मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातले आघाडी सरकार कोसळल्यापासून राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ सुरु आहे. सत्ता हातात असताना जनसामान्यांत कधी न वावरलेले ठाकरे पिता-पुत्र आता पाठींबा टिकवण्यासाठी घराबाहेर पडून लागलेत, लोकांमध्ये फिरू लागलेत. शिवसेनेवर आलेली वेळ पवारांमुळेच आल्याचा आरोप शिंदेगटातल्या नेत्यांकडून होत असतानाच शरद पवारांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.
२९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्या संदर्भातील एक पोस्ट पवारांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. यात 'वाघांचे संरक्षण व संवर्धन नैसर्गिक जैवसाखळीचे होईल रक्षण...' असा संदेश देण्यात आला आहे. मात्र यात वापरलेले छायाचित्र पाहता, 'हाताच्या पंज्यामध्ये काढलेला वाघ आणि त्या वाघाचे बोलके डोळे' सध्याची राजकीय परिस्थिती एका फोटोत सांगून जाते. त्यामुळे जागतिक व्याघ्र दिनाच्या दिवशीच पवारांनी अशी पोस्ट करणं यात काही राजकीय हेतू दडलाय का? असा प्रश्न सध्या उद्भवतो आहे.