नवी दिल्ली : चित्रपट क्षेत्रातील सर्वच विभातील कलाकारांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या ६८व्या राष्ट्रीय पुरस्काराची नुकतीच घोषणा झाली. यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार शंतनु गणेश रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला प्रदान करण्यात आला आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड सिध्दार्थ मेनन याला 'जून' चित्रपटासाठी मिळाला आहे. याचबरोबर आरोह वेलणकरच्या 'फनरल' चित्रपटास सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर तीनही चित्रपटातील कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सायली संजीव आणि सुव्रत जोशी प्रमुख भूमिकेत असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्यानंतर सायलीने एक विडिओ शेअर केला आहे, त्यात भावूक होत ती म्हणतेय, 'कामाचे चीज झाले आहे. चित्रपटासाठी मी विशेष मेहनत घेतली होती. माझ्यासाठी चित्रपट खूप स्पेशल आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळावा ही बाबांची इच्छा होती, त्यामुळे मी हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करते. खरंतर आज त्यांची खूप आठवण येतेय. मला असा एखादा मोठा पुरस्कार मिळावा अशी त्यांची खूप इच्छा होती. या चित्रपटासाठी माझ्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे.'
तर 'जून' चित्रपटाला पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ मेनन म्हणाला, 'मला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं स्वप्नवत वाटतंय. हा पुरस्कार मी आमच्या 'जून' चित्रपटाच्या संपूर्ण टीमला समर्पित करतो. तर 'फनरल' च्या यशानंतर अभिनेता आरोह वेलणकर म्हणतोय, 'आज मी खूप खुश आहे, आमच्या 'फनरल'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. याआधी हा पुरस्कार 'आनंदी गोपाळ' या मराठी चित्रपटाला मिळाला होता. या वर्षी तो 'फनरल' मिळाला. सलग दोन वर्षे सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मराठी चित्रपटांची निवड होणे ही मोठी गोष्ट आहे. या पुरस्कारामागे आमच्या संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आहे.'