उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या 'या' पाच निर्णयामुळे हिंदू दुखावला!

    28-Jul-2022
Total Views |
y
 
 
 
 
 
उद्धव ठाकरे यांनी एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवत हिंदुत्वाशी फारकत घेतली असा त्यांच्यावर आरोप होतोय तर आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्याकाळात घेतलेला एखादा निर्णय दाखवा ज्यामुळे हिंदुत्व संकटात आले असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. पण ठाकरेंच्या दाव्यात खरंचं तथ्य आहे का? उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात हिंदू दुखावतील अशा कोणत्या घटना घडल्या कि नाही?
 
 
पालघर साधू हत्याकांड चौकशी आणि गती -
 
१६ एप्रिल २०२० या दिवशी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले या गावात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देश हादरला. आपल्या गुरूच्या अंत्यसंस्कारविधीसाठी सुरात येथे जात असलेल्या दोन साधूंची आणि त्यांना घेऊन निघालेल्या गाडीच्या चालकाची २०० ते ३०० च्या जमावाने अत्यंत अमानुषपणे दगडाने ठेचून हत्या केली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. एव्हढं मोठ प्रकरण होऊन देखील सुरुवातीचे काही दिवस पोलीस स्टेशनमध्ये साधी केस देखील रजिस्टर झाली नव्हती. या हत्याकांडातील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप सुद्धा झाला होता.
 
 
 
इतकच काय तर या हत्याकांडात काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे बोलले जात होते. तीन पायांच्या सरकारवर स्वार झालेल्या उद्धव ठाकरेंना तेव्हा हिंदुत्व किंवा मानवतेपेक्षा स्वतःची खुर्ची अधिक प्यारी असल्याचे आरोप विरोधकांकडून केला गेला. या हत्याकांडात उद्धव ठाकरेंनी बोटचेपी भूमिका घेतल्याने बाळासाहेबांनी कडवट हिंदुत्वाचे बाळकडू पाजलेला शिवसैनिकसुद्धा याप्रकरणामुळे नाराज झाल्याचे काही शिवसैनिक खासगीत सांगतात. पुढे या हत्याकांडातील आरोपींची अपुऱ्या पुरांव्यांमुळे जामिनावर सुटका झाली. आणि शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाबद्दलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.
 
 
दीर्घकाळ खेचलेला लॉकडाऊन,दिरंगाईचे धोरण आणि सणांवरील निर्बंध -
 
उद्धव ठाकरे यांनी दीर्घकाळ खेचलेल्या टाळेबंदी मुळे समाजमाध्यमांवर त्यांच्याबद्दल नाराजी उमटली होती. त्यात ठाकरेसरकारने देऊळ बंद ठेऊन, सणांवर निर्बंद लादले, हे करत असताना दुसरीकडे मदिरालय किंवा बार सुरु ठेवले. त्यामुळे बार मध्ये कोरोनापसरत नाही पण सण-उत्सव साजरा केल्याने मंदिरात गेल्याने कोरोना पसरतो असा संताप अनेकांनी व्यक्त केला होता. त्यात पंढरपूरच्या पोट निवडणुकी दरम्यान कोरोनाचे सर्वनियम धाब्यावर बसवणे असेल किंवा केंद्रसरकार विरोधी शिवसैनिकांनी केलेले आंदोलनात मास्क किंवा कोरोनाच्या नियमांना दिलेली तिलांजली असेल यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाबद्दल रोष निर्माण झाला.
 
 
 
बाळासाहेब यांच्या नावापुढे असलेलं जनाब हे विशेषण -
 
शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये हिंदुहृद्सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 'जनाब' असा उल्लेख केला होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उल्लेख 'शिवाजी जयंती' असा केल्याने, विरोधकांसह अनेकांनी शिवसेनेवर निशाना साधला होता. 'शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी, तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? असा झणझणीत प्रश्न विरोधकांकडून विचारला गेला होता.
 
 
उर्दू भवन केंद्र आणि टिपू सुलतान मैदान वाद -
 
शिवसेनेने 'उर्दू भाषा भवन' उभारण्याची घोषणा केली होती मुंबईतील भायखळा येथे उर्दू भाषा भवन उभारण्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूदही मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आली. शिवसेनेचे नगरसेवक व तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अर्थसंकल्पात ही तरतूद केली. त्यामुळे एकीकडे मराठी शाळांच्या दुरावस्थेचे चित्र असताना दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने उर्दू भाषाभवन उभारले जात आहे अशी टीका सेनेवर झाली होती.
 
 
 
त्यात भर घातली ती मुंबईतील मालाडपरिसरातील एक मैदानाला टिपूसुलतानच्या नामकारणाने. मुंबई कॉंग्रेसचे नेता अस्लम शेख यांनी मुंबईतील मालाड परिसरातील एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव दिल्याने अनेक हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. आणि कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये अडकलेले ठाकरेंनी तेव्हा देखील सोयीस्कर मौन बाळगल्याने हिंदू समाजामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी पसरल्याचे बोलले जाते.
 
 
 
हिंदुत्ववादी पक्षाची फारकत आणि तुष्टीकरण करणाऱ्या पक्षांची आघाडी -
  
शिवसेनेने २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांना हिंदुत्वाची साद घातली आणि सत्तेसाठी हिंदुत्वाच्या नावाने बोट मोडणाऱ्या पक्षांसोबत युती केल्याने खुद्द शिवसैनिकच नाराज झाला. त्याचेच रुपांतर आज एकनाथ शिंदेंच्या उठवाने ठाकरेंना भोवले. जहाल हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा पण उद्धव ठाकरे यांनी नेमकं त्याच गोष्टीशी कॉम्प्रोमाइज केले. ही गोष्ट हिंदू समाजाला आवडली नसल्याचे अभ्यासक सांगतात.
 
 
 
आपल्याला पुन्हा निवडून यायचे असल्यास हिंदुत्वाची कास धरण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे शिंदे गटातील आमदारांच्या लक्षात आले आणि म्हणूनच शिवसेनेत उठाव घडून आल्याचे सांगितले जाते. ठाकरेंनी पवारांची साथ सोडावी ही शिंदेगटाची मुख्य मागणी. पण तरीही उद्धव ठाकरे पवारांची साथ सोडायला तयार नाहीत. परिणामी हिंदू समाजात उद्धव ठाकरेंविषयी सहानभूती वाढायची सोडून त्यांची लोकप्रियता घटल्याचे अभ्यासक सांगतात.