उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत बाप काढणाऱ्या सुषमा अंधारे शिवसेनेत

    28-Jul-2022
Total Views | 688
 
susham
 
 
मुंबई : ईडी, निवडणूक आयोग यांसारख्या संविधानिक संस्थांना हाताशी धरून सगळे विरोधी आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करणारया भाजपला रोखण्यासाठी आणि संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी त्यांच्या समोर ताठ उभे राहू शकणाऱ्या उद्धव ठाकरेंना साथ दिली पाहिजे असा दावा करत शाहू- फुले - आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. चांगल्या काळात सगळे बरोबर असतात पण वाईट काळात आपलेच साथ द्यायला येतात अशा शब्दांत सुषमा अंधारेंची स्तुती करत उद्धव ठाकरेंनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. शिवसेनेच्या भाजपविरोधी लढ्याला आता बळ मिळेल असा दावा शिवसेनेकडून केला जातोय.
 
कोण आहेत सुषमा अंधारे ?
 
इतके दिवस हिंदू देवी - देवतांची येथेच्छ खिल्ली उडवणाऱ्या, खुद्द उद्धव ठाकरेंचा बाप काढणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेसची धडाडती तोफ, स्टार प्रचारक म्हणून गाजलेल्या सुषमाताई अंधारे यांना शिवसेना प्रवेशासाठी खुद्द शिवसेना नेतृत्वाने रेड कार्पेट अंथरले आहे. त्यांच्या रूपाने शिवसेनेला सभा गाजवणारी एक निडर महिला मिळाली आहे असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे, पण इतके दिवस ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून, आम्हीच हिंदुत्वाचे रक्षक म्हणून गावभर संगत फिरणाऱ्या शिवसेनेला याच हिंदूंच्या देवी- देवतांवर शिंतोडे उडवणारी महिला पक्ष सावरण्यासाठी पक्षात घ्यावी लागली यानेच शिवसेनेचा खोट्या, संधीसाधू हिंदुत्वाचा बुरखा फाटलाय.
 
कोल्हाटी समाजासारख्या भटक्या समाजातील एक मुलगी अनेक अडचणींना तोंड देत प्राध्यापिका बनते हा सुषमा यांचा प्रवास जरी स्पृहणीय असला तरी, राजकारणात राष्ट्रवादी पक्षाशी जवळीक केल्यानंतर त्यांनी हिंदू देवी - देवतांची, सण - उत्सवांची येथेच्छ खिल्ली उडवणे हाच आपला मुख्य कार्यक्रम केला. २००६ साली बुद्धधर्माचा दीक्षा घेतल्यावर शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामाही दिला पण राजकारणही त्यांना खुणावतच होते. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचे काम केले होते. या प्रचार सभांच्या वेळी जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती, याच सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंचा बाप काढला होता, आदित्य ठाकरेंवरही अश्लाघ्य भाषेत टीका केली होती.
  
आंबेडकर , शाहू यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या सुषमा यांनी नेहमीच हिंदू परंपरांची खिल्ली उडवली आहे. हिंदूंनी सातत्याने चुकीचा इतिहास मांडला, नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंवसेवक संघ यांनी देशाचे कसे नुकसान झाले आहे हेच सांगणे हा सुषमा यांचा मुख्य उद्योग होता. ज्या सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वावर, हिंदू धर्मावर टीका केली होती, बुद्ध धर्म आणि हिंदू धर्माची सातत्याने तुलना करत, हिंदू धर्म कसा वाईट आहे हेच सुषमा यांनी समाजमाध्यमांवर सांगितले आहे. याच सुषमा यांना निव्वळ राजकारण म्हणून हिंदुत्वाला तिलांजली देत शिवसेनेत प्रवेश देत शिवसेनेने आपले अंतरंग उघड केले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121