वनवासी समाजासाठी....

    26-Jul-2022   
Total Views |

mans
 
 
 
स्वार्थापलीकडे जाऊन समाजासाठी त्यातही दुर्बल वंचित घटकांसाठी कार्य आणि विचार करणारी माणसे समाजाची संपत्ती असतात. त्यापैकी एक मनोरचे दिलीप लोखंडे...
 
 
वनवासी पाड्यातील वय वर्ष एक असलेली ती बालिका, तिचे दोन्ही पाय आतल्या बाजूला वळलेले इंग्रजीतल्या ‘एल’ अक्षरासारखे. समाजातल्या रिवाजाप्रमाणे तिचे पालक तिला भगताकडे न्यायचे. पण तिला काही फरक पडला नाही. या मुलीवर कुणाचा कोप असेल? अंधश्रद्धेमुळे आई-बाबांच्या मनात नाना शंका. जव्हार-मोखाडा परिसरातील वनवासी भागात सामाजिक कार्य करताना ही बालिका दिलीप लोखंडे यांना दिसली. ते तिच्या आई-बाबांना म्हणाले, योग्य उपचार, शस्त्रक्रिया करून ही बरी होऊ शकते. मात्र, पालकांनी टाळाटाळ केली. दिलीप यांनी मग हे पालक कुणाचे ऐकू शकतात यासंदर्भात माहिती काढली आणि गावातल्या सरपंचांना घेऊन ते पालकांकडे गेले. शेवटी बालिकेला डॉक्टरकडे नेण्यासाठी पालक तयार झाले. या बालिकेवर पालघर, ठाणे आणि मुंबई येथील रुग्णालयांमध्ये वर्षभर उपचार सुरू झाले. अर्थात उपचाराचा खर्च पालक उचलू शकतच नव्हते. पण बालिकेच्या पायाची शस्त्रक्रिया व्हावी म्हणून दिलीप यांनी अतोनात प्रयत्न केले.
 
 
मुंबईच्या वाडिया रुग्णालयात उपचार आणि शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेने इतर बालकांसारखेच तिचे पाय सरळ झाले. त्या बालिकेला पाहून त्या पाड्यातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या गावातील अनेक पाड्यात आरोग्यासंदर्भातली अंधश्रद्धा जाऊन एक नवी दृष्टी तयार झाली.
 
 
हा क्षण दिलीप यांच्या आयुष्यातला सगळ्यात आंनदाचा क्षण. दिलीप यांनी गेल्या १५ वर्षांत पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, मनोर वगैरे परिसरातील वनवासी पाड्यातील एक हजारपेक्षाही अधिक मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. अनेक दिव्यांग बालकांची शस्त्रक्रिया करून त्यांनी यशस्वी जीवन जगावे यासाठी दिलीप यांनी अक्षरशः रक्ताचे पाणी केले. कोण आहेत हे दिलीप महादेव लोखंडे? तर ते आहेत वनवासी बांधवांचे उत्थान व्हावे म्हणून गेली तीन दशके वनवासी पाड्यावर पायाला भिंगरी लाऊन फिरणारे स्वयंसेवक. रा. स्व. संघाच्या विचारांची प्रेरणा घेऊन जिथे जिथे म्हणून गरज असेल तिथे सेवा कार्य करण्याचा वसा त्यांनी उचलला.
 
 
लोखंडे कुटुंब स्थाईक तसे मनोरचेच. त्यांचे पिता महादेव आणि आई चंद्रप्रभा. महादेव यांचा लाकडाचा व्यापार. दिलीप यांचे आजोबा काशिनाथ. ते अतिशय समाजशील. ४०-५० वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी मनोर फारसे सुधारलेले नव्हते. त्या काळात काशिनाथ घराच्या बाजूला दोन मोठे पाण्याचे माठ भरून ठेवत. का? तर मनोरच्या बाजारात आजूबाजूच्या वनवासी पाड्यातले बांधव तासंतास चालत दररोज रानमेवा विक्रीसाठी आणि काही कामासाठी यायचे. मनोरमध्ये येईपर्यंत ते तहानलेले असत. काशिनाथ लहानग्या दिलीप यांना सांगत, “बाळा हे बांधव दुरून येतात. आपण त्यांना खायला काही देऊ शकत नाही. पण प्रेमाने पाणी तरी प्यायला देऊ शकतो.” माठातले पाणी संपले की, पुन्हा बैलगाडीतून पाणी भरून आणून त्या माठात टाकणे हे काम दिलीप यांचे असे. याच काळात रा. स्व. संघाचे दामुअण्णा टोकेकर आंभाण येथील वनवासी वसतिगृहाच्या कामासाठी यायचे. या सगळ्यामुळे दिलीप यांच्या मनात लहानपणापासूनच वनवासी बांधवांविषयी करूणा, आपलेपणा निर्माण झाला.
 
 
त्यांचे काका तुकाराम हे संघाचे स्वयंसेवक. तसे दिलीपही लहाणपणापासूनच संघ शाखेत जायचे. सगळे सुरळीतच होते. मात्र, दहावी इयत्तेत असताना त्यांचा अपघात झाला. मणक्यावर शस्त्रक्रिया झाली आणि पायात रॉड बसवले गेले. याच काळात काँगे्रसने देशावर आणीबाणी लादली. दिलीप आणीबाणी विरोधातल्या आंदोलनात सामील झाले. आंदोलन केले म्हणून पोलिसांनी दिलीप आणि सहकार्‍यांना पकडले. सगळ्यांना एक महिना तुरूंगवास भोगावा लागला. त्यानंतर ते पुढे पुन्हा आजारी पडले. त्यामुळे दहावीचे एक वर्ष वाया गेले. पण दिलीप यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी ‘ऑटोमोबाईल’ अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. अनेक ठिकाणी नोकर्‍याही केल्या. अगदी मुंबईतही दोन वर्षे नोकरी केली. पण वनवासी पाड्यांवर सेवाकार्य करावे म्हणून ते पुन्हा मनेारला परतले. यादरम्यान त्यांचा विवाह दिप्ती यांच्याशी झाला. दिप्ती यांनी दिलीप यांना नेहमीच साथ दिली. असो, मुंबईचे ‘स्वामी समर्थ ट्रस्ट’, ‘प्रयाग फाऊंडेशन’, विद्यार्थी मित्र मंडळ आणि इतर अनेक सेवाभावी संस्था व व्यक्तीही दिलीप लोखंडे यांच्या माध्यमातून जव्हार, मोखाडा, शिवाजीनगर, विक्रमगड आणि मनोर येथील वनवासी पाड्याशी जोडले गेले.
 
 
या संस्था आणि व्यक्ती न चुकता अगदी विठुरायासाठी पंढरीची वारी करावी तसे या वनवासी पाड्यावर सातत्याने येतात. आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्यासंदर्भातली मदत करतात. मोखाडा आणि जव्हारच्यामध्ये नांगरमोडा नावाचा वनवासी पाडा आहे. या पाड्यावर शाळा नाही. पूर्वी विद्यार्थ्यांना शाळेसाठी नदी पोहून पार करून जावे लागायचे. दिलीप यांनी मुलांची परिस्थिती दानशूर व्यक्तिकडे मांडली. आज या वनवासी पाड्यातल्या मुलांसाठी ‘जानकी संस्थे’तर्फे शैक्षणिक वसतिगृह सुरू झाले. विक्रमगडमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करणे गरजेचे होते. दिलीप यांनी निलेश सांबरे यांच्याकडे शब्द टाकला आणि तिथे ५० दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वसतिगृह सुरू झाले. दिलीप यांच्या नुसत्या शब्दावर मोठमोठी समाजकेंद्रे उभी राहतात. याचाच अर्थ वनवसाी क्षेत्रात समाजकार्य करताना त्यांनी किती विश्वास आणि आपलेपणा निर्माण केला असेल? निःस्पृह कामाचा किती मोठा परिघ निर्माण केला असेल? समाजकार्यासाठी बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारे दिलीप. त्यांच्यासारख्या व्यक्तिंमुळेच समाजात सत्कार्याचा सूर्य उगवत असतो हे नक्की.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.