
मुंबई : आपण जर महाराष्ट्र राज्यात राहतो तर मराठी येणे हे आवशयक आहे. इतर राज्यांत आपण गेलो तर ते त्यांच्या मातृभाषेतच संवादाची सुरुवात करतात, परंतु, दुर्दैवाने मराठी माणूस संवादाची सुरुवात हिंदी वा इंग्रजी भाषेत करतो. मग प्रश्न पडतो, आपल्याला आपल्या मातृभाषेत बोलण्याचा कमीपणा वाटतो का? खरेतर आपण ज्या राज्यात राहतो तेथील भाषा येणे हे क्रमप्राप्त आहे.
याचा अर्थ दुसऱ्या भाषेला विरोध असे होत नाही. दाक्षिणात्य भागात गेल्यानंतर तेथील नागरिक त्यांच्या मातृभाषेतच बोलतात. पण आपण तसे करतो का? या प्रश्नावर स्वतः अभिनेते सचिन खेडेकर यांनी मत मांडले आहे. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचा ४७ सेकंदाचा व्हिडिओ चर्चेत आहे.
सोनी मराठीवरील कोण होणार करोडपतीमध्ये सचिन खेडेकर म्हणतात, 'तुम्हाला कॉल सेंटरला फोन लावायचा असतो तेव्हा इंग्रजी, हिंदी आणि मराठी असे तीन भाषांचे पर्याय असतात. तुम्ही मराठी निवडता. तुम्ही एटीएममध्ये जाता पैसे काढायला..तेथे मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे तीन भाषांचे पर्याय असतात. तुम्ही मराठी पर्याय निवडता. तुम्हाला मार्केटिंगवाल्यांचा फोन येतो तेव्हा तो हिंदी किंवा इंग्रजीत बोलायला लागतो. तुम्ही मराठीत बोलायचा आग्रह धरा. सहसा असे होत नाही पण व्हायला पाहिजे. हा मराठीचा अतिरेकी अभिमान नाही तर हजारो मराठी लोकांच्या नोकरीचा प्रश्न आहे. आपण स्वतः आपल्या मातृभाषा मराठीचा आग्रह धरला तर आपल्यामुळे मराठी माणसाला नोकरी मिळेल. व्यवसाय मिळेल. एक पाऊल आपण टाकूया. मग आपोआपच मराठी पाऊल पुढे पडेल!'