आमचे सरकार नेहमी निसर्ग संवर्धकांच्या पाठिशी: देवेंद्र फडणवीस

कांदळवन कक्षाच्या पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

    26-Jul-2022   
Total Views |
puraskar
  
 
 
मुंबई: “निसर्गाशी मैत्री करणे गरजेचे आहे, जे काही निसर्गाने दिले आहे त्याचे संवर्धन करणे प्रत्येकाला शक्य नसले, तरी जे हे काम करत आहेत, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. म्हणूनच हे सरकार नेहमी अशा व्यक्तींच्या आणि संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते कांदळवन कक्षाच्या कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
 
 
‘आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिना’च्या निमित्ताने हा पुरस्कार सोहळा मंगळवार, दि. २६ जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहात पार पडला. गेल्या दहा वर्षांत राज्यातील कांदळवन आणि सागरी परिसंस्थेच्या संवर्धनात सक्रीय सहभाग नोंदवणार्‍या व्यक्तिमत्त्वांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधान सचिव, वने- वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक एन वासुदेवन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये, महाराष्ट्र सर्कलचे पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग अतिथी म्हणून उपस्थित होते.
 
 
कांदळवनांचे महत्त्व अधोरेखित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ ‘निसर्ग’ आणि ‘तौक्ते’ या चक्रीवादळांमुळे झालेले नुकसान हे कांदळवनामुळे काही प्रमाणात कमी झाले. महाराष्ट्राने कांदळवनांसंदर्भात नेहमी ’प्रोग्रेसिव्ह’ भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून गेल्या काही वर्षांमध्ये कांदळवन कक्षाने कांदळवन आच्छादित क्षेत्र वाढवण्याचे काम केले. त्याच बरोबर उपजीविका उपक्रमही राबविले आहेत. यामुळे खर्‍या अर्थाने हे शाश्वतेकडे नेणारे उपक्रम आहेत. या उपक्रमांमुळे कांदळवनांचे संवर्धन झाले, गावांना रोजगार मिळाला आणि एकप्रकारे निसर्गाशी मैत्रीही झाली आणि मानवतेच्या व्यापक हितासाठी अशाप्रकारे निसर्गाशी मैत्री करणे गरजेचे आहे,” असे फडणवीस म्हणाले. तसेच मुंबई शहर आणि उपनगरातील खासगी जमिनीवरील कांदळवन क्षेत्रात वाढ करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना आखण्याची सूचना वन विभागाला केल्याचे सांगत त्याकरिता आवश्यक ते पाठबळ शासनाकडूनही दिले जाईल, असेह आश्वासन फडणवीस यांंनी यावेळी बोलताना दिले.
 
 
 
 
 
 
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “ विकास करत असताना पर्यावरण संतुलनाची जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्याचे भानही राखावे लागेल. त्यादृष्टीने कांदळवन कक्ष करत असलेले काम फार महत्त्वाचे आहे,”
ते पुढे म्हणाले की, “कांदळवन कक्ष आणि त्या माध्यमातून कांदळवन संवर्धन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील कांदळवन क्षेत्राची वाढ होत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. कांदळवन हे अनेक नैसर्गिक आपत्तींना रोखते, याचा अनुभव आपण घेतला आहे. कांदळवनाने वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये किनारपट्टीवरील अनेक भागांचे संरक्षण केले आहे. म्हणूनच कांदळवन संरक्षणासाठी आणि निसर्गसंपदेच्या जतनासाठी काम करणार्‍यांचे कौतुक हे करावेच लागेल. एकीकडे आपण कांदळवन संरक्षणाचा प्रयत्न करीत आहोत आणि दुसरीकडे उपजीविका योजनेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवत आहोत, ही महत्त्वाची गोष्ट आहे,” असे सांगत एकनाथ शिंदे यांनी कांदळवन प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
 
 
प्रधान सचिव (वन), महसूल आणि वन विभाग वेणुगोपाल रेड्डी यावेळी बोलताना म्हणाले की, “कांदळवन परिसंस्थेवर अवलंबून असलेले लोकांच्या उपजीविका वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देणारा हा सोहळा आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या राज्यात कांदळवन क्षेत्रात सातत्याने वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ लोकसहभागातून साध्य झालेली आहे. किनारपट्टीवरील लोकसमुदायाने कांदळवनाचे संरक्षण करताना, त्यांच्या उपजीविकेमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. संवर्धन, संरक्षणासोबतच शाश्वत पद्धतीने उपजीविका निर्माण करण्याचा प्रयत्न कांदळवन कक्षाच्या कांदळवन प्रतिष्ठानच्या मार्फत होत आहे.”
 
 
 
 
पुरस्कार्थींचा सन्मान
यंदा कांदळवन कक्षाला दहा वर्षे पूर्ण झाली. या दहा वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा अहवाल या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आला. तसेच ‘महाराष्ट्राची सागरी संपदा’ आणि ‘महाराष्ट्राची कांदळवन संपदा’ या दोन पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. त्याच बरोबर जनरल पोस्ट ऑफीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सोनेरेशिया अल्बा - पांढरी चिप्पी’चे (राज्य कांदळवन वृक्ष) विशेष पोस्टल कव्हर आणि महाराष्ट्रातील कांदळवनांच्या दहा प्रजातींची पोस्टकार्ड्सदेखील प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी वेळास-आंजर्ले कांदळवन आणि कासव संवर्धन कार्यात मोलाचे योगदान देणार्‍या मोहन उपाध्ये यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, ‘उत्तम कार्य करणारे प्रकल्प सहयोगी’ या पुरस्काराने रत्नागिरीचे स्वस्तिक गावडे आणि सिंधुदुर्गचे अमित रोकडे यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ‘उत्तम कार्य करणारे उपजीविका तज्ज्ञ’ म्हणून अनिकेत शिर्के यांन पुरस्काराने गौरविण्यात आले. सागरी कासवांवर मोफत आणि प्रभावी उपचार करणार्‍या डॉ. रीना देव यांचाही यावेळी विशे पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
 
पुरस्कार्थीं:
उत्तम कार्य करणारे प्रकल्प सहयोगी
1. मृणाली डांगे (मत्स्य, सिंधुदूर्ग)-उत्तम कार्य करणारे प्रकल्प सहयोगी
2. स्वस्तिक गावडे वने, रत्नागिरी
2. अमित रोकडे मत्स्य, सिंधुदूर्ग
3. शुभम भाटकर मत्स्य, रत्नागिरी
3. निरज कोरगावकर मत्स्य, सिंधुदूर्ग
 
उत्तम कार्य करणारे वन कर्मचारी
1. ज्ञानेश्वर मस्के वनरक्षक, भाईंदर
2.सचिन मोरे वनपाल, ठाणे
3. हर्षल साठे वनपाल, गोराई
 
 
उत्तम कार्य करणारे स्वयं सहायता गट 
1. कडोबा गट, सिंधुदूर्ग
2. शिव मंदिर जिताडा पालन गट, ठाणे
3. श्री दत्तगुरू जिताडा पालन गट, पालघर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.