तुभ्यमग्रे पर्यहन्त्सूर्या वहतुना सह।
पुन: पतिभ्यो जायां दा अग्ने प्रजया सह।
कन्यला पितृभ्य:पतिलोकं यतीयमपदीक्षामयष्ट।
कन्या उत त्वया वयं धारा उदन्या इवातिगाहेमहि द्विष:॥
(ऋग्वेद-१०.८५.३८)
भावार्थ- (यज्ञकुंडाला चार प्रदक्षिणा घालताना वर म्हणतो-)
हे गृहस्थाश्रमाच्या प्रेरक परमेश्वरा, तू निर्मिलेल्या प्रजापत्य धर्माच्या पालनासाठी उषेसमान सुंदर असलेला या कन्येचा मी स्वीकार केला आहे. माझ्यासोबत राहून हिने गृहस्थधर्माचा भार उचलावा. प्रजनन सामर्थ्याने युक्त असलेल्या हिला आपण कालांतराने पुत्रांसहित मला प्रदान करावे. ही कन्या पित्याचे घर सोडून मज पतीच्या घरी जात आहे. या कन्येने गृहस्थाश्रमाचे व्रत धारण केले आहे. ही नेहमी माझ्यासोबत राहो. आम्ही सर्वांनी मिळून पाण्याच्या वेगवान धारेप्रमाणे असणार्या गृहसौख्यात विघ्न आणणार्या विरोधी कर्मांना वा अविचारांना नाहीसे करावे.
विवेचन
विवाह संस्कारातील लाजाहोमात वधू-वर हे साळीपासून बनविलेल्या लाह्या व शमी वृक्षाच्या पानांची आहुत्या प्रदान करतात व चार प्रदक्षिणादेखील घालतात. यातून स्त्रियांच्या त्यागाचे व पुरुषाच्या सेवासमर्पणाचे दर्शन घडते. हे आपण मागील लेखात पाहिले होते. यानंतर आता आपणांस त्या आहुत्यांचे रहस्य समजून घेणे आवश्यक ठरते. वधूचा भाऊ आपल्या बहिणीची ओंजळ या शमीपत्र युक्त लाह्यांनी भरतो. म्हणजेच आपल्या ताईला प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण साहाय्याचे दर्शन घडवत एक प्रकारे आश्वस्त करतोय. या माध्यमाने आपल्या भावनांना व्यक्त करीत जणू काही ताईलाच म्हणतो आहे, “अग ताई, आता यापुढे तुझ्या आदर-सत्काराचीमी सांभाळणार आहे.
जेव्हा केव्हा तू पितृगृही येशील, तेव्हा हा बंधूराज तुझ्या सेवेसाठी जीवनभर तत्पर असेल. वडिलांच्या नंतर तुझ्या मानपानाचे व्रत मी आजच स्वीकारतो आहे. हा भाऊराया यथाशक्ती तुला भरभरून देईल.” असा हा बंधुप्रेमाचा भावबंध विशद करणारा विवाह संस्कारातील भगिनीची ओंजळ भरण्याचा मंगलमय प्रसंग.”
आहुत्या म्हणजेच दान. गृहस्थाश्रमात पदार्पण करणारे वधू-वर यानंतर आता पती-पत्नी होतील. आजपर्यंत या दोघांवर घरादाराची जबाबदारी नव्हती. कारण, हे दोघेही ब्रह्मचर्य आश्रमात होते. यापुढे गृहस्थाश्रमी बनून आहुत्यांच्या माध्यमाने हे दाम्पत्य दानधर्मासाठी तत्पर होत आहे. याच गृहस्थाश्रमावर अन्य ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास हे तीन आश्रम अवलंबून आहेत. म्हणूनच या तिघांचे भरणपोषण करणे आणि गोरगरिबांना दान देणे हे सत्कृत्य आजपासून आरंभ होत आहे. दोघांनी मिळून एका दिलाने व उत्साहाने दान करावयाचे. ही दातृत्व भावना केवळ एका मध्येच असून चालणार नाही, तर ती दोघांमध्येही असली पाहिजे. लाह्यांनी भरलेल्या वधूच्या हाताला वराचा आधार आहे, यासाठीच! पत्नीने गृहलक्ष्मी बनून दारी आलेल्या याचकांना भरभरून दान करावे. म्हणूनच तर याकरिता पतीकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते. ज्या घरात धर्मपत्नीच्या हाताला पतीचा सहकार्याचा हात असतो, तेथे दातृत्व अधिक उंचावते. त्यामुळे तेथे नित्य सुख व आनंद नांदते.
यापेक्षा आनंदाचा स्वर्गाश्रम इतर दुसरा कोणता?
साळीच्या लाह्यांची आहुती
या संस्कारात ज्यांच्या आहुत्या दिल्या जातात, त्या लाह्या किंवा लाजा या साळीपासून बनवलेल्या असतात. यात साळीवरचे आवरण म्हणजेच तूस. यालाच भुसादेखील म्हणतात. हा भुसा म्हणजे पत्नी, तर आतील तांदूळ म्हणजे पती होय. स्त्रीला टरफलाचे किंवा भुशाचे रूप दिल्याने तिला तुच्छ लेखण्याचे काहीच कारण नाही. कारण, हेच टरफल हे आतील तांदळाचे रक्षण करते. पती आपल्या कर्तव्यापासून कधी परावृत्त झाला अथवा त्यांच्याकडून काही चुका घडल्या, तर पत्नी ही आपल्या संरक्षकआवरणाने तिला सांभाळून घेते. तिचे सर्वदृष्ट्या रक्षण करते.
दुसरीकडे तांदळाला बाजारात कितीतरी मोठी किंमत असली अथवा ते किती जरी महाग विकत असले, तरी ते भुसाविरहित तांदूळ आपली उत्पादनक्षमता मात्र हरवून बसतो. फिरतेवेळी तांदळास भुशाचा आधार घ्यावाच लागतो. पुरुषांना आदर वा मान-सन्मान मिळतो, हे खरे आहे. पण, याचे श्रेय जाते ते पत्नीकडेच! कारण, तीच आपल्या पवित्र कर्तव्यातून आणि पतिव्रता धर्मपालनातून आपल्या पतीचे नेहमीच रक्षण करते. आपण पाहतोच ना. शेतकरी आपल्या शेतात कधीही तांदूळ पेरत नसतात, तर साळीचे रोप करूनच ते इतरत्र लावत असतात. म्हणूनच तांदूळ व टरफल यांची अखंडित व अविभाज्य एकरूपता असणे आवश्यक आहे. आपल्या कुटुंबाची वंशवेल वाढविण्याकरिता पुरुषाला आपल्या पत्नीचा आधार घ्यावाच लागतो. तिच्याविना गृहस्थाश्रमाचे उद्यान कसे काय फुलणार व फळणार?
साळीचे आणखी एक रहस्य म्हणजे तिचे एका ठिकाणी रोपण केले जाते, नंतर तेथून काढून तिला दुसर्या ठिकाणी आरोपित केले जाते. मग तिथे ती आकारास येऊन फलिभूत होऊ लागते. कन्या मातृ-पितृगृही जन्मते, लाडाने मोठी होते, संस्कारित व सुशिक्षित होते व विवाहानंतर पतिगृही जाऊन संततीला जन्माला घालते. लाजा होमाचे हे रहस्य नवदाम्पत्यांना बरेच काही शिकवून जाते.
शमी म्हणजेच समदडीची पाने. ती दिसायला छोटी छोटी असतात. रंगाने ती नेहमीच हिरवीगार. झाडापासून वेगळी झाली किंवा सुकून गेली तरी ती आपला हिरवा रंग कधीही बदलत नाहीत. सदाबहार असणे हा शमीपत्रांचा गुणधर्म. हाच हिरवा रंग आनंदोत्सवाचे आणि उत्कर्षाचे प्रतीक मानला जातो. याचप्रमाणे पतीच्या कुळाला सदैव हिरवेगार ठेवण्याचा प्रयत्न पत्नी करीत असते. पण, अशीही धर्मपत्नी कधीही अपमानित व दुःखी होता कामा नये. ती सदैव प्रसन्न व आनंदी राहावयास हवी आणि ही जबाबदारी पतीसह सासरच्या कुटुंबीयांची असते. म्हणूनच तर मनुस्मृतीत म्हटले आहे-
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:॥
पूजा म्हणजेच सत्कार किंवा सन्मान!
पतीचे गृह हे धनसंपत्तीने भरभरून (हिरवेगार) असले, तरी घरात मात्र पत्नीचा जर काय सतत अपमान, तिरस्कार, द्वेष वा छळ, अत्याचार होत असेल किंवा तिला वाईट वागणूक मिळू लागली, तर पतीच्या कुळाची अवस्था ही मात्र यज्ञकुंडातील अग्नीत आहुत केल्या जाणार्या लाह्यांप्रमाणे जळून भस्मसात होईल. मग, या लाजा (लाह्या) कधीच अंकुरित होत नसतात. यातून स्त्रियांच्या सन्मानाचे रहस्य जाणून घेतले पाहिजे.
लाजाहोमासोबतच्या चार मंगल प्रदक्षिणा म्हणजेच चार मंगल फेरे हे वर-वधूंना चार गोष्टींचा बोध करून देतात. काही ठिकाणी सात फेरे असा उल्लेख केला जातो. पण, ती सात पावले असतात. म्हणजेच ती सप्तपदी होय. फेरे मात्र चारच असतात. हे चार फेरे धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थांना अभिव्यक्त करणारे आहेत. गृहस्थाश्रमी दाम्पत्याने हे चारही पुरुषार्थ मोठ्या प्रयत्नाने कमावले पाहिजेत. धर्म म्हणजे सत्कर्म, सत्याचरण, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठा. या धर्मप्राप्तीसाठी पती-पत्नींनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावयास हवा. कारण, सुखस्य मूलं धर्म:! शाश्वत सुखाचे मूळ हे धर्माचरणात आहे.
याउलट अधर्माचरण केले, तर सर्वत्र दुःखच दुःख निर्माण होते. म्हणून पती-पत्नींनी पदोपदी धर्माचे पालन करणे नितांत आवश्यक ठरते. याच धर्ममार्गाने धनैश्वर्य कमवावे. अधर्माने मिळवलेली धनलक्ष्मी चिरकाल टिकत नाही. पुढे या ना त्या कारणाने ती निघून जाते. धर्ममार्गाने मिळवलेले धन हे अल्प का असेना, पण मोलाचे ठरते. तेच सात्विक धन आपणांस सुख-समाधान मिळवून देते. अशाच धर्ममार्गाने कमावलेल्या संपत्तीद्वारे कामनापूर्ती व्हावयास हवी. काम म्हणजे पवित्र अभिलाषा, आकांक्षा व पावन इच्छा. दान, परोपकार, सेवा, मदत इत्यादी कामना पूर्ण करताना धर्मपूर्वक मिळवलेल्या धनाचाच उपयोग करावयास हवा. मोक्ष म्हणजे मुक्ती, मुक्त होणे. गृहस्थाश्रमात दाम्पत्यांना जे काही धर्म-अर्थ-काम हे पुरुषार्थ मिळाले त्यातून आता मुक्त होणे गरजेचे आहे. भौतिक सुखसंसाधने किंवा प्रापंचिक मायामोहात कार्यात गुंतून न राहता अध्यात्म मार्गाचा अवलंब करणे म्हणजेच मोक्षमार्ग होय. असा हा या चार मंगल प्रदक्षिणांचा भाव!
या मंगल प्रदक्षिणा म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यात चार वर्णाच्या प्रतिपादक, तर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या आश्रमाचे प्रतीक! त्याचबरोबर या मंगल प्रदक्षिणा म्हणजे चार दिशांच्यादेखील प्रतीक मानल्या जातात. गृहस्थाश्रमी दाम्पत्याने आपले आचरण इतके उत्तम, उदात्त व पवित्र ठेवावे आणि सतत सत्कर्म करीत राहावे की, त्यांची पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या चारही दिशांमध्ये कीर्ती पसरावी. ‘खरोखरच हे आदर्श जोडपे आहे’ असे गौरवोद्गार चारही दिशांतील गावांगावांमध्ये राहणार्या आप्तेष्ट, नातेवाईक व मित्र परिवारांकडून ऐकावयास मिळाले पाहिजे. असे हे लाजा होम व मंगल प्रदक्षिणांचे उद्दिष्ट आचरणात आणल्यास आपले घर हे स्वर्गाश्रम बनेल, यात शंका नाही.
-वेदामृत सरिता