वैदिक परंपरा आणि साधना

    28-Jul-2022
Total Views |

kunti
 
 
कर्ण
 
कुंतीला सूर्यापासून झालेला पहिला मुलगा व पांडवांचा सर्वात मोठा भाऊ म्हणजे कर्ण. कथेनुसार पंडू प्रजननात अकार्यक्षम असल्यामुळे कुंतीला दुर्वासांपासून मिळालेल्या वरामुळे तिने कुमारी असतानाच त्या वरमंत्राचा प्रयोग करून पाहिला. कुमारी कुंती गरोदर राहून तिला कर्ण अपत्य झाले. कुंतीने कर्णाला गुपचूप गंगेत सोडणे भाग होते. कारण, जग काय म्हणणार? कुमारी मातेला मुलगा झाला! कर्णाला गुपचूप गंगेत सोडून कुंती घरी परतली.
 
 
कर्णजन्माची कथा महाभारतात एका चरम आध्यात्मिक सत्यावर आधारलेली आहे. वैदिक परंपरा सत्यान्वेषक असल्यामुळे त्या सत्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू. वैज्ञानिक पद्धतीने विचार केल्यास नराशिवाय मादीला संतती असंभव आहे. त्यात कोणतीतरी दैवी शक्ती आहे, असे मानणे म्हणजे प्रकृती मातेचा अपमान करून परमेश्वराच्या सृष्टी नियमाला झुगारण्यासारखे आहे. उठसूठ दैवी चमत्कारांचा आश्रय घेणे अकर्मण्यतेचे लक्षण असून बुद्धीची दिवाळखोरी आहे. कर्णजन्म असल्या कोणत्याच दैवी मार्गाने झाला नसून त्यात अध्यात्मयोगमार्गाचे दिव्य विज्ञान आहे.
 
 
कुंत म्हणजे भाल्यासारखे तीक्ष्ण शस्त्र की, ज्याने कोणतीही कठीण वस्तू चिरता येते. या व्यक्त जगाच्या सूक्ष्मावस्थेत खरे ज्ञान व सत्य अवस्था असते, म्हणून ज्या आध्यात्मिक साधकांना सत्य जाणायचे असते, त्याला व्यक्त पसार्‍याचा मायाघन पडदा साधनाशस्त्ररूप भाल्याने-कुंतीने विदारण करून पलीकडील अव्यक्तात जावे लागते तेव्हा कोठे त्याला खरे ज्ञान होऊ शकते. प्रकाशालाही ज्ञान म्हणतात. हा प्रकाश सूर्यापासून मिळत असल्यामुळे सूर्याला ज्ञानच म्हटले आहे. साधकाची साधनारूप वृत्ती म्हणजे कुंती होय. वृत्ती स्त्रीलिंग असल्यामुळे ‘कुंत’ शब्दापासून व्यासांनी ‘कुंती’ नावाचा स्त्रीलिंगी शब्द तयार केला आहे.
 
 
आता कुंती सूर्यापासून पुत्र म्हणजे ज्ञानप्राप्ती करण्याचा प्रयत्न करते, असे वेदव्यास लिहितात. व्यास काळात पुस्तके छापण्याची कला अवगत नव्हती म्हणून लेखक आपला ग्रंथ ताडपत्रीवर लिहायचे व इतरांनी त्यातील ज्ञान श्रोत्यांना ऐकवायचे, अशी त्या काळात ज्ञान विस्ताराची पद्धत होती. जे श्रोते होते, त्यांनी ते ज्ञान आपापल्या कर्णाने श्रवण करून ते आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करायचा, अशी आध्यात्मिक ज्ञानप्रणाली त्या काळात होती. ज्ञानप्राप्तीकरिता त्या काळात कर्णाला फार महत्त्व होते. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाचा पुत्र कर्णाद्वारे प्राप्त झालेले श्रवणज्ञान होय, असे त्याकाळी समजत असत. म्हणून सूर्यरूप ज्ञानाचा पुत्र कर्ण मानला आहे.
 
 
परंतु, उपनिषदे स्पष्ट सांगतात, ‘नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया बहुना श्रुतेन’ म्हणजे केवळ कर्णांनी ऐकण्यानेच ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, तर त्याकरिता साधना करून आत्मचिंतन करावे लागेल. अपक्व ज्ञानाला खरे ज्ञान प्राप्त व्हावे, ही कुंती साधकाची आंतरिक इच्छा होती, म्हणून तिने पुन्हा ते अपरिपक्व ज्ञान ज्ञानगंगेत सोडून दिले. शंतनू राजाचीसुद्धा सात मुले अशीच गंगेत सोडण्यात आली होती. त्या अर्भकाला सूताने गंगेतून उचलले आणि त्याची आपल्या असंस्कृत संस्कारांनी जोपासना केली.
 
 
मोठा झाल्यावर कौरवांच्या सेनेत कर्णाचा प्रवेश झाला. बुद्धी कर्मानुसारिणी असते. जसे संस्कार असतील, तशीच बुद्धी प्राप्त होत असते. युद्धात सोळाव्या दिवशी कर्णबुद्धी कौरवांची सेनापती बनली. कर्ण दोन दिवस कौरवांचा सेनापती होता. कारण, कान दोनच असतात. दोन्ही कानांनी ऐकून जे ज्ञान प्राप्त करायचे ते कर्णाचे दोन दिवस होत. पहिला दिवस व्यर्थ गेला. पांडवांना मारता आले नाही. रात्री दुर्योधनाने कर्णाला खोचकपणे चिमटा घेतला. दुसर्‍या दिवशी पृथ्वी निःपांडव करेन, अशी कर्णाने प्रतिज्ञा केली. कर्ण आपली प्रतिज्ञा खरी करणार याबद्दल सर्वांची खात्री होती. कारण, कर्णाला जन्मतः प्राप्त झालेली कवचकुंडले असेपर्यंत कर्ण अजिंक्य होता.
 
 
जन्मत: कोणालाच कवचकुंडले नसतात. मग कर्णाची जन्मतः कवचकुंडले कोणती? कवच म्हणजे ज्ञानाची घमेंड व कुंडले म्हणजे श्रवणाने जे ऐकले, तेच खरे ज्ञान आहे, असे मनापासून मानणे होय. कर्णाची असली जन्मापासून प्राप्त झालेली वृत्तीरूप कवचकुंडले त्यापासून दूर (नष्ट) केल्याशिवाय कर्णाची मुक्ती म्हणजे मरण शक्य नाही, हे सत्य भगवान श्रीकृष्णाला माहीत होते. श्रीकृष्णांनी दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे धर्माला याचक ब्राह्मणाचे रूप देऊन कर्णाची कवचकुंडले मोठ्या कौशल्याने दान मागण्यास सांगितले. ‘ओम भवति भिक्षां देही’ म्हणून ब्राह्मण कर्णाच्या द्वारावर उभा राहिला. त्याने प्रथम कर्णाला तो मागेल ते दान देण्याचे अभिवचन मागितले.
 
 
कर्णाने कबूल करताच धर्मब्राह्मणाने कर्णाला त्याची कवच कुंडले मागितली. कर्ण तसा दानशूर दाखविला आहे. त्याने आपली कवचकुंडले ब्राह्मणाला दान दिली व कर्णाचे मरण जवळ आले. कर्ण दानशूर कसा? तर काहीजण केवळ वक्तृत्वालाच ज्ञान समजतात. ते आपले वक्तृत्व दान करण्यास अतिशय आतूर असतात, कोणीही आला तरी ते आपले वाचाळ ज्ञान सांगण्यास सदैव तत्पर असतात. म्हणून कर्ण दानशूर दाखविला आहे. कर्ण सर्वात शूर कसा? असले वाचावीर वक्तृत्व स्पर्धेत अथवा वादविवादात खर्‍या ज्ञानी पुरुषांनासुद्धा मागे टाकतात. खरा ज्ञानी सर्वदा मौन धारण करून असतो. अर्जुनासारख्या खर्‍या ज्ञानसाधकालासुद्धा कर्ण भारी होता. कर्णासमोर कोणाचाच टिकाव लागू शकत नव्हता. अशा वीर कर्णाला हरविण्याकरिता कर्णाची कवचकुंडले त्याच्या जवळून मागणे आवश्यक असते. धर्माने कर्णाच्या धर्मगतीकरिता ते महत्कार्य केले. कर्णाला मारणे आता सोपे झाले होते. अहंकार नष्ट झाला की, मुक्ती जवळच असते.
 
 
दुसर्‍या दिवशी कर्ण अर्जुनाशी लढत असता त्याच्या रथाचे चाक भूमीने गिळले. कर्ण चाक काढण्याकरिता खाली उतरला. वास्तविक कर्ण सेनापती असल्यामुळे त्याचा रथाचे चाक काढण्याकरिता त्याच्या सैन्यातील अनेक सैनिक धावून यायला हवे होते. परंतु, स्वतः कर्णालाच ते मामूली काम करण्याकरिता खाली उतरावे लागले. यावरून साधकांनी कथेचे रहस्य समजावे. आता कर्णाच्या रथाचे चाक कोणते? उपनिषदे शरीराला ‘रथ’ म्हणतात. ‘शरीरं रथमेव तु’ या शरीर रथांची दोन चाके असतात. एक मन व दुसरी बुद्धी. कर्णाच्या शरीररूप रथाचे बुद्धिरूप चाक आता भूमीने गिळले होते. ‘बुद्धि नाशात् प्रणश्यति।’ बुद्धी नष्ट झाल्यावर माणसाच्या जीवनात काय उरले? अर्जुनाने आपला ब्रह्मशर सोडला आणि कर्ण मरण पावला. कर्णरूप अहंकारी वृत्तीचा असा नायनाट झाला व सत् प्रवृत्त पांडवी वृत्तींचा आध्यात्मिक युद्धात जय झाला. म्हणूनच महाभारत ग्रंथाचे व्यासकृत नाव ‘जय’ होते.
 
 
 
 - योगिराज हरकरे