आमचं राजकारण हिंदुत्वासाठी! त्यांचं 'हिंदुत्व' राजकारणासाठी : ठाकरे
26-Jul-2022
Total Views |
मुंबई : "शिवसेनेचं राजकारण हिंदुत्व मजबूत होण्यासाठीच. ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, २०१४मध्ये युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही.", अशी प्रतिक्रीया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी खरं हिंदुत्व कुणाचं हे सांगताना उत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, "बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोपं घडवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना, माताभगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, चला परत उठा. आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया. ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे."
"माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं.", अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.