उलगडा‘गोबी’चा

    25-Jul-2022
Total Views |

gobi

 
 
पाणी ज्या परिसंस्थेचा भाग आहे, त्या परिसंस्थेतील सर्वच अधिवासांच्या र्‍हासाला सुरुवात झाली आहे. यामध्ये सागरी आणि गोड्या पाण्याच्या अधिवासाचा प्रामुख्याने समावेश आहे. गोड्या पाण्यातील जैवविविधता ही प्रादेशिक किंवा सागरी परिसंस्थेत अधिवास करणार्‍या प्रजातींच्या दुप्पट दराने र्‍हास पावत आहे. परिणामी, या अधिवासाशी अनुकूलित होऊन त्यामध्ये तग धरून राहिलेल्या प्रजातीदेखील संकटात सापडत आहेत, अशीच एक प्रजात म्हणजे ‘गोबी.’ संशोधनाच्या दृष्टीने फार कमी अभ्यास झालेल्या या प्रजातीचा वेध घेणारा हा लेख...
 
 
माशांमधील जैवविविधता मानवजातीसाठी नेहमीच एक आश्चर्यकारक बाब राहिली आहे. या विशाल विविधतेमध्ये दडले आहेत ‘गोबीफॉर्मेस’ नावाचे हे सूक्ष्मजीव. ‘गोबीफॉर्मेस’ हे ‘गोबी’ मासे म्हणूनही ओळखले जातात. बहुतेक ‘गोबी’ मासे लहान असतात. फिलिपिन्समधील ‘गोबी’ माशांची प्रजाती सर्वात लहान प्रजाती म्हणून ओळखली जाते. त्यांचा आकार दहा मिमी इतकाच असतो, तर कॅरिबियनमधील सर्वात मोठा ‘गोबी’ मासा ‘गोबियोइड्स ब्रॉसेनेटी’ ५० सेमींपर्यंत वाढू शकतो. ‘गोबी’ मासे सहसा त्यांच्या लहान आकारामुळे ओळखले जातात. त्यांच्या पाठीवर दोन पंख (फिन्स) असतात. डोळे मोठे आणि डोके बोथट गोल असते. त्यांचे ‘पेल्विक फिन्स’ एकत्र येऊन वर्तुळाकार चकती बनवतात. याच चकतीच्या माध्यमाने ते नदीच्या पात्रात हालचाल करू शकतात.
 
 
‘गोबी’ मासे बदलाभिमुख असतात. ते सागरी खार्‍या तसेच गोड्या पाण्याच्या अधिवासात राहतात. त्यांच्या या अनुकूलतेमुळे ‘गोबी’ माशांचे २०० पेक्षा जास्त कुळ आणि दोन हजारांपेक्षा जास्त प्रजाती निर्माण झाल्या आहेत. ‘गोबी’ मासे उष्णकटिबंधीय पट्ट्यात आढळून येतात. मात्र, काही प्रजातींनी दक्षिण सायबेरियाच्या थंड हवामानाशीदेखील जुळवून घेतले आहे. याप्रमाणेच, ‘गोबी’ माशांच्या अनेक प्रजातींचे विविध सूक्ष्म निवासस्थानांमध्ये आढळून येतात. यामध्ये दोन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बेटांच्या पर्वतांचा ही समावेश आहे. तसेच, समुद्राखाली ८०० मीटरपर्यंत आढळू शकतात. तरीही त्यांच्या गुप्त स्वभावामुळे त्यांच्यावर पुरेसे संशोधन झालेले नाही. यामुळेच दरवर्षी १० ते २० नवीन प्रजातींचा शोध लावला जातो. यामुळे हे ‘गोबी’ मासे समुद्री जीवांमधील सर्वात वैविध्यपूर्ण जीव आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 
महाराष्ट्रातील या वैविध्यपूर्ण समूहाचा अभ्यास करणे आणि त्यातील विविधता समजून घेणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ‘गोबी’ माशांप्रमाणेच हा अभ्यास महाराष्ट्र आणि मुख्यत्वेकरून मुंबईतील वैविध्यपूर्ण सूक्ष्म अधिवासांना उद्देशून आहे. याची सुरुवात मिठागारांपासून होते. हे सर्वात कठीण अधिवास समजले जातात. क्षारयुक्त खार्‍या पाण्यामुळे जवळजवळ कोणतेही मासे त्यात वाढू शकत नाही. तेथाल माती खूप चिकट असते. तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर गेलेले असते. तरीही या परिस्थितीत, ‘बोलेओफ्थाल्मस’ आणि ‘पेरिओफ्थाल्मस’ या ‘मडस्कीपर्स’च्या प्रजाती उड्या मारताना दिसून येतात. हे ‘मडस्कीपर्स’ त्यांच्या ओलसर त्वचेतून श्वास घेतात. तसेच, त्यांच्या अतिशय मजबूत शेपटीचा वापर करून ते एका कोरड्या मिठागरांमधून दुसर्‍यामध्ये उडी मारतात. पोहण्यापेक्षा सरपटण्यात धन्यता मानणार्‍या या माशांनी आपला वेगळा असा सुरक्षित अधिवास निर्माण केला आहे. या जीवांचा अभ्यास करण्याकरिता समुद्रात उघडणारे गोड्या पाण्याचे प्रवेशद्वार समजले जाणार्‍या कांदळवनाची निवड केली गेली.
 
 
कांदळवनांवर अनेक मोठमोठ्या ‘कार्बन सिंक’, तसेच दूषित पाणी आणि शहरातील सांडपाण्याचा ताण पडतो. तरीही आश्चर्याची बाब म्हणजे, ‘गोबी’ माशांनी या अधिवासामध्ये स्वतःला अनुकूलित केले आहे. आम्हाला, ‘स्टारगेझर’ माशासारखीच ‘एलिओट्रिस फुस्का’ नावाची एक प्रजाती आढळून आली. ही प्रजाती मातीत लपून बसते. त्यांच्या शरीराचा रंग त्यांच्या आजूबाजूला असलेल्या चिकण मातीशी जुळतो आणि छलावरणाद्वारे ते शिकार करतात. या विविध चकाकणार्‍या प्रजातींमध्ये आम्हाला विलक्षण प्रजाती आढळल्या. स्वतःची शिकार होण्यापासून वाचण्यासाठी ते एका काठीची नक्कल करतात. तसाच हा ‘बुटीस बुटीस’ मासा. हा मासा उलटा पोहतो आणि पोहत तो खारफुटीच्या झाडांच्या मुळाशी जातो.
 
 
मुंबईच्या गजबजाटात अनेक लोक ये-जा करत असतात. आपले जीवन सुकर होईल, या आशेने अनेक लोक बाहेरून येतात. तसेच, हे ‘गोबी’ मासेदेखील आहेत. दरवर्षी ‘ट्रायपॉचेन यावनी’ नावाचा ‘बुरोइंग गोबी’ पावसाळा सुरू झाल्यावर येतो. मुंबईकरांप्रमाणेच आपल्या जोडीदारासह निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी हा मासा पावसाळ्याचा पुरेपूर फायदा घेतो. या प्रकारच्या स्थलांतराला ‘अ‍ॅनाड्रोमस मायग्रेशन’ असे म्हणतात. हे मासे विशिष्ट हंगामात समुद्रातून खार्‍या पाण्यात स्थलांतर करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्याचे कौशल्य या ‘गोबी’ माश्यांकडे असते. त्यांचे डोळे अगदी लहान असतात आणि त्वचेच्या थराखाली झाकलेले असतात. यामुळे त्याची दृष्टी कमी होते. परंतु, या जीवाचा बराचसा वेळ चिखल आणि गाळाखाली जातो. तिथे प्रकाश कमीच पोहोचतो. त्यामुळे ही गैरसोय नसून एक अनोखा फायदा यातून होत असतो. ‘कोविड’चे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अल्पावधीतच अशा २० हून अधिक ‘गोबी’ प्रजाती या संपूर्ण अभ्यासात आम्हाला आढळल्या.
 
 
अनेकदा, मुंबई ठाण्याच्या खाडीत मासे कमी आहेत, अशी ओरड ऐकू येते. परंतु, याच अधिवासात आपल्या विचारापलीकडल्या अनेक प्रजाती वास्तव्यास आहेत. या संशोधनात वर्गीकरणावर भर देण्यात आली होती. कुठल्या अधिवासांवर किती दबाव होता आणि कुठल्या प्रजातींची संख्या शहराच्या कोपर्‍यात मर्यादित राहिली यावरदेखील भर देण्यात आला होता. जसे लोक शहरात मोठे होण्यासाठी धडपडतात, त्याचप्रमाणे लहान ‘गोबी’ मासे शहरात टिकून राहण्यासाठी व्यापक संघर्ष करतात.
 
 
गोड्या पाण्याच्या नद्या आणि प्रदूषित खाड्यांपासून ते तेल प्रदूषित महासागरांपर्यंत, या माशांच्या जवळपास सर्व अधिवासांवर प्रचंड दबाव आहे. संशोधनाच्या कमतरतेमुळे, किती प्रजाती धोक्यात आहेत, हे आम्ही मोजू शकत नाही. परंतु, परदेशातील अभ्यासात असे दिसून आले आहे की, पाच गंभीरपणे धोक्यात असलेल्या ‘गोबी’ मासे आहेत, तर १८ असुरक्षित म्हणून सूचिबद्ध आहेत. ‘गोबी’ माशांच्या र्‍हासाला कृषी पद्धती आणि अप्रदेशनिष्ठ प्रजातींचा वावर कारणीभूत आहे. या कुळाची जैवविविधता बघता, अनेक प्रजाती फक्त एका नदीत, एका प्रदेशात किंवा एका बेटावर सीमित असण्याची शक्यता आहे. यामुळे मानवाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होण्याआधीच काही प्रजाती नामशेष होऊ शकतात. या लहान जीवांच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे एखाद्या मोठ्या गोष्टींची सुरुवात आहे. भविष्यात त्यांच्या अधिवासाचे जतन करणे आणि दबाव कमी करणे हे आपले कर्तव्य बनले पाहिजे. मुंबईकर आणि त्यांच्या लोकलच्या जाळ्याप्रमाणेच हे मासे त्यांच्या छोट्या पाण्याच्या प्रवाहाच्या जाळ्यात तग धरून आहेत.
 
 
महाराष्ट्रातील ‘गोबीडी’
 
भारताच्या किनारपट्टीवर खार्‍या आणि गोड्या माशांच्या प्रजातींवर बर्‍यापैकी संशोधन झालेले आहे. मात्र, ’गोबी’ माशांच्या प्रजातींचा वैज्ञानिक अनुषंगाने संशोधन झालेले नाही. त्यामुळे या माशांच्या प्रजातींविषयी फारच अपुरी माहिती उपलब्ध आहे. १९२८ आणि १९७३ या दोनच वर्षी ‘गोबी’ माशांवर शोधकार्य झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या माशांच्या प्रजातींविषयी अनभिज्ञता आहे. शिवाय या प्रजातींसाठी आवश्यक असणारा अधिवासही मानवनिर्मिती कारणांमुळे नष्ट होत आहे. म्हणूनच ’बीएनएचएस’चे शास्त्रज्ञ उन्मेश कटवटे आणि शुभम यादव हे राज्यात आढळणार्‍या ’गोबी’ माशांविषयी शास्त्रीयरित्या शोधकार्य करत आहेत. या प्रजातींविषयी सखोल अभ्यास करण्याचा हेतू त्यांच्या संशोधनकार्यामागे आहे.
 
 
दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा अभ्यास पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे संशोधकांना केवळ मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्येच संशोधनाची संधी मिळाली. या तीन जिल्ह्यांमधील कांदळवने, खाड्या, पाणथळ आणि ज्याठिकाणी गोडे पाणी खार्‍या पाण्याला येऊन मिळते, असे परिसर संशोधकांनी पालथे घातले. यादरम्यान मिळालेल्या प्रजातींचे आकारशास्त्र, अस्थिकलशास्त्र आणि जनुकीय (डीएनए) पद्धतींचा वापर करून वर्गीकरण करण्यात आले.
 
 
येत्या वर्षभरात हा अभ्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पार पडणार आहे. शोधकार्यामधून संशोधकांनी ओळख पटवून २० प्रजातींची नोंद केली आहे. त्यामधील जवळपास आठ ते नऊ प्रजातींची ओळख पटलेली नाही. याशिवाय ’गोबी’च्या अधिवासातील ४४ सहयोगी मत्स्यप्रजातींची नोंद करण्यात आली आहे. नोंद केलेल्या १८ प्रजातींपैकी सात प्रजाती या प्रथमच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सापडल्या आहेत, तर तीन प्रजातींची भारतीय किनारपट्टीवरून प्रथमच नोंद करण्यात आली असून, तीन ते चार प्रजाती या विज्ञानाकरिता नवीन असल्याची शक्यता आहे. याशिवाय भारतात अधिवास नसणार्‍या चार परदेशी प्रजाती संशोधकांना शोधकार्यादरम्यान आढळून आल्या, अशा परदेशी प्रजाती स्थानिक जैवविविधतेकरिता हानिकारक आहेत.
’गोबीडी’विषयी
 
जगभरात उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण वातावरणात ’गोबीडी’ वर्गातील मत्स्यप्रजातींचा आढळ आहे. आकारशास्त्र, इकोलॉजी आणि वर्तनशास्त्राच्या अनुषंगाने ’गोबीड’ वर्गातील माशांमध्ये विविधता आढळते. जगात आढळणार्‍या मत्स्यप्रजातींमधील ३५ टक्के प्रजाती आणि पृष्ठवंशीय प्राण्यांमधील २० टक्के प्रजाती या एकट्या ’गोबीडी’ वर्गातील आहेत. ’गोबी’ माशांच्या साधारण दोन हजार प्रजाती ज्ञात आहेत. जलीय परिसंस्थेतील गोड्या आणि खार्‍या अशा दोन्ही पाण्यांमध्ये या माशांचा अधिवास आहे. खासकरून कांदळवन, खाडी पट्टे आणि ज्याठिकाणी गोडे पाणी समुद्रातील खार्‍या पाण्याला येऊन मिळते, अशा जागांमध्ये ’गोबी’ माशांची विविधता आढळून येते. या माशांमधील प्रजातींचा आकार साधारण 30 सेंमीपासून एक फुटांपर्यंत असतो. मात्र, यातील बहुतांश प्रजाती या लहानच असतात. छोटे जीवजंतू खाऊन हे मासे गुजराण करतात.
उपाययोजना
 
‘गोबी’ माशांच्या अपुर्‍या माहितीमुळे या मत्स्यप्रजातींवर सखोल आणि पद्धतशीर अभ्यास आवश्यक.
 
राज्यात ‘गोबीडी’ वर्गातून नव्या प्रजातींचा उलगडा होण्याची दाट शक्यता असल्याने वर्गीकरणाचा अभ्यास महत्त्वाचा.
 
‘गोबी’ मत्स्यप्रजातींच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन संशोधन आणि धोरणात्मक अंमलबजावणी.
 
कांदळवनांना येऊन मिळणार्‍या गोड्या पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन गरजेचे.
 
ग्रामीण आणि मच्छीमारांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये, म्हणून बेकायदेशीर सोडल्या जाणार्‍या औद्योगिक आणि शहरी सांडपाण्यावर नियंत्रण मिळवणे.
 
परदेशी प्रजातींवर नियंत्रण मिळवण्यासाठी भागधारकांना मार्गदर्शन करणे.
 
 
 
 - शुभम यादव