‘टीएमटी’कडून ‘ठाणे आपुले चमकवूया’चे मातेरे

पावसाळ्यात धुळीने माखलेल्या बसेसमधून प्रवाशांना सेवा

    26-Jul-2022
Total Views |

bus
 
ठाणे: ‘स्वच्छ सर्वेक्षणा’मध्ये अव्वल स्थानी येण्यासाठी ठाणे मनपाच्यावतीने ‘टीएमटी’ बसेसवर ‘ठाणे आपुले चमकवूया’ या शिर्षकाच्या जाहिराती करून नागरिकांना स्वच्छतेचे उपदेश करण्यात आले आहेत. मात्र, या घोषवाक्याचे मातेरे ठाणे मनपाच्या परिवहन विभागाकडून सुरू असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘टीएमटी’च्या बसेसवर साचणारी धुळ साफ होत नसल्यामुळे ‘ठाणे आपुले चमकवूया’चे घोषवाक्यच धुळीने माखून निघाले आहे. त्यामुळे शहरातील प्रवासी वाहतुकीमध्ये योगदान देणार्‍या ‘टीएमटी’च्या बसेस स्वच्छ कधी होणार, असा सवाल ठाणेकरांकडून सध्या विचारला जात आहे.
 
 
ठाणे मनपाच्या परिवहन उपक्रमाचा ठाण्यातील प्रवासी वाहतुकीमध्ये महत्त्वाचा वाटा असून या बसेसवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठीही कोट्यावधींचा खर्च केला जातो. ‘टीएमटी’च्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणूनही बसगाड्यांकडे पाहिले जाते. उन्हाळ्यात धुळीमुळे या बसेस नेहमीच माखलेल्या असतात.
 
 
परंतु, पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळे या गाड्या किमान साफ होण्याची शक्यता असते. परंतु, ठाणे शहरामध्ये फिरल्यानंतर शहरातील बहुसंख्य ‘टीएमटी’ बसेसवर धुळीचा मोठा थर साठल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, ठाणे शहराच्या स्वच्छतेचा संदेश देणार्‍या जाहिराती असलेल्या बसेसवरही धुळीचा थर साचल्याने यावरील स्वच्छतेचा संदेशही अस्पष्ट झाला आहे. यामध्ये ठाणे मनपाकडून जाहीर करण्यात आलेले ‘स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम येऊया,’ ‘ठाणे आपुले चमकवुया’ हे घोषवाक्यही दिसेनासे झाले आहे. त्यामुळे ‘टीएमटी’च्या बसगाड्या आधी चमकवा, अशी उपरोधिक टीका प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
 
 

अस्वच्छतेसह ‘टीएमटी’ची सेवाही तोकडी
 
‘टीएमटी’च्या वागळे इस्टेट आगाराची दुर्दशा झाली असून हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. कोपरी स्थानकातून तर लांब पल्ल्याचे बोरिवली, मीरा रोड, नालासोपारा या सेवांना घरघर लागली असून सर्व प्रवासी अन्य महापालिकेच्या परिवहन सेवांनी पळवली आहे. त्यातच आहेत त्याही बसेस अस्वच्छ आहेत. शिवाय धुराच्या लोटामुळे गाड्या खराब होत असल्याने त्यांची दैनंदिन स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.