एक सूर

    26-Jul-2022
Total Views |

modi
 
 
आपल्या देशातील वातावरण निर्मळ होत असताना त्यास प्रदूषित करण्याचे प्रयत्न आपल्या देशातीलच काही लोक अजब आणि न पटणारे तर्क देत करीत आहेत. यात त्यांची खेळी कधी कधी यशस्वी ठरत असल्याने आपल्याच देशाचे नुकसान होत आहे, पण नेमकी त्याकडेच डोळेझाक करून आताची व्यवस्थाच किंवा धोरणे कारणीभूत असल्याचा कांगावा हे लोक करीत आहेत. सुदैवाने अशा कांगावाखोर लोकांना खोटे ठरविण्यास ही निर्मळ यंत्रणा प्रभावी ठरत आहे.
 
 
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार केला आणि भारतातील सांस्कृतिक विषमतावादाची पेरणी करणार्‍यांच्या विचारात दुष्काळाचे सावट येऊ लागले. हे सर्व येथे नमूद करण्याची आवश्यकता एवढ्यासाठीच की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणलेले नवे शैक्षणिक धोरण आगामी पिढ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि दिशादर्शक असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या पुण्यनगरीत जो काही एक वैचारिक व समर्थनीय सूर लागला आहे तो बेसूर होणार नाही याची काळजी आता आपण सर्वांनी घेतली पाहिजे.
 
 
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात असलेल्या प्रा. शांतिश्री पंडित यांची नियुक्ती केल्यानंतर पुण्यात आयोजित गौरव सोहोळ्यात त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचा पुरस्कार करताना यामुळे देशात भावी पिढीचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे नमूद केले होते. गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनीदेखील नव्या शिक्षण धोरणाबाबत एक समान सूर लावताना, भारत प्राचीन काळापासून ज्ञानाचे देवालय असल्याचे सांगत युवकांनी पुन्हा शिक्षक बनावे आणि जगभरात जाऊन जगाला सुसंस्कृत बनविण्याचे आवाहन केले. नेमका हाच सूर पुण्यात रविवारी झालेल्या कार्यक्रमात ‘इनिशिएटिव्ह फॉर मॉरल अ‍ॅण्ड कल्चरल ट्रेनिंग फाऊंडेशन’चे संस्थापक स्वामिनाथन गुरूमूर्ती यांनी आळविला.
 
 
आता राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणार्‍या शिक्षण व्यवस्थेने भारतीय समाज व्यवस्थेची मूल्ये रूजवावी, असेही महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले आहे. विद्येचे माहेरघर असणार्‍या पुणे शहरात दत्तात्रेय होसबळे, डॉ. शांतिश्री पंडित आणि स्वामीनाथन गुरूमूर्ती यांनी नेमका एक समान सूर आळविताना भावी पिढीला जणू उज्ज्वल भवितव्य घडविण्याची ऊर्जा, दिशा दिली यात संदेह नाही.
 
 
एकताल
 
 
 
आता हे झाले बुद्धिवंतांचे बौद्धिक. पुण्यातील भावी पिढीदेखील काही कमी नाही, या पिढीने किंबहुना त्यांना घडविणार्‍या गुरूजनांनीदेखील आपल्या भारतीय प्राचीन परंपरांना सादर करताना इतिहासातून घ्यावयाचे धडे आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक याची आदर्श उदाहरणे असणारे प्रसंग चितारले आहेत. हे केवळ पुण्यात घडता कामा नये, सगळ्या भारतात हा एक सूर आणि एक ताल असा नियोजनबद्ध निनाद घुमला पाहिजे, जेणेकरून भारतीय सांस्कृतिक पाया आणखी मजबूत होऊ शकेल.
 
 
काही लोक विनाकारण त्यात कुणाचा इतिहास खरा कुणाचा खोटा असे सांगून खोडा घालण्याचे रिकामे काम करतात आणि वैचारिक प्रदूषण निर्माण करीत असतात. मात्र, त्यालाही आजची पिढी भीक घालीत नाही हेदेखील सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. कारण आजच्या पिढीला दादोजी कोंडदेव कोण होते, रामदास स्वामींचे कार्य काय, याची जितकी उत्सुकता आहे तितकेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यदेखील या इतिहासातून उमजून घेण्याची गोडी निर्माण होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर जितके उद्बोधक वाटतात तेवढीच आत्मीयता गोळवलकर गुरुजींबद्दलही त्यांना वाटते. हे नमूद करण्याचे कारण असे की, या उदयोन्मुख पिढीसमोर सावरकर समजावून सांगताना या पिढीने ते नृत्य, संगीत, नाटक आणि अभिवाचनातूनदेखील साकार केलेत हेही नसे थोडके.
 
 
टिळक-आगरकर-सावरकर-महर्षी कर्वे अशा थोर लोकांनी पुण्याच्या शिक्षण क्षेत्रात मौलिक भर घातली आहे. त्यामुळे हे शैक्षणिक ज्ञानाचे वैभव जतन करणे भावी पिढीचे कर्तव्य आहे. ते पार पाडण्याची जबाबदारी ही पिढी वैविध्यपूर्ण कार्यक्रमातून स्वीकारत आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आजच्या पिढीने हे इतिहासाचे सुवर्ण युग जपले यातच सारे काही आले. पुणे ही विद्येची नगरी येथील शैक्षणिक संस्थांनी सुुविचारांची पायाभरणी करताना मूल्याधारित शिक्षणाची कासदेखील कधी सोडली नाही. त्यामुळे येथून जी काही बुद्धिवंतांची नावे जगभर पसरली त्याला याच शैक्षणिक विचारांची साथ लाभली व या अशा कार्यामुळे आणखी नावे या देशाचे नाव उज्ज्वल करतील यात संदेह नाही.
 
 
 
- अतुल तांदळीकर
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.