मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात दुर्घटना महिला जखमी!

    23-Jul-2022
Total Views | 38

thane
 
ठाणे: ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील वागळे इस्टेट, रूपादेवी पाडा येथील ठाणे महापालिकेची पिण्याच्या पाण्याची टाकी (जलकुंभ) २३ जुलै रोजी सकाळी फुटल्याने खळबळ उडाली. ७५ हजार लिटरच्या जलकुंभातील पाण्याच्या प्रेशरमुळे जलप्रलय होऊन २० ते २५ घरांमध्ये पाणी शिरले. तर सहा ते सात घरांचे पत्रे व भिंती पडुन नुकसान झाले. या दुर्घटनेत एक वयोवृद्ध महिला जखमी झाली.
 
 
ठाणे मनपाने वागळे इस्टेट, रुपादेवी पाडा येथील टेकडीवर २००९ साली बांधण्यात आलेली ७५ हजार लिटरची पाण्याची टाकी (जलकुंभ) शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास फुटल्याने हाहाकार उडाला. अचानक पाण्याचा लोंढा डोंगर उतारावरील घरांमध्ये शिरल्याने २० ते २५ घरांना या लोंढ्याचा फटका बसला.सर्वत्र चिखल आणि राडारोडा साचल्याने घरांमध्ये दलदल झाली.
 
 
पाण्याच्या प्रेशरमुळ ६ ते ७ घराचे प्रचंड नुकसान झाले. काही घरांचे पत्रे फुटले तर काही घरांना तडे गेले.ठाणे मनपा अग्निशमन दल, आपत्ती निवारण पथक, टीडीआरएफ, एनडीआरएफ आणि वागळे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत बचावकार्य केले. या दुर्घटनेत वयोवृध्द महिला तानुबाई श्रवण मुठे ( वय ७५ ) यांना दुखापत झाल्याने त्यांना लोकमान्य नगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
 
 
दरम्यान तडे गेलेल्या घरांना धोका निर्माण झाल्याने तातडीची बाब म्हणून जलकुंभा जवळचा परिसर रिक्त करण्यात आला आहे. तसेच बाधीत नागरिकांना मानपाडा येथील रेंटेल हाऊसिंग इमारतीतील सदनिकामध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची सोय करण्यात आली आहे.
 
पाण्याच्या टाकीच्या तक्रारींना केराची टोपली
  
दोन ते तीन महिन्यापासून पाण्याची टाकी लिकेज असल्याची कल्पना महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रारीद्वारे दिली होती. तेव्हा,पालिका अधिकाऱ्यांनी येथे येऊन पाहणी केली. परंतु ही बाब गांभीर्याने न घेता काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे,सुदैवाने बचावलो असलो तरी आज आम्ही आमचे मरण डोळ्यांनी पाहिले.
- संगीता रमेश शाहू ( स्थानिक नागरिक )
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121