बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी १.६४ लाख कोटी रुपयांचे पॅकेज

बीएसएनएलची सेवा विस्तारणार, महसूल वाढणार

    28-Jul-2022
Total Views |

bsnl

नवी दिल्ली : भारत संचार निगर लिमिटेड अर्थात बीएसएनएल . केंद्र सरकारचा उपक्रमाचे पुनरुज्जीवन, सुधारणा आणि सेवाविस्तार यासाठी केंद्र सरकारने १ लाख ६४ हजार १६४ कोटी रुपयांचा विशेष पॅकेजला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयास मंजुरी दिली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारपरिषदेत दिली. ते म्हणाले, बीएसएनल या सरकारी उपक्रमास कालसुसंगत बनविणे, सुधारणा करणे आणि आर्थिक स्थिती मजबुत करण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ६४ हजार १६४ कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी दिली आहे. यापूर्वी बीएसएनएलला २०१९ साली असे पॅकेज देण्यात आले होते. त्यामुळे बीएसएनएलचा महसूल १९ हजार कोटी झाला होता तर खर्च १८ हजार कोटी येऊन १ हजार कोटी रुपयांचा लाभ झाला होता, असेही वैष्णव यांनी म्हटले.
 
 
 
 
 
पुनरुज्जीवन पॅकेजअंतर्गत ३ सुधारणा केल्या जाणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पहिल्या सुधारणेंतर्गत विद्यमान सेवेत सुधारणा करणे आणि फोरजी सेवा प्रदान करण्यासाठी ४४ हजार ९९३ कोटी रुपयांच्या बदल्यात स्पेक्ट्रम प्रदान करण्यात येतील. त्याचप्रमाणे देशांतर्गत विकसित फोरजी तंत्रज्ञान व संबंधित उपकरणा वापर करून फोरजी सेवा विस्तारासाठी २२ हजार ४७१ कोटी रूपये खर्च करण्यात येतील. दुसऱ्या सुधारणेमध्ये बीएसएनएलचे ३३ हजार कोटी रुपयांच्या देण्याची रक्कम समभागांमध्ये परावर्तीत करण्यात येणार असून ३३ हजार कोटी रुपयांच्या बँक कर्जाची परतफेड करण्यासाठी स्वायत्त रोखे जारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या सुधारणेमध्ये ऑप्टिकल फायबरचे जाळे देशभरात वेगाने निर्माण करण्यासाठी बीएसएनएल आणि बीबीएनएलचे विलिनीकरण करण्यासदेखील मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी दिली आहे.
 

२५ हजार गावांमध्ये फोरजी सेवेसाठी २६ हजार कोटींची तरतूद
 
केंद्र सरकारने इंटरनेटची जोडणी नसलेल्या २५ हजार गावांमध्ये फोरजी सेवा सुरू करण्यासाठी २६ हजार ३१६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याअंतर्गत दुर्गम भागातील २४ हजार ६८० गावांमध्ये आणि टुजी व थ्रीजी इंटरनेट असलेल्या ६ हजार २७९ गावांमध्ये फोरजी सेवा पुरविण्यात येणार आहे.
मोदी है तो मुमकिन है! नितेश राणेंकडून निर्णयाचे स्वागत
बीएसएनएलमध्ये केंद्र सरकार करत असलेल्या गुंतवणुकीमुळे ग्रामीण भागांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे. सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात जिथे पर्यटन हा महत्वाचा उद्योग आहे आणि त्यासाठी बीएसएनएल सेवा महत्वाची आहे त्यामुळे असा भागांना या गुंतवणुकीमुळे खूप फायदा होणार आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, 'मोदी है तो मुमकिन है' अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.