असलम शेख यांचा हजारो कोटींचा फिल्म स्टुडिओ घोटाळा

३०० कोटींचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

    27-Jul-2022
Total Views |
 
somaiyya
 
मुंबई: “असलम शेख यांनी कोरोना काळात मालाड पश्चिमेकडील मढच्या समुद्रात सर्व नियमांना डावलत बांधकामे उभे करण्यासाठी मदत केली. यातून समुद्रात मोठमोठी बांधकामे उभी राहिली आणि त्यातून जवळपास ३०० कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे,” असा आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे माजी पालकमंत्री असलम शेख यांच्यावर केला आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी शेख यांच्यावर गंभीर आरोप केले.
 
 
ते म्हणाले की, “महाविकास आघाडी हे लुटारू सरकार होते. त्यातील आता आणखी एका मंत्र्याचा एक हजार कोटींचा घोटाळा मी मांडणार आहे. गेल्या दोन वर्षांत काँग्रेसचे माजी मंत्री असलम शेख यांनी मालवणी-मढ या भागात तब्बल २८ फिल्म स्टुडिओंचे कमर्शियल बांधकाम सुरु केले आहे. यापैकी पाच स्टुडिओ ‘सीआरझेड झोन’मध्ये आहेत. २०१९ साली ही जागा हिरवीगार होती. मात्र, २०२१ मध्ये हा परिसर ‘सीआरझेड’मध्ये नाही, असे पर्यटन विकास मंडळाने म्हटले आहे,” असेही सोमय्यांनी सांगितले. “कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवण्यात आली आहे. मात्र, मँग्रोव्ह झाडांची कत्तल करुन स्टुडिओ उभारण्यात आले आहेत,” असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
 
 
किरीट सोमय्या आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी रविवारीच या संपूर्ण परिसराची पाहणी केली. ‘एमसीझेडएमए’, ’सीआरझेड विभाग’, जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग आणि पोलिसांचे अधिकारीही त्यावेळी उपस्थित होते.
 
 
सोमय्यांच्या दाव्यानुसार पर्यावरण मंत्रालयाने फक्त ’फिल्म सेट’साठी परवानगी दिली होती. मात्र, असलम शेख यांच्या आशीर्वादाने तिथे दहा लाख स्क्वे. फूटची जागा मोकळी करून २८ स्टुडिओ बांधण्यात आले. भाटिया स्टुडिओची तीन एकर जागा कागदावर दिसते. परंतु खरे पाहिले, तर अधिकची दोन एकर जागा वापरून ’फिल्म सेट’ऐवजी फिल्म स्टुडिओचे बांधकाम केले गेले. विशेष म्हणजे, तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या बाजूच्या प्लॉटला भेट दिली होती.
 
 
शिंदे सरकारकडून कागदपत्रे मिळाली
 
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, “ ‘होमवर्क’ करायला वेळ लागतो. पण, आता शिंदे सरकार आले म्हणून काही कागदपत्रे मिळाली, जी आधी मिळत नव्हती. आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचविण्याचे काम करायचे. पण, आता फडणवीस-शिंदे सरकार घोटाळेबाजांसाठी काम करत नाही. माझे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे, दोघांकडून आश्वासन मिळाले आहे, लवकरच चौकशी होईल. तसेच यासंदर्भात कोस्टल रोड विभागालाही पत्र पाठवणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.