संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मांतरानंतर हिंदू समाजावर टीका करण्याच्या उद्देशाने एकाव्यक्तीने प्रश्न केला तेव्हा बाबासाहेबांनी आता मी हिंदू धर्मात नाही, त्यामुळे त्या धर्मावर मी टीका करण्यात वेळ घालवणार नाही, मी माझ्या समाजातील दोष दूरकरण्यासाठी तो वेळ सत्कारणी लावेल, अशा अर्थाचे बाबासाहेब आंबेडकरांचे वक्तव्य तुम्ही ऐकले अथवा वाचले असेल. पण बाबासाहेबांच्या नावाचा जप करणारे सुषमा अंधारे यांच्या सारखे अनेक लोक आहेत जे सतत हिंदू आणि हिंदू देवदेवतांवर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका करत असतात. संविधान अभिव्यक्ती याच्या नावाने गळा काढत असतात. खरं तर वादग्रस्त विधानंसोडली तर सुषमा अंधारेंची दखल घ्यावी असे कोणतेही समाजहितकारक काम या अंधारेबाईंनी केलेले नाही. पण आज त्यांच्यावर चर्चा करावी लागतीये ती त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे. कोणेएकेकाळी ठाकरेंचा बाप काढणाऱ्या अंधारेंना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत का घेतले असावे आणि बजाओ पुंगी हटाओ लुंगी म्हणणाऱ्या बाळासाहेबांचा नातू आदित्य ठाकरे आज लुंगी डान्स करतायत, अशी टीका करणाऱ्या सुषमा अंधारेनी शिवसेनेत प्रवेश का केला असावा?
सुषमा अंधारेनी शिवसेनेत प्रवेश का केला?
वादग्रस्त विधानं करून चांगली किंवा वाईट प्रसिद्धी मिळते. त्यामुळे राजकारणात प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा कायम चर्चेत राहण्यासाठी काही लोक वाट्टेल तशी बडबड करत सुटतात. पण आपल्या तोंडाचा पट्टा खुला सोडल्याने फायदा होण्या ऐवजी नुकसान अधिक होते. बऱ्याचदा अर्थांजनाच्या मुद्यावर दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. सुषमा अंधारे यांच्या बाबतीत असेच झाले असण्याची शक्यता जास्त आहे. अंधारे या वक्त्या आहेत. महाराष्ट्रभर त्यांची व्याख्यानं होत असतात. पूर्वी त्या राष्ट्रवादी तर्फे मैदान गाजवायच्या पण सध्या राष्ट्रवादी कॉंग्रस पक्ष सत्तेत नाही.
तसेच राष्ट्रवादीत आपले राजकीय भवितव्य आपल्या आडनावाप्रमाणेच अंधारमय आहे. उठाव झालेला असला तरी शिवसेनेची बांधणी मजबूत आहे. त्यामुळे या पक्षात आपल्याला वक्ता म्हणून चांगली संधी मिळेल. अगदी अशीच स्ट्रेटेजी नितीन बानुगडे पाटील यांनी वापरल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात व्याखानाचे कार्यक्रम आपल्याला मिळतील हे डोळ्यासमोर ठेवून सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला असावा असे बोलले जाते.
शिवसेनेकडे सभा गाजवणारा नेता नाही -
आक्रमकता हा शिवसेनेचा प्राण. पूर्वी सभा गाजवतील आणि त्याचे रुपांतर मतांमध्ये परिवर्तीत करतील अशा अनेक मुलुखमैदानी तोफा शिवसेनेच्या भात्यात होत्या. पण शिंदेंच्या उठावाने आज ठाकरेगटाकडे विरोधकांना अंगावर घेईल अशा वक्तांची वानवा आहे. त्यामुळेच संजय राऊत यांच्याप्रमाणेच किंबहुना अधिक बेताल वक्तव्य करणाऱ्या सुषमा अंधारे यांना शिवसेनेत प्रवेश दिला असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. अर्थात राजकीय दृष्ट्या सुषमा अंधारे यांच्या पाठीमागे फारसे बळ आहे असे दिसत नाही. हिंदूबद्दल बोलताना चेहऱ्यावर कुत्सित भाव आणून हिंदू धर्मातील चालीरीतींची खिल्ली उडवणे हा अंधारेंचा आवडता छंद आहे.
त्यामुळेच कायम हिंदुत्वावर हल्ला करणाऱ्या सुषमा अंधारेंच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेला फायदा होण्या पेक्षा नुकसान अधिक होईल कि काय असा प्रश्न उपस्थित होतो. मग तरीही अंधारेना उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात का घेतले असावे? तर त्याच उत्तर अगदी साध आहे. शिवसेनेत सध्या वैचारिक मंथनाची वानवा आहे. मात्र सुषमा अंधारे यांच्या आगमनामुळे शिवसेनेत एक वैचारिक घुसळण घडवून येईल कि काय अशी उद्धव ठाकरेंची समजूत झालेली असावी.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तोंडावर असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. -
येत्या काळात मुंबई-ठाणेसह अनेक महत्वाच्या महापालिकेच्या निवडणूका येऊ घातल्यात. समाजात आपल्याबद्दल सहनभूतीची लाट निर्माण झाली असल्याच्या ठाकरेंगटात चर्चा आहेत. मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेनेचा प्राण असल्याचे बोलले जाते. बीएमसीच्या सत्तेचा सुकाणू ठाकरे गटाच्या हातून निसटल्यास ठाकरे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अंधारे यांच्या रूपाने आंबेडकरी मते आपल्या पारड्यात पडण्याचा तसेच सतत मोठ्याप्रमाणावर लोक सोडून गेल्याने पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा हा ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.
अंधारेंचा शिवसेनेला फायदा कि नुकसान -
सुषमा अंधारे या एखाद्याची अक्कल काढणे, समोरच्याला वाट्टेल तसे बोलणे यात पटाईत आहेत. पक्ष प्रवेश करताना आपण चांद्यापासून बंद्यापर्यंतच्या भरकटलेल्या शिवसैनिकांना नवी उमेद देणार असल्याचे अंधारे यांनी जाहीर वक्तव्य केले आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना ते जमले नाही हे बोलून दाखवले. अंधारे यांचे व्हिडीओ पाहिल्यास त्याकशा पातळीसोडून बोलतात हे अपोआप समजेल. एकंदरीत शिवसेनेचे केडर हे जहाल हिंदुत्वाचे आहे, ज्याचे निर्माते हिंदुहृद्यसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपला मूळ ट्रॅक केव्हाच बदललाय. सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशाने त्यावर शिक्कामोर्तब झालंय. हे चूक कि बरोबर हा वादाचा मुद्दा आहे. पण एकाच वेळी जहाल हिंदुत्वाचे आपणच रक्षक आहोत अशी भाषा तोंडात ठेऊन दुसरीकडे हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या सुषमा अंधारेना पक्षात प्रवेश द्यायचा याने ठाकरेगटाचे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक असेल इतके मात्र नक्की!