागे पडून मेळघाट हे वाघांचे खरं जंगल, म्हणून पुन्हा नावरुपास येत आहे. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात विस्तीर्ण, निबीड अन् दर्या-खोर्यांनी युक्त जंगल म्हणजे मेळघाट.
सातपुड्यातील सर्वात उंच ठिकाण म्हणजे वैराट. हे ठिकाण चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असून पूर्वीच्या वैराट गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर हा भाग आता वाघांचा संवेदनशील अधिवास झालेला आहे. या उंच ठिकाणाहून भोवताल व दूरदूरपर्यंत पसरलेले उंचच उंच डोंगर अन् खोल-खोल दर्या दृष्टिपथात येतात. या दर्या-खोर्यांतील जंगलातून अनेक लहान-मोठे नाले व नद्या उगम पावतात. यामध्ये कुठे सागबहुल जंगल, तर कुठे मिश्र वनस्पतींनी भरलेले शुष्क पानगळीचे जंगल, उंच ठिकाणी कुठे सदाहरित जंगलांचे पट्टे असे विविधता असलेली जंगले असल्यामुळे या जंगलात वाघांपासून ते सागापर्यंत जैवविविधता आढळून येते.
नष्ट होत चाललेल्या वाघांना वाचविण्यासाठी 1972 साली आपल्या देशात सुरू झालेल्या व्याघ्र प्रकल्प योजनेमध्ये देशातील समाविष्ट केलेल्या पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाटच्या जंगलाचा समावेश होता. त्यावेळी मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व आकाराने सर्वात मोठा असा व्याघ्र प्रकल्प म्हणून प्रसिद्ध होता. 22 फेब्रुवारी, 1973 ला या जंगलात व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाल्यानंतर, सुरुवातीच्या काळात मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान व मेळघाट अभयारण्य इतक्याच भागाचा समावेश होता. पुढे वाघांचा संचार व संवर्धनाची गरज पाहता या क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होत गेली. सुमारे 1600 चौरस किमींचा हा व्याघ्र प्रकल्प त्यावेळी प्रसिद्ध होता, तो त्याच्या प्रचंड आकारमानासाठी. ‘कोअर’ आणि ‘बफर’ म्हणजेच गाभा क्षेत्र व बाह्य संरक्षित क्षेत्र मिळून आज हा व्याघ्र प्रकल्प सुमारे 2,800 चौरस किमी इतका विस्तारला असून आज मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा, तर देशातील चौथ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प म्हणून प्रसिद्ध आहे. मेळघाट हा आज सुमारे 50 ते 60 वाघांचे निवासस्थान आहे.
सातपुडा पर्वतरांगेत वसलेले मेळघाटचे जंगल हे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. उंचच उंच पहाडी अन् दर्या-खोर्यांच्या प्रदेशात असलेले घनदाट निबीड जंगल ही मेळघाटची खरी ओळख. जवळपास 3,500 चौ. किमींचा प्रचंड विस्तार असलेले हे जंगल विदर्भातील अमरावती, अकोला व शेवटी बुलढाणा या तीन जिल्ह्यांत पसरलेले असल्यामुळे या जंगलातील खूप मोठा भाग हा अतिशय दुर्गम असा आहे. येथील वन्यप्राण्यांसोबत मेळघाटचे स्थानिक रहिवासी असलेले कोरकू, गवळी, काही भागात गोंड, राठीया, बंजारा, निहाल व बलई या जमातींचे मेळघाटात वास्तव्य आहे. या दुर्गम प्रदेशाची ओळख म्हणजे एकूण लोकसंखेच्या 80 टक्के असलेले येथील स्थानिक वनवासी कोरकू; दुसरे म्हणजे येथील उच्च प्रतीचा साग व तिसरा अर्थातच वाघ म्हणजेच ढीळलरश्र, ढशरज्ञ, आणि ढळसशी हे तीन ‘टी’ या प्रदेशाची ओळख. उच्च प्रतीच्या सागासोबतच जैवविविधतेने नटलेल्या या जंगलात वाघांच्या संवर्धनाची संस्कृती जपणारा ‘कोरकू’ या जंगलाचा अविभाज्य घटक म्हणूनच जगत होता. म्हणूनच तीन ‘टी’साठी प्रसिद्ध असलेल मेळघाटच हे जंगल शुद्ध, नैसर्गिक आणि कठीण असा अधिवास असून, वाघांचं खरं जंगल म्हणून प्रसिद्ध आहे.
वळणदार रस्त्यांचा घाट आणि या घाटांचा जेथे मेळ होतो, तो म्हणजे मेळघाट. महाराष्ट्राच्या पूर्व भागातील पश्चिम विदर्भात असलेल्या अमरावती, अकोला अन् बुलढाणा जिल्ह्यात पसरलेले महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात संपन्न जंगल म्हणजे मेळघाट. यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सुमारे 361 चौ. किमींचे ‘गुगामल’ राष्ट्रीय उद्यान आणि त्या भोवतालचा संवेदनशील प्रदेश हे गाभा क्षेत्र असून त्याला जोडून भोवताल मेळघाट अभयारण्य, बहुपयोगी क्षेत्र, तसेच नरनाळा अभयारण्य, वान अभयारण्य, अंबाबरवा अभयारण्य आणि पूर्व व पश्चिम मेळघाट ‘बफर’ क्षेत्राचा समावेश आहे. या सर्व क्षेत्रांमिळून आज मेळघाट व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येणारे संरक्षित क्षेत्र सुमारे 2,800 चौ.किमींइतके विस्तीर्ण असून या बाहेरसुद्धा वन विभागाचे संरक्षित नसलेले राखीव जंगल असल्यामुळे वाघांना संचार करण्यासाठी आजही नैसर्गिक व विपुल असे क्षेत्र उपलब्ध असलेले हे एकमेव जंगल आहे.
_202207041157281296_H@@IGHT_1350_W@@IDTH_1800.JPG)
सातपुड्याच्या पर्वतरांगेतील मेळघाटचे जंगल मध्य भारतातील इतर व्याघ्र अधिवास क्षेत्रांना जोडणारा एक महत्त्वाचा संचार मार्ग (उेीीळवेी) आहे. पूर्व पश्चिम पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेतील मध्यभागात असलेल्या मेळघाटच्या पूर्वेकडे मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्प समाविष्ट असलेलेपेंचचे जंगल, उत्तरेकडे मध्य प्रदेशातील बैतुलव पचमढीचे जंगल व सातपुडा व्याघ्र प्रकल्प, तर पश्चिमेस खानदेशातील मुक्ताईनगर-वडोदाचे नुकतेच अभयारण्य घोषित झालेले जंगल व पुढे यावल अभयारण्य व मध्य प्रदेशातील खकनार बुर्हानपूरपर्यंतचे जंगल पसरलेले असल्यामुळे मध्य भारतातील वाघांच्या मुक्त संचारास उपयुक्त असा हा प्रदेश आहे. त्यामुळेच महत्त्वपूर्ण जनुकीय संचय (जीन पूल) साठी व अनुवांशिकता वाहक म्हणून मेळघाटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
भारतात असलेली राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प याअंतर्गत येणारी संरक्षित वने आज टिकून आहेत, ती वने व वन्यजीव कायद्यामुळेच हे सत्य नाकारता येणार नाही. ज्या वनांना संरक्षण नाही, ती वने गेल्या काही दशकांत झपाट्याने कमी झालीत किंवा नष्ट झालीत, हे सत्य आहे. यासाठी सातपुड्यातील अशा अनेक राखीव व संरक्षण नसलेल्या जंगलांचे अनेक उदाहरणे देता येतील. संरक्षित नसलेल्या जंगलांमध्ये वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे व काही ठिकाणी ती संपूर्ण नष्ट झाल्यामुळे व्याघसंचार मार्ग नष्ट होत आहेत. त्यामुळे वाघांना एका जंगलातून दुसर्या जंगलात जाताना मोकळ्या जागा, शेती, गावे आणि रस्ते अशा ठिकाणांहून प्रवास करावा लागतो. त्यामुळेच अलीकडे वाघ जंगलाबाहेर येण्याचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत असून त्यातून मानव वन्यजीव संघर्ष वाढतांना दिसत आहे. ज्या ठिकाणी संरक्षित जंगलाचे आकारमान कमी आहे व त्या जंगलाबाहेर संचार मार्ग (कॉरिडॉर) अस्तित्वात नाहीत, अशा ठिकाणी या संघर्षात फार मोठी वाढ झालेली दिसत आहे. मात्र, मेळघाट किंवा त्या भोवतालच्या जंगलात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना फारशा दिसत नाहीत, त्यामागे येथील जंगलाचा विस्तार व अजूनही काही प्रमाणात शिल्लक असलेले संचार मार्ग हे एक महत्त्वाचे कारण आहे.
‘ताडोबा’च्या बाहेरील जंगलात चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेला मानव वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मेळघाटचे हे उदाहरण महत्त्वाचे ठरते.‘ताडोबा’मध्ये वाघांची वाढती संख्या ही अतिशय महत्त्वपूर्ण उपलब्धी असली, तरीही वाढत्या संख्येतील नवीन वाघ आपल्या क्षेत्राच्या शोधात ‘ताडोबा’च्या ‘कोअर’ व ‘बफर’ क्षेत्राबाहेरील जंगलात येतात किंवा आपल्या क्षेत्राच्या शोधात मानवी वस्तीपर्यंत पोहोचतात आणि संघर्ष उद्भवतो. यावर उपाय म्हणून या क्षेत्रातील वाघांना पकडून जेथे वाघ कमी असून वाघांचे खाद्य असलेल्या वन्यप्राण्याची मुबलकता आहे, अशा क्षेत्रात आवश्यक ते बदल करून तेथील वाघांना मेळघाट किंवा इतर योग्य अशा जंगलात सोडण्याचा प्रयत्न वन विभागाकडून करण्यात येत असून हा प्रयोग जर यशस्वी झाला, तर भविष्यात मेळघाट अशा अनेक वाघांची जबाबदारी लीलया पेलू शकेल.
क्रमश:
-डॉ. जयंत वडतकर
(लेखक अमरावती जिल्हयाचे मानद वन्यजीव रक्षक आहेत.)
9822875773