निष्ठायात्रेत हाताला 'घड्याळ' आहे पण 'शिवबंधन' नाही!
22-Jul-2022
Total Views |
मुंबई : शिवसेनेतील सत्तासंघर्ष सध्या चांगलाच शिगेला पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेचा वर्चस्व वाद प्रलंबित असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत आहे. अशातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ठिकठिकाणी निष्ठा यात्रा घेऊन शिवसैनिकांना एकत्र जोडण्याचा अनोखा घाट घातलाय. दरम्यान भिवंडी आणि मनमाडच्या सभेत निदर्शनास आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरे यांनी आपल्या हाताला 'घड्याळ' बांधलेलं दिसतंय; मात्र कट्टर शिवसैनिकाचं मानबिंदू म्हणून ओळख असलेलं आणि शिवसेनेचं प्रतिक मानलं जाणारं 'शिवबंधन' त्यांनी बांधलेलं नाही.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी शिवसेनेतील बरेच मोठे नेते शिंदेगटात सहभागी झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन खूप मोठी चूक केली, असे शिंदेगटातल्या प्रत्येकाचं म्हणणं आहे. इतकंच नव्हे तर पक्षाला रामराम ठोकलेल्या नेत्यांशी बोलायचं सोडून त्यांना गद्दार, बंडखोर अशा अनेक शब्दांनी त्यांची बदनामी आदित्य ठाकरेंकडून करण्यात आली. शिवसेनेतील नेते शिंदे गटात आले असले तरी त्यांनी कधी शिवबंधन सोडलेलं नाही, हे सुहास कांदे यानी आदित्य ठाकरेंच्या सभेपूर्वी दाखवून दिले. त्यामुळे आदित्य ठाकरे शिवसेना पक्षप्रमुखांचे सुपुत्र असुनही शिवबंधन का बांधत नाही? असा प्रश्न आता पडू लागला आहे.