संस्कृतीचा समृद्ध वारसा

    27-Jul-2022   
Total Views |

cultuire
 
 
 
‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’चा स्मरणिका प्रकाशन सोहळा दि. २३ जुलै रोजी ब्राह्मण सेवा मंडळ, दादर येथे नुकताच संपन्न झाला. हा कार्यक्रम म्हणजे नुसता स्मरणिका प्रकाशन कार्यक्रम नव्हता, तर सांस्कृतिक समृद्धीचा वारसा सांगणारी एक अनोखी मैफील होती. सामाजिक बंध जपताना ‘संस्कृती संवर्धन’ या कार्यक्रमाचा आस्वाद शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
ब्राह्मण सेवा मंडळाचे सभागृह तसे रस्त्यालगतचे. त्यामुळे सभागृहात सुरू असलेला कार्यक्रम सहज बाहेरून दिसतो. पण आज केवळ कार्यक्रमच दिसत नव्हता, तर कार्यक्रमाची सांस्कृतिक समृद्धी आणि वैचारिक श्रीमंतीही सभागृहाबाहेरही झळकत होती. ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’च्या स्मरणिका प्रकाशन सोहळा होता. अर्थात, ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’चा कार्यक्रम कोणताही असो. मात्र, तो रंगतदार आणि उपस्थित सहभागींच्या कायमच स्मरणात राहावा, असा होणारच. छोट्यातला छोटेखानी कार्यक्रमही चर्चेत राहून त्याचे पडसाद समाज मनावर उमटत राहणारच. स्मरणिका प्रकाशनाचा कार्यक्रमही याला अपवाद नव्हताच. कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक म्हणून मान्यता असलेल्या आपल्या दै. ‘मुंबई तरुण भारत’ची प्रतिनिधी म्हणून मीही तिथे उपस्थित होते.
 
 
प्रत्येक कार्यक्रमाचे एक वातावरण असते. गंभीर, चंचल, पवित्र किंवा अतिशय रटाळ असेही वातावरण असते. या कार्यक्रमाचेही एक वातावरण होते. मंद मोगर्‍याचा सुगंध दरवळवत असावा, यासोबतच नेत्रसुखद दीपकांची आरास असावी, सुवर्ण किरणांची बरसात करत हे दीप परिसरातील नव्हे, तर मनाचाही अंधार दूर करावेत, असे वातावरण. सुरुवातीलाच ‘कल्पांगन सांस्कृतिक केंद्रा’चा सांस्कृतिक कार्यक्रम संतवाणी होणार होता. संतवाणी म्हणजे अभंग असावेत का? भजने असतील का? काय असेल कार्यक्रम? संतवाणी कार्यक्रम सुरू झाला. दुधाचे दातही पडले नसतील, अशी गोड दोन बालकं मंचावर आली. कीर्तनकारांच्या अविभार्वात अतिशय सुंदर मराठीतून त्यांचे सुश्राव्य कार्यक्रम सुरू झाला. या दोघांच्या निवेदन शैलीने सगळे थक्क झाले.
 
 
या दोघांचा कार्यक्रम ऐकताना वाटले, कदाचित हे दोघे भजन करणार असतील. पण नाही. पुढे कार्यक्रम सुरू झाला. विठूराया, पंढरीची वारी आणि संतांच्या वाणी, भारतीय नृत्यशैलीतून मांडण्यासाठी पाच ते सहा कन्या मंचावर आल्या. त्यांचे पदलालित्य, मौखिक विभ्रम केवळ अप्रतिम. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखोबा यांची समाजप्रबोधनाची आणि विठूप्रेमाचे अभंग भारतीय नृत्यशैलीतून साकार होताना पाहणे, हा एक अद्भुत अनुभवच होता. अस्मादिकांसकट उपस्थित बहुसंख्यजणांनी पंढरीची वारी केलेली नाहीच. पण पंढरीच्या वारीचा अनुभव त्या सावळ्या विठूरायाचे दर्शन या संतवाणीतून आम्हा सगळ्यांना झाले. कार्यक्रमाची सांगता सांघिक गीतनृत्याने झाली. त्यानंतर प्रमुख कार्यक्रमाला सुरूवात झाली.
 
  
‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’चे संस्थापक मोहन सालेकर, संस्थेचे विश्वस्त अजित सोनी आणि समाजशील उद्योजक भरत छेडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सभागृहात उपस्थित बहुतेक सगळेच जण सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. ज्येष्ठ आणि तरुणही. ज्येष्ठ नागरिकही होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी आसनस्थ झाले. मात्र, भरतभाई छेडा यांनी मंचावर येऊन सत्कार स्वीकारण्यास विनम्र नकार दिला. समोर सभागृहात उपस्थित दर्शकांसोबत बसण्याची त्यांनी अनुमती मागितली. असे का? तर त्यांचे म्हणणे की, “सत्कार स्वीकारणे किंवा उपस्थितांना मार्गदर्शन करण्याइतके मी काहीही भव्यदिव्य कार्य केलेले नाही. उलट सभागृहातील ज्येष्ठ व्यक्तींनी समाजासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत मी बसणार आहे.” कार्यक्रमामध्ये ‘कल्पांगण संस्थे’च्या सर्वच कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
 
 
कार्यक्रमाची सूत्रसंचालन धुरा उज्ज्वला शेट्ये यांनी हाती घेतली. अत्यंत सहज सुंदरपणे त्या सूत्रसंचालन करत होत्या. संस्थेचे विश्वस्त अजित सोनी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेच्या मान्यवर अलकाताई यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले. कोरोना काळात संस्थेने अनेक उपक्रम राबवले. कोरोना आहे, म्हणून संस्था शांत बसली नाही. या काळात ऑनलाईनच्या माध्यमातून संस्थेने उपक्रम राबवले. या काळात संस्थेच्या पदाधिकार्‍यांना कोरोनाने गाठले. मात्र, तेवढ्या पुरती संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विश्रांती घेतली आणि पुन्हा सगळेजण ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’च्या कामाला लागले. अजितजी आणि अलकाताई या दोघांनीही ‘संस्कृती संवर्धन’च्या कामासंदर्भात माहिती दिली. ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनचरित्रावर आधारित अभ्यासक्रम योजना आणि परीक्षा घेणे, संस्कृती संवर्धनासाठी विविध माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांचे एकत्रिकरण करणे, दिवाळी, मकरसंक्रांती आणि इतरही उत्सवांमध्ये ‘संस्कृती संवर्धन’चे कार्यकर्ते स्थानिक स्तरांवर अनेक उपक्रम राबवत असतात. संस्थेचे ३०० सेवाभावी कार्यकर्ते अत्यंत नि:स्पृहतेने संस्कृती संवर्धनासाठी कार्य करत असतात.
 
 
यानंतर कार्यक्रमाचा मुख्यबिंदू आला. अत्यंत आकर्षक अशा स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुखपृष्ठ आणि अंतरंग दोन्हीही शब्दातीतच. कोरोनाचा काळ सोडल्यानंतरची ही पहिली स्मरणिका होती. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या कार्यासाठी निधी गोळा करणार्‍या कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला. मात्र, यावर सत्कार झालेल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, “संस्थेच्या कार्यासाठी ९० टक्के निधी मोहन सालेकरच जमवतात. आम्ही फक्त तो निधी आणण्यासाठी त्या-त्या ठिकाणी जातो.” कार्यक्रमामध्ये संस्थेचे संस्थापक मोहन सालेकर हे मनोगत व्यक्त करणारच नव्हते. मात्र, सभागृहातून सगळ्यांनीच एका सुरात मोहन सालेकरांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली. सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मनोगत व्यक्त केले.
 
 
 येणार्‍या काळात ‘संस्कृती संवर्धन’चे कार्य त्यांनी विशद केले. सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि उपस्थितांचे त्यांनी आभार मानले. प्रत्येक कार्यक्रमाच्या यशामागे ‘सायलेन्स’ कार्यकर्ताही असतो. तसे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठीही ‘संस्कृती संवर्धन’चे पडद्यामागचे सर्वच कार्यकर्ते होते. त्यापैकीच एक कार्यकर्त्या अस्मिता आपटे. प्रमुख अतिथींचा परिचय करून दिल्यानंतर, त्या कार्यक्रमाच्या इतर नियोजनात व्यस्त होत्या. मोहन सालेकर आणि त्यांचे सगळे सहकारी, ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’ या सार्‍यांचे खूप खूप कौतुक वाटले. कारण, शेकडो कार्यकर्त्यांना केवळ संस्कृतीच्या रक्षणासाठी एकत्र आणण्याची किमया यांनी केली आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.