राष्ट्रपतींचा अपमान!

    29-Jul-2022   
Total Views |

murmu
 
 
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. वनवासी आणि त्यातही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून मार्गक्रमण करत सर्वोच्चपदी विराजमान झालेली स्त्रीशक्ती म्हणजे द्रौपदी मुर्मू. पण, आजपर्यंत ‘याची मुलगी, त्याची पत्नी’ यांनाच सत्तेवर बसवत घराणेशाहीचा डंका पिटणार्‍या लोकांना या स्त्रीशक्तीचा महिमा कसा कळणार? त्यांना आवडणारच नाही की, एक महिला स्वकर्तृत्वावर स्वतःचे यशस्वी नेतृत्व निर्माण करते.
 
 
पंडित जवाहरलाल नेहरु यांची मुलगी म्हणून इंदिरा गांधी आणि त्यांची सून म्हणून सोनिया गांधी आणि त्यांची नात म्हणून प्रियंका गांधी यांची हाजीहाजी करणार्‍या चमच्यांना कसे कळणार की, प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका महिलेला आरक्षणाशिवाय साधे ग्रामपंचायत सदस्य बनणेही खूप कठीण असते. तिथे द्रौपदी या भारताच्या सर्वोच्चनागरिक झाल्या. त्यामुळेच अधीररंजन चौधरी यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीऐवजी ‘राष्ट्रपत्नी’ म्हंटले. आता ते आणि त्यांचे पक्ष सहकारी सारवासारव करत आहेत की म्हणे त्यांची व्याकरणाची चूक झाली.
 
 
ही चूक तेव्हाच होते ज्यावेळी समोरच्याचे मोठेपण स्वीकारण्याची मानसिकता नसते. ही अशी चूक तेव्हाच होते, जेव्हा माणसाला वाटते की, समोरच्या व्यक्तीने कायम शोषित वंचित राहावे. मात्र, ती व्यक्ती समस्त कुंपण पार करत, खूप मोठी होते तेव्हा! अधीररंजन चौधरीच नव्हे, तर समस्त काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्यांनीच द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल असेच काही ना काही उद्गार काढले आहेत. अधीर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर ‘संविधान हटावो’ म्हणत सदासर्वकाळ रडगाणे गाणार्‍यांना आक्षेप नव्हता आणि आक्षेप ‘मूलनिवासी’ वगैरे वगैरे नावाने बांगड्या फोडणार्‍यांचे काहीच मत नव्हते. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या म्हणून या सगळ्यांना इतके दुःख का व्हावे? द्रौपदी यांना अधीररंजन ‘राष्ट्रपत्नी’ म्हणाले, असे आता काँग्रेस म्हणते. पण, मग ‘पत्नी’ऐवजी ‘माता’ यांच्या तोंडून का आले नाही? आता म्हणे अधीर यांनी माफी मागितली. पण, माफी मागून राष्ट्रपतीपदी विराजमान असलेल्या द्रौपदी मुर्मू या स्त्रीशक्तीचा अपमान भरून येणार नाही. राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या महिलेचीसुद्धा हे लोक अशा प्रकारे प्रतिमा भंग करतात. ते सर्वसामान्य महिलांबाबत काय ध्येय धोरणे ठेवत असतील?
मनोरंजनात कुठे कमी नाही...
 
 
हात चालत नव्हते, पाय चालत नव्हते, अशावेळी तत्कालीन ‘बेस्ट सीएम’च्या मनात अत्यंत महत्त्वाचा ‘जिंकू किवा मरू’चा प्रश्न उद्भवला होता. जेव्हा त्यांनी या प्रश्नांची वाच्यता केली तेव्हा लाखो लोकांच्या मेलेल्या प्रतिभेला बहर आला. लोकांना काही म्हणजे काही कळतच नाही. अरे बरोबर आहे त्यांचे, समजा डास चावला, तर कसे खाजवणार?चेष्टा आहे का? गंभीर प्रश्न होता तो. पण, नाही काही नतद्रष्ट लोकांनी यावरही टीका केलीच की, कोरोना वाताहतीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता.
 
 
त्यावेळी सदान्कदा ‘मी कुटुंबप्रमुख आहे’ असे म्हणणार्‍या व्यक्तीला महाराष्ट्राची चिंता नव्हती, तर डास चावल्यावर खाजवण्याची चिंता होती. आपण आजाराने ग्रस्त असताना महाराष्ट्राचा कारभार कसा चालणार ही काळजी यांना का नव्हती? तर टिकाकारांनो जरा थांबा. ‘तुम क्या जानो मच्छर का काटना’(तूम क्या जानो एक चुटकी सिंदूर की किमत या न्यायाने...) ‘और तुम क्या जानो नाना पाटेकर’ काय म्हणालेत ते? (साला एक मच्छर आदमी को... जाऊ दे.) तर डास चावल्यावर कुठे खाजवावे, असा ‘टू बी ऑर नॉट टू बी’ प्रश्न पडलेल्या माणसाच्या बोलण्यावर विनोद करताना लोकांना काही वाटले नाही.  
असो.
 
 
ज्यावेळी मुलाखत सुरू होती, त्यावेळी मुलाखतीचे स्थान अंधारलेले होते. कदाचित काही दिवसांनी राष्ट्रवादीच्या अंधारेबाई आपल्या अविचारांचा अंधार घेऊन शिवसेना पक्षात येणार, याची ती पूर्वकल्पना देण्यासाठीची व्यवस्था असावी असेही काही लोक बोलतात. या मुलाखतीमध्ये कुणी नोंद घेतली का? की ज्यावेळी ‘संगणक तंत्रज्ञान’ हा शब्द उद्धव यांनी उद्गारला, त्यावेळी संजय राऊत लगेच म्हणाले की, “या तंत्रज्ञानामध्ये राजीव गांधी यांचे महत्त्वाचे योगदान होते.” दुसरे महाविकास आघाडीने कोरोना काळात चांगले काम केले, तरीही शिंदे गटातले आमदार कसे तरीही दुषणे देतात, हे सांगताना संजय राऊत मध्येच म्हणाले, “उत्तर प्रदेशात गंगा नदीत प्रेतं वाहिली. तशी प्रेतं महाराष्ट्रात वाहिली नाहीत याबद्दल शिंदे गटातील आमदारांना वाईट वाटत असावे.” या दोन घटनांवरून सुज्ञ समजतील की, उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीमध्ये कशाप्रकारे हस्तक्षेप झाला असेल आणि मतांतरण झाले असेल. मात्र, काहीही म्हणा मुलाखत तुफान गाजली. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात आणि राजकुमार राहुल तिकडे ‘हेराल्ड’मध्ये गुंतले, त्यामुळे महाराष्ट्रात मनोरंजनाचा दुष्काळ झाला होता.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.