‘स्मार्ट’ म्हणजे काय?

    26-Jul-2022
Total Views | 220

smart
 
 
आपण अनेक वेळा एखादी व्यक्ती किती ‘स्मार्ट’ आहे, याबद्दल बोलत असतो. अर्थात, ‘स्मार्ट’ असणे या संकल्पनेबद्दल अनेक लोकांचे विविध आणि गतिशील असे दृष्टिकोन आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे तर अप्रतिम सौंदर्यासारखेच ‘स्मार्ट’ असणे ही एखाद्याच्या नजरेत भरणारी गोष्ट आहे.
 
 
‘स्मार्ट’ असणे ही कदाचित एखाद्या विशिष्ट कोनातूनच असू शकते. जसे की, कोणी संवाद साधण्यात ‘स्मार्ट’ असते, पण व्यवसाय करण्यात नाही. काहींना ज्ञानाचा व्यवस्थित वापर करून समस्यांवर समर्पक उत्तर पटकन शोधता येते. काहींना लक्ष केंद्रित करून एखाद्या गोष्टींचा छान आढावा घेता येतो. अर्थात, सगळेच लोक ‘स्मार्ट’ नसतात, हे सत्य आहे. सगळेच ‘स्मार्ट’ हे धुरंधर श्रीमंत आणि यशस्वी असतात, असेही नाही. अगदी तळागाळातसुद्धा आपल्याला ‘स्मार्ट’, बिलंदर आढळतात. धनाढ्य आणि यशस्वी लोकसुद्धा ‘स्मार्ट’ असतील, याची ग्वाही देता येत नाही.
 
 
सगळेच राजकारणी ‘स्मार्ट’ असतात, असेही नाही. कारण, ते विविध विचारांचे, वेगवेगळ्या पातळीवर सक्षम, जोखीम घेणारे, विश्लेषणात भिन्नता असणारे, प्रगल्भ, जलद जुळवून घेणारे असे लोक असतात. यातील काही धूर्त प्रकारचे ‘स्मार्ट’ लोक असतात. काही विघातकही असतात. केव्हा केव्हा ‘स्मार्ट’ असण्याचा तात्पुरता फायदा लोकांना होतो, पण दीर्घकाळात ते सोयीस्कर नसतं. आपलं ध्येय मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची इच्छा असणं, ही एखाद्याने स्वत:साठी केलेली ‘स्मार्ट’ गोष्ट असते.
 
 
आपण कितीही समजण्याचा प्रयत्न केला, तरी ‘स्मार्ट’ ही एक धुक्यातली सहज न कळणारी अस्पष्ट अशी संज्ञा आहे. शेवटी ती आपण तिला कसं समजून घेतो, यावर अवलंबून आहे. कारण, ती आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. काहींना आपण विविध विषयांत पारंगत असणे म्हणजे ‘स्मार्ट’ असणे असे वाटते. काही लोक राजकारणात आणि व्यवसायात वा कलाप्रांतात भरारी मारणार्‍या व्यक्तींना ‘स्मार्ट’ समजतात. मराठीत ‘स्मार्ट’ म्हणजे चलाख, हुशार, वस्ताद, अद्ययावत, चुणचुणीत, बुद्धिमान, तरतरीत असे अनेक शब्द आहेत. विल्यम शेक्सपियरनी एका ठिकाणी एक मजेशीर वाक्य म्हटले आहे की, ''A fool thinks himself to be wise but a wise man knows himself to be a fool.'' म्हणजे तुम्ही चुका करू शकता, हेच समजणं मुळात शहाणपणाचं लक्षण आहे. अर्थात, या वाक्याचा गर्भितार्थ महान आहे.
 
 
अनेक लोकांना ‘स्मार्ट’ आणि बुद्धिमान या संज्ञा सारख्याच वाटतात. कारण, हे शब्द आपण अदलाबदली करुन वापरतो. तथापि या शब्दांचा अर्थ आणि वापर यात मुळात फरक आहे. ‘स्मार्ट’ हा शब्द आपण भावनिक निर्णय घ्यायची क्षमता किंवा चलाखीने व्यवसाय करायची कला अशा गोष्टीत वापरतो. बुद्धिमत्ता ही आपली जन्मजात संपत्ती आहे, तर शहाणपणा किंवा ‘स्मार्टनेस’ आपण कमावलेली बाब आहे. आपण जेव्हा शिकतो वा अभ्यास करतो तेव्हा आपण त्या विषयात ‘स्मार्ट’ बनतो. काही विषय हे आपल्या जीवनातील अनुभवाची मालिका असतात.
 
 
आपला बुद्ध्यांक आपल्या बुद्धिमत्तेचे मोजमाप आहे आणि ते बदलत नाही. ते आपल्या जनुकीय क्षमतेतून आलेले आहे, आनुवंशिक आहे. बुद्धिमत्ता ही अनेकवेळा आपल्या अत्याधुनिक किंवा वैविध्यपूर्ण ज्ञानाशी आपण जोडतो. एखाद्याला आपण तो/ती किती हुशार आहे, असे सांगतो तेव्हा आपण त्याच्या ज्ञानाच्या अगाधतेविषयी त्यांची विशेष प्रशंसा करतो. ‘स्मार्टनेस’ हा मोजता येत नाही. ‘स्मार्टनेस’चा जो शहाणपणा आहे, तो आपल्या पूर्वी जाणून घेतलेल्या ज्ञानाचा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर करण्याची पद्धत आहे. त्यात प्रत्यक्ष उपयोग आहे, कौशल्य आहे. चलाखी आहे म्हणून जेव्हा काहीच मार्ग दिसत नाही, अशी परिस्थिती येते तेव्हा केवळ बुद्धी कामाला येत नाही, तर वस्तुनिष्ठ ‘स्मार्ट’ मन रस्ता पार करायला शिकवते.
 
 
एखाद्या विशिष्ट परिस्थितीत उपयुक्त निर्णय कसा घ्यायचा, यासाठी चलाखी लागते. साहजिकच या चलाखीत भावूकता कमी आणि व्यावहारिक प्रवृत्ती अधिक असते हे निश्चित. आजच्या काळात आपण कसे दिसतो, रोजच्या व्यवहारात कसे वागतो, यातसुद्धा ‘स्मार्टनेस’चा उल्लेख केला जातो. कधी कधी अतिहुशार आहेस वा ‘स्मार्ट’ आहेस, असे एखाद्या व्यक्तीला आपण व्यंगात्मक वा छद्मीपणेसुद्धा म्हणतो. त्यात त्या व्यक्तीचा अतिशहाणपणा, अरेरावी, लुच्चेगिरी अभिप्रेत आहे. हे अतिशहाणे दुसर्‍यांना कमी लेखण्यात, दुसर्‍यांचा फायदा घेण्यात, संधिसाधूपणा करण्यात निष्णात असतात. अशा लोकांविषयी आपल्याला नेहमीच सल्ले मिळतात ‘सावध राहा तो ‘स्मार्ट’ आहे.’
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा, गावठाणनिर्मितीसाठी सर्वेक्षण होणार

मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा, गावठाणनिर्मितीसाठी सर्वेक्षण होणार

गेल्या ३५-४० वर्षांपासून वन जमिनीवरील हक्काच्या घरांसाठी संघर्ष करणाऱ्या मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मोखावणे-कसारा गावात गावठाण निर्मितीसाठी वन, महसूल आणि रेल्वे विभागाच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर या जमिनीवरील रहिवाशांना नोटीसा बजाविल्या जात असल्या, तरी त्यांच्याबाबत राज्य सरकारला सहानुभूती असल्याची ग्वाही वन मंत्र्यांनी दिली. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली...

पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून, मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. देशाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल मी मोदी सरकारचे आणि व्यक्तिशः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो व आभारही मानतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121