संगीत साधनेचा निस्सीम साधक

    27-Jul-2022   
Total Views |

 
mans
 
 
 
घराण्यात कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसताना संगीत क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या नाशिकच्या प्रसाद गोखले यांच्याविषयी...
 
 
संगीताच्या दुनियेत आजवर अनेक महनीय व्यक्तींनी आपले योगदान दिले आहे आणि आजही अनेक कलाकार आपले योगदान देत आहेत. नाशिक येथील प्रसाद गोखले हे त्यापैकीच एक. संगीत या विषयात कार्यरत गोखले यांनी आजवर अनेक दिग्गज गुरूंकडून शिक्षण घेतले आणि त्यांची अजूनही संगीत क्षेत्राचे विद्यार्थी म्हणून साधना सुरू आहे.
 
 
‘एम.ए’ (संगीत गायन), संगीत विशारद (गायन आणि तबला) पर्यंतचे शिक्षण झालेले गोखले हे सध्या संगीत शिक्षक आणि विभाग प्रमुख म्हणून येथील सिंबायोसिस शाळेत २००६ पासून कार्यरत आहेत. आजवर त्यांचे अनेक विद्यार्थी गायन तसेच वाद्यवादन या क्षेत्रात कार्यरत असून उच्च संस्थांमध्ये सांगीतिक तज्ज्ञ शिक्षक तसेच वैयक्तिक कलाकार म्हणून संगीत क्षेत्राची सेवा करत आहेत. संगीत हे परमेश्वरापर्यंत सगळ्यात जलद पोहोचण्याचे साधन आहे. अर्थात, त्यामागे भरपूर मेहनत आणि त्याग आवश्यक असल्याचे गोखले सांगतात. याच भावनेतून ते स्वतः आज ही अनेक गुरूजनांकडे विद्यार्जन करत आहेत. संगीताला जात, धर्म नाही, सगळ्या समाजाला एकसंध ठेवण्याची शक्ती संगीतात असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.
 
 
व्यक्तीला स्वत्व विसरायला लावणारे आणि आत्मनुभूतीची जागृती निर्माण करणारे अद्भुत रसायन म्हणजे संगीत असल्याचे ते सांगतात. आपल्यालादेखील ही सुंदर भाषा आली पाहिजे, या व्यासंगातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास अजून सुरूच असून आजन्म विद्यार्थी म्हणून या प्रवासाचे प्रवासी म्हणून कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे.
 
 
भारतीय संगीत हे जगातील सर्वात उत्तम संगीत आहे. या परंपरेला आपण पुढे नेण्याचे काम केलेच पाहिजे आणि ते आपले कर्तव्य असल्याचे सांगतात. आपल्या ‘एक्स्प्रेशन्स् संगीत अकादमी’च्या माध्यमातून तसेच शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सांगीतिक मूल्ये रुजवणे आणि ती वृद्धिंगत करण्याचे अव्याहत काम ते करत आहेत. यातून मिळणारे परिणाम अगदी सुखद आणि अद्भुत असल्याचे ते सांगतात.
 
 
सांगीतिक साधना करणारी मुले ही इतर मुलांपेक्षा अभ्यासातदेखील सरस कामगिरी करत असल्याचा अनुभव ते सांगतात. त्यांचा बुद्ध्यांक हा सामान्य मुलांच्या खूप पुढे काम करतो. त्यांच्यात सभा धारिष्ट्य तसेच नेतृत्व गुणांचा विकास अधिक जोमाने होतो. तसेच, ही मुले कायम आनंदी, दडपण मुक्त असतात. त्यामुळे मुलांच्या उत्तम जडणघडणीसाठी संगीत हे मोठे परिणामकारक असल्याचे ते एक शिक्षक म्हणून सांगतात.
 
 
सांगीतिक मूल्यांसोबत, जाज्वल्य देशप्रेम तसेच भारतीय सांस्कृतिक मूल्ये आपल्याला सांगीतिक माध्यमातून शिकवता येतात. मग ती थोर राष्ट्रपुरुषांची गीते असोत, मराठी, हिंदी साहित्यातील संतरत्ने असोत वा अन्य गीते. जिथे जिथे मानवतेचा संदेश आहे, अंतर्मनाचा संवाद आहे, जाज्वल्य देशप्रेम आहे तो भाव सांगीतिक माध्यमातून अधिक उत्कटपणे नव्या पिढीपर्यंत पोहोचवता येणे सहज शक्य असल्याची भावना ते राष्ट्रकार्यात संगीताचे असलेले महत्त्व विशद करताना सांगतात.
 
 
याशिवाय गोखले हे अभिजात शास्त्रीय संगीतासोबतच भक्तिसंगीत, उर्दू साहित्यामध्ये गझल या विषयांचा सखोल अभ्यास तसेच सादरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या माध्यमातून होत आहे. जगजित सिंह यांना गुरू मानून, गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी त्यांच्या जयंती तसेच पुण्यतिथी दिनी नाशिक मध्ये स्वखर्चाने मोठा कार्यक्रम ते करतात. निदा फाजली, सुदर्शन फाकिर, गुलजार, जावेद अख्तर अशा दिग्गजांच्या शायरांचा मानवी जीवनाचा पट उलगडून दाखवणार्‍या रचनांचा अभ्यास सध्या ते करत आहेत.
 
 
संगीताची साधना करणारे गोखले कुटुंब हे संपूर्णत: संगीतमय आयुष्य जगणारे. त्यांच्या पत्नी वीणा गोखले यादेखील संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्यांचा मुलगा सुर गोखले हादेखील उत्तम गायक असून तो अस्सल जयपूर घराण्याची अभिजात शास्त्रीय संगीत शैलीचा अभ्यास करत आहे.
 
 
त्यांना आजवर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पंडित जसराज अशा अनेक दिग्ज्जांचा सहवास लाभला आहे. आगामी काळात स्वतंत्र संगीत संयोजक म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा असून, त्यादृष्टीने त्यांचा अभ्यास सुरू आहे.
 
 
ज्याला आनंद घ्यायचा आहे, त्याने उत्तम संगीत ऐकावे. ज्याला आनंद घेण्यासोबत इतरांच्या जीवनातदेखील आनंद आणायचा आहे, त्याने अवश्य संगीत शिकावे. कलाकाराचा जन्म हा इतरांना आनंद देण्यासाठीच झालेला आहे आणि त्याने त्यासाठी कायमच तत्पर राहिले पाहिजे, असे मत ते मांडतात. घराण्यात कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसताना गोखले यांचा सुरू असलेला प्रवास हा जितका सुरमयी आहे तितकाच पथदर्शकदेखील आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.