भक्ताचे अंतरंग...

    28-Jul-2022
Total Views |

aady
 
लोकांच्या बाह्यकृतीवरुन त्यांच्या अंतरंगाचा नीट अंदाज येत नाही. यासाठी खर्‍या भक्ताला ओळखायचे, तर त्याच्या अंतरंगाचा, आंतरिक गुणांचा शोध घ्यावा लागतो. त्याच्या मनात काय चालले आहे, हे तर्काने आणावे लागते, तरच सर्वोत्तमाच्या दासाची ओळख होऊ शकते. काही श्लोकातून स्वामी भक्ताला जाणण्यासाठी काही अनुभवी लक्षणे अथवा आधारभूत चिन्हे सांगत आहेत.
 
 
आपले सर्वस्व सर्वोत्तम भगवंताला अर्पण केले आहे, त्या भक्ताचे गुणविशेष स्वामी सांगत आहेत. जेथे भ्रमाला किंचितही वाव नाही, अशी सगुणभक्ती हा भक्त करीत असतो, ती ज्ञानीभक्ती होय, असे स्वामींनी मागील श्लोकात सांगितले आहे. या भक्ताचे बाह्यस्वरुप सर्वसाधारण माणसासारखेच असते. परंतु, ते पाहण्यापेक्षा त्याचे अंत:करण जाणता आले पाहिजे. ते आता स्वामी पुढील श्लोकांतून सांगत आहेत. व्यवहारामध्ये सर्वसाधारणपणे बाह्यस्वरुपात जे दिसते, त्यावरुन आपण निष्कर्ष काढीत असतो. त्यामुळे काहीवेळा ते चुकतात. लोकांच्या बाह्यकृतीवरुन त्यांच्या अंतरंगाचा नीट अंदाज येत नाही.
 
 
यासाठी खर्‍या भक्ताला ओळखायचे, तर त्याच्या अंतरंगाचा, आंतरिक गुणांचा शोध घ्यावा लागतो. त्याच्या मनात काय चालले आहे, हे तर्काने आणावे लागते, तरच सर्वोत्तमाच्या दासाची ओळख होऊ शकते. पुढील श्लोकातून स्वामी भक्ताला जाणण्यासाठी काही अनुभवी लक्षणे अथवा आधारभूत चिन्हे सांगत आहेत.
 
 
नसे अंतरीं कामकारी विकारी।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी।
निवाला मनीं लेश नाही तमाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥
 
 
या सर्वोत्तमाच्या दासाचा आपल्या विकारांवर ताबा असतो. भक्त त्यांचा योग्य तो वापर करतो. भक्त अंतरात उत्पन्न होणार्‍या विकारांच्या आहारी जात नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी विकार नाहीत, असे म्हणण्याची पद्धत आहे. वास्तविक पाहता, प्रत्येकाच्या अंत:करणात विकार उत्पन्न होतात. विकार ही बाह्य परिस्थितीची मनात असलेली प्रतिक्रिया असते. ती स्वाभाविक असते. पण, त्या विकारांकडे तटस्थपणे कसे पाहायचे, ही कला भक्त जाणत असतो. विकार याचा अर्थ स्थितीत झालेला बदल, विकारामुळे अंत:करणात राग, लोभ, भय, क्रोध, प्रेम इत्यादी बदल होतात. पण, त्या बदलांवर नियंत्रण ठेवून त्यांना आटोक्यात ठेवता येते. जेव्हा विकारांवर ताबा राहत नाही, तेव्हा ते वाणीतून, वर्तनातून प्रगट होतात.
 
 
समर्थांनी या ठिकाणी ‘कामकारी विकार’ असा शब्दप्रयोग योजला आहे. काम म्हणजे, विषयवासना किंवा स्वार्थीबुद्धीने काहीतरी मिळवायची इच्छा, वासना. ज्ञानी भक्ताने आपल्या विषयवासनेवर, इच्छेवर ताबा मिळवलेला असतो. त्यामुळे तो विकारांबरोबर वाहवत जात नाही. हे कामकारी विकार अंत:करणातच कसे जिरवून टाकायचे, हे त्याला माहीत असते. त्यामुळे या भक्तांच्या ठिकाणी कामकारी विकार अथवा विचार नसतात, असे स्वामींनी म्हटले आहे. विषयविकारांवर ताबा नसलेला मनुष्य विकाराच्या प्रभावाखाली राहून वागतो, हे तमोगुणाचे लक्षण आहे. भगवद्गीतेत ‘अधो गच्छन्ति तामसा:’ असे म्हटले आहे.
 
 
या तामसी गुणांमुळे माणूस अधोगतीला जातो, असे स्पष्ट मत भगवंतांनी व्यक्त केले आहे. स्वामींनी दासबोधात समास ‘२.६’ मध्ये तमोगुणी माणसाची लक्षणे सांगण्यासाठी ४० ओव्या खर्ची घातल्या आहेत. या समासात तामसी माणसाच्या अनेक अवगुणांचे वर्णन स्वामींनी सविस्तरपणे केले आहे. काम आणि क्रोधाचे सहचर्य सर्वांना माहीत आहे. कामविकाराबरोबर क्रोधही खवळून उठतो. या क्रोधाचा आवेश आणि उन्माद इतका भयानक असतो की, कामवासनेने पछाडलेला कामकारी मनुष्य त्याला आवरू शकत नाही, म्हणूनच आपल्या संतांनी क्रोधाला ‘चांडाळ’ म्हणजे, अत्यंत दुष्ट-नीच असे म्हटले आहे. तामसी मनुष्याच्या अंगात क्रोधाचे वारे शिरले की, तो बेफाम होतो आणि एखाद्या पिशाच्याप्रमाणे वागू लागतो, असे स्वामींनी दासबोधात म्हटले आहे.
 
 
भरलें क्रोधाचें काविरें। पिशाच्यापरी वावरे।
नाना उपायें नावरे। तो तमोगुण॥(२.६.५)
 
 
माणसाचे पतन करणारा हा तमोगुण भक्ताच्या ठिकाणी किंचितही असत नाही. कारण, कामकारी विकाराला त्याने जिरवून टाकलेले असते, असा हा भक्त तपस्वी असतो. कामकारी विकाराला मनात किंचितही राहू न देणे, ही एक प्रकारे तपस्याच आहे. म्हणून समर्थांनी अशा भक्ताला ‘उदासीन जो तापसी ब्रह्मचारी’ असे म्हटले आहे. हा भक्त उदासीन म्हणजे हताश, निराश असा नसतो, तर तो उदासीन म्हणजे विरक्त असतो. त्यांच्या ठिकाणी तितिक्षा हा गुण असतो. तितिक्षा गुण म्हणजे संयम, क्षमाशीलत्व, सहनशीलता आणि सहिष्णुता या गुणांचा समुच्चय. या तितिक्षा गुणांमुळे भक्त स्वाभाविकपणे प्रापंचिक गोष्टींपासून विरक्त राहू शकतो.
 
 
हा भक्त तापसी असतो म्हणजे त्याने तपाचे अर्थात सदाचरणाचे महत्त्व जाणलेले असते. हा तापसी नेहमी सदाचारी, ब्रह्मचारी असतो, असे स्वामींनी म्हटले आहे. या ठिकाणी स्वामींनी ‘ब्रह्मचारी’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरला आहे, जो ब्रह्माचे आचरण करतो, तो ‘ब्रह्मचारी’ होय. त्याने ब्रह्म जाणलेले असते, ब्रह्म जाणण्यासाठी भक्ताला अंतर्मुख व्हावे लागते. सदैव बाहेर धावणारी वृत्ती आत वळवावी लागते. त्यासाठी त्या भक्ताला वृत्ती आत वळवून ध्यानधारणा करावी लागते. असा हा ब्रह्मचारी भक्त विषयोपभोगाच्या आनंदाला क्षुल्लक मानतो.हे ओघाने आलेच. अंत:करणात शांत झालेला, निवालेला, उदासीन, तपस्वी, ब्रह्माचरण पाळणारा आणि ज्याच्या ठिकाणी या किंचितही तमांचा स्पर्श नाही, असा सर्वोत्तमाचा दास खरोखर धन्य होय.
 
 
तमोगुणाचा अत्यंत छोटा सूक्ष्मकणही ज्याच्या ठिकाणी दिसत नाही, अशा भक्ताची आणखी लक्षणे सांगताना स्वामी पुढील श्लोकात मोठ्या मजेशीर भाषेचा प्रयोग करतात. कसा तो पाहा-
 
 
मदे मछरे सांडिला स्वार्थबुद्धी। 
प्रपंचिक नाही जयाते उपाधी।
सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५१॥
 
 
या भक्ताने मद, मत्सर, स्वार्थबुद्धी टाकून दिल्या आहेत, असे सरळ सांगण्याऐवजी समर्थ मजेशीरपणे सांगतात की, ‘अरे मद, मत्सर अणि स्वार्थबुद्धी यांनीच त्या भक्ताला सोडून दिले आहे. या ठिकाणी समर्थांनी ‘चेतनागुणोक्ती’ या अलंकाराचा प्रयोग करुन गंमत आणली आहे.प्रपंचात वावरताना नको म्हटले, तरी मद-मत्सर येतात. संसाराचा गाडा चालवण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. परंतु, स्वार्थ बुद्धीने सर्व काही मलाच मिळावे, या विचाराने माणूस अनेक गोष्टींचा संग्रह करतो.
 
 
त्यात त्याचा जीव अडकल्याने त्याग, परोपकार या सद्गुणांचा त्याला विसर पडतो. प्रापंचिक गोष्टींच्या पलीकडे त्याला विचार करता येत नाही. भक्ताच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी या प्रापंचिक उपाधी नसतात, असे स्वामींनी म्हटले आहे. अर्थात, भक्तालाही प्रपंच असतो. पण, त्यात त्याची स्वार्थबुद्धी नसते. आपला प्रपंच तो कर्तव्य म्हणून जबाबदारीने करीत असतो, पण त्यात तो लिप्तनसतो. खरा भक्त द्वेष-मत्सराच्या पलीकडे गेला असल्याने त्याचे बोलणे नम्र आणि चांगले असते. आपल्या वागण्यात वाणीला फार महत्त्व आहे. कारण, मनात जे चाललेले असते, ज्या विकारांचा मनावर ताबा असतो, ते वाणीद्वारा बाहेर पडते.
 
 
यासाठी भाषा जपून वापरावी. त्यामुळे जे सांगायचे ते संत हळूवारपणे सौजन्याने आणि नम्र भाषेत सांगतात.त्यांच्या सांगण्यात कुठेही अहंभाव, गर्व, ताठा नसतो. त्यांनी क्रोधाला जिंकले असल्याने त्यांच्या भाषेत कठोरता नसते. सर्वोत्तमाच्या दासाची वाणी अतिशय मधुर, नम्र, पण मनाला भिडणारी सुवाचा असते. संतांची, महापुरुषांची वाणी नम्र आणि हितकारक असते. त्यात वात्सल्य असते, असा सर्वोत्तमाचा दास म्हणवणारा महात्मा धन्य होय.
 
 
 - सुरेश जाखडी