टिळक बाळ गंगाधर। महाराष्ट्राचा कोहिनूर। दूरदृष्टीचा सागर। राजकारणीं प्रवीण जो ॥10॥ निज स्वातंत्र्याच्यासाठीं। ज्यानें अनंत केल्या खटपटी। ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचें करुं? ॥11॥ करारी भीष्मासमान। आर्य महीचें पाहून दैन्य। सतीचे झाला घेतां वाण। भीड न सत्यांत कोणाची॥12॥ वाक्चातुर्य जयाचें। बृहस्पतीच्या समान साचें। धाबें दणाणें इंग्रजांचें। पाहून ज्याच्या लेखाला ॥13॥ कृती करून मेळविली। ज्यानें लोकमान्य ही पदवी भली। ती न कोणी त्यांना दिली। ऐसा होता बहाद्दर ॥14॥
'गजानन विजय ग्रंथ’ - आधुनिक महिपतीचे अवतार समजले जाणार्या ह. भ. प. दासगणु महाराजांनी लिहिलेली ही 21 अध्यायांची पोथी. त्यात 15व्या अध्यायात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे वर्णन आढळते. आपल्याला यातूनच टिळकांची महती कळते. जशी ही धर्म व अध्यात्मातील महती आपल्याला आढळते तशी अनेक ठिकाणी टिळकांची महती आपल्याला आढळते. अशा टिळकांची जयंती व पुण्यतिथी आपण दरवर्षी साजरी करतो. तशीच आज आपण ती साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने...
टिळक महाराजांचे आपण प्रथम स्मरण करत त्यांना वंदन करू. ’झाले बहु होतील बहु परी या सम हा’ असे मोरोपंत सांगून गेले आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे तसेच मोरोपंतांच्या उक्तीसारखे. लोकमान्यांच्या पूर्वी आणि नंतरही भारतात अनेक नेते झाले, पण त्यात लोकमान्यांचे स्थान आगळे-वेगळेच आहे.
लोकमान्य हे लेखक होते, शिक्षक होते. धर्म व अध्यात्म यावर त्यांचा गाढा विश्वास होता. टिळक तत्वज्ञानी होते, वक्ता होते, भूगोलतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ व महान गणिततज्ज्ञ होते. खगोलशास्त्र आणि ज्योतिषाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. पत्रकार व राजकीय टिकाकार होते. भाषातज्ज्ञ, व्यायामपटू व क्रीडाप्रेमी होते. द्रष्टा नेता होते. जवळपास सर्वच क्षेत्रांत त्यांचा सहभाग असे. सगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेले असे हे व्यक्तिमत्व. (भारताचा मुकूट नसलेला राजा) आपल्यासाठी ते जणू हिंदुस्थानाचे अनभिषिक्त सम्राटच होते.
टिळकांची ती सभा...
अकोल्यात एकदा शिवजयंतीचा उत्सव होता. त्यावेळी टिळकांची सभा ठेवली होती आणि गजानन स्वामी महाराजांनाही त्यात बोलावले होते. त्यावेळेस त्यांनी आशीर्वाद देत स्पष्ट सांगितले होते की, स्वातंत्र्यप्राप्ती हे सोपे नाही. टिळकांसारख्यांना तुरूंगवासही होऊ शकतो. गजानन विजय ग्रंथात टिळकांबद्दल हे लिहिले आहे. तसेच 15व्या अध्यायात टिळकांबद्दलचा पुढील उल्लेखही आढळतो-
करावयासी राष्ट्रोद्धार। योग्य बाळ गंगाधर। याच्या परी न होणार।
राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥39॥
१९०८मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला सुरू झाल्यावर दादासाहेब खापर्डे आणि कोल्हटकर हे मुंबईला जाण्यापूर्वी शेगावला गजानन स्वामी महाराजांच्या दर्शनास गेले होते. गजानन स्वामी महाराज जवळपास तीन दिवस ध्यानस्त होत निद्राधीन झाले होते. तेव्हा कोल्हटकरांनीही तेथे गजानन स्वामी महाराजांची भेट होईपर्यंत मुक्काम केला होता. निद्रेतून जागे झाल्यावर गजानन स्वामी महाराज भाकरी खाण्यास बसले व एकीकडे कोल्हटकरांशी लोकमान्यांबद्दल बोलणी केली. जेव्हा गजानन स्वामी महाराजांकडे कोल्हटकरांनी मागणे मागितले की, टिळकांवर सरकारने जो खटला भरला आहे, त्यातून लोकमान्यांची सुटका व्हावी, असा आशीर्वाद द्यावा, तेव्हा गजानन महाराजांनी जे सांगितले त्याचा उल्लेखही गजानन विजय ग्रंथात आहे तो असा-
अरे छत्रपती शिवाजीला। रामदासाचा वशिला। होता परी तो कैद झाला। बादशाही अमंलांत ॥86॥ सज्जनास त्रास झाल्याविना। राज्यक्रांति होईना। कंसाचा तो मनीं आणा। इतिहास म्हणजे कळेल ॥87॥ या भाकरीच्या बळावरी। तो मोठी करील कामगिरी। जातो जरी फार दूरी। परी न त्याला इलाज॥89॥
असे सांगत टिळकांसाठी प्रसाद म्हणून गजानन स्वामी महाराजांनी कोल्हटकरांमार्फत आशीर्वाद देत आपल्यातली भाकरी पाठवत म्हणाले, “तुम्ही अलोट प्रयत्न केले तरी यश मिळणार नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासांचा अनुग्रह होता तरी तो कैद झाला. सज्जनास त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नाही. मी ही भाकर देतो, ती टिळकांना खाऊ घाला. या भाकरीच्या बळावर तो मोठी कामगिरी करेल. (गीतारहस्यासारखे)” अध्यात्मिक ग्रंथलिखाणाचे कार्य टिळकांकडून घडेल, असेही तेव्हा त्यांनी सांगितले. टिळकांनी शेगावचा तो प्रसंग ऐकला व ती भाकरी गजानन स्वामी महाराजांचा प्रसाद म्हणून श्रद्धेने ग्रहण केली. पुढे त्यांनी ‘गीतारहस्य’सारखा अभिनव ग्रंथ लिहिला. ज्ञानी, तत्वज्ञ, ईश्वरभक्त व ‘गीतारहस्य’ लिहिणार्या टिळकांना त्यामुळे अनेक जण गुरूस्थानी मानत असत. बरेच जण त्यांचा उल्लेख आपल्या भाषणात ’टिळक महाराज’ असाही करत असत.
व्यायामप्रेमी ठिळक
हे झालं वर उल्लेख केलेल्या त्यांच्या अनेक रुपांपैकी एक रुप. तर आता आपण बघू त्यांचे अजून एक रुप. लोकमान्य टिळक हे जसे ईश्वरभक्त होते तसेच ते अत्यावश्यक असलेल्या शरीरसंपदेचेही पुरस्कर्ते होते. त्यासाठी ते स्वतः व्यायाम करत असत व इतरांनाही त्याचे महत्त्व पटवून देत. या त्यांच्या रुपाबद्दल काही कथा वाचण्याजोग्या आहेत. टिळकांनी मॅट्रिक परीक्षा देऊन डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वर्गात जाऊन बसणं, तासिकांकडे लक्ष देणे, याकडे त्यांचा कल कधीच नव्हता. पण, कुठे वादविवाद चालू असेल, तर स्वारी लगेच तिथे हजर. कॉलेजचे पहिले वर्ष तर त्यांनी शरीरप्रकृती सुधारण्याकडे दिले अगदी वेळप्रसंगी कॉलेज बुडवूनदेखील. पोहणे, मल्लखांब, कुस्ती यामध्ये त्यांनी प्राविण्य संपादन केले. म्हणूनच त्याचा फायदा त्यांना तुरुंगवासात झाला. असे हे क्रीडाप्रेमी टिळक स्वतः देशी व्यायाम व देशी खेळांचे प्रेमी होते. तसेच युवकांनी त्यात यावे यासाठी ते कार्यरतही होते हे त्यांच्यावरील लिखाणांतून/व्याख्यानांतून आपल्याला जाणवेल. टिळकांचा ज्येष्ठ मुलगा विश्वनाथ अकाली मृत्युमुखी पडला. दुसर्या क्रमांकाच्या मुलाला म्हणजे रामभाऊला फुटबॉलचे वेड होते. रामभाऊ स्वत: चांगले फुटबॉलपटू होते, पण टिळकांना आपल्या या मुलांनी (धाकटा श्रीधर) देशी खेळ खेळावेत, देशी व्यायाम करावेत असेच वाटे. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी पत्र लिहून गायकवाड वाड्यात या मुलांसाठी छोट्या तालीमखान्याची उभारणी करण्याची सूचनाही केली होती.
भांडारकरांची पानसुपारी
सा. ‘विवेक’ने मार्च 2021 मध्ये ’शतसूर्याचे तेज’ ही लोकमान्य व्याख्यानमाला आयोजित केली होती. त्यात टिळकांच्या बाबतीत ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळा’चे श्रीरंग बापट यांनी सांगितलेल्या सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर - लोकमान्य टिळक द्वयींच्या काही आठवणी वाचनीय आहेत. पुणे ही टिळकांची कर्मभूमी. टिळकांच्या आयुष्यात डोकावताना, 19-20व्या शतकाचा, सामाजिक, राजकीय अशा चळवळींचाही आढावा घेताना, टिळकांचा किंबहुना एकूणच स्वातंत्र्यलढ्याचा काळ आपण जर पाहिला तर पुण्याचे मोठे योगदान त्यात दिसून येते.
राजकारण, समाजकारण, शिक्षण, वैचारिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांचे पुणे हे त्याकाळातले एक प्रमुख केंद्र होते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. पुण्यातील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळा’चे सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि टिळक यांच्यात 19 वर्षांचे अंतर असले तरी हे दोघेही तसे समकालीनच! भांडारकरांचा जन्म दि. 6 जुलै, 1837चा तर टिळकांचा दि. 23 जुलै, 1856चा. मुळातच भांडारकर हे टिळकांपेक्षा 19 वर्षांनी मोठे. भांडारकर हे शिक्षण क्षेत्रातील होते, ते नामांकित संशोधकही होते. मुंबई विद्यापीठातील पहिल्या तुकडीचे विद्यार्थी असलेले भांडारकर हे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये कार्यरत होते, तर टिळक हे डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी होते.
डेक्कन कॉलेजमध्ये या दोघांचा परिचय होताच. पण, नंतर दोघेही एकाच विशिष्ट विषयांवर परस्पर विरोधी भूमिका घेऊनही ठामपणे उभे होते. भांडारकर हे समाज सुधारकही होते, तर टिळक हे एक प्रकारे जुन्या मतांचे समर्थन करणारे असे होते. किंबहुना, तत्कालीन समाजरचनेत काय चांगले आहे, तेवढाच भाग उचलून घेऊन बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या अशा मतांचे टिळक होते.
लोकमान्य टिळक हे ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळा’चे आश्रयदातेही होते. त्यांनी संस्थेला त्या काळातील एक हजार रुपयांची देणगी दिली होती. भांडारकरांच्या विनंतीवरुन टिळकांनी वैदिक ग्रंथावर आधारित एक लेख लिहिला होता. वेदाला समांतर असे काय-काय विचार, परंपरा असू शकतात, याचे तुलनात्मक अध्ययन कसे केले पाहिजे, यावर विचार त्यात मांडले होते. टिळकांचे आभार व्यक्त करण्यासाठी भांडारकरांनी तेव्हा पानसुपारीचे म्हणजे आजच्या भाषेत ’आयटी’चे आयोजन केले होते. तेव्हा सगळे जमलेले असताना तेथे संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी असलेले प्राच्यविद्या संशोधक डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकरही टिळकांशी वार्तालाप करत होते. तेव्हा समोरील टेकडीकडे हात दाखवत बेलवलकरांना टिळकांनी विचारले की, “ही टेकडी कोणाच्या मालकीची आहे?” त्यावर ती टेकडी संस्थेच्याच मालकीची असल्याचे उत्तर बेलवलकरांनी दिले. ‘’मग संस्थेची वास्तू तेथे वर का नाही बांधली?” अशा टिळकांच्या प्रश्नाला उत्तर देत बेलवलकरांनी टिळकांनाच प्रतिप्रश्न करत विचारले की, ‘’का? तुम्ही असे का विचारत आहात?” टिळकांचे त्यावरचे उत्तर मला खूप आवडले, ते आजही लागू पडते. टिळक म्हणाले, “हे पाहा, साधारणपणे विद्यावान लोकं व्यायाम करत नाहीत.
डेक्कन जिमखान्यापासून तो वाहनाने येईल. मग पुढे सगळा चढ व टेकडी त्यामुळे वाहनाचा काही प्रश्न नाही, तर त्यामुळे टेकडीवर जाताना तो माणूस चालतच जाईल. ही टेकडी चढतानाच त्याला व्यायाम व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, टेकडी वर उंचावर. मग असे आपण असलो तर आपण एका वेगळ्या विश्वात असतो, अशी त्याची भावना होते. अनेकदा मी सिंहगडावर जाऊन लेखन करतो. त्याचे महत्त्वाचे कारण हेच आहे की, त्या उंच ठिकाणी मोकळ्या हवेमध्ये व्यायाम चांगला झालेला असताना ज्या कल्पना सुचतात, तशा कल्पना कदाचित गावात बसून सुचत नाहीत.” त्यावर बेलवलकर म्हणाले, “हे तुम्ही म्हणता हे ठीक आहे, पण फर्ग्युसन कॉलेजच्या मागच्या बाजूला जी टेकडी आहे ती तुमच्याच मालकीची किंवा ताब्यात होती, तर मग कॉलेज तिथे वर का नाही बांधलेत?” त्यावर टिळक म्हणाले, “तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे. नियामक मंडळाच्या बैठकीत मी तसा ठराव मांडलाही होता, पण तो नापास झाला. तुम्ही हवे तर त्यावेळची आमच्या कामकाजाची लेखी नोंदवही काढून बघा. त्यात मी मांडलेला ठराव नापास झालेला असे दोन्ही दिसेल,” असा मोकळा संवाद करणारे लोकमान्य हे व्यायामप्रेमीदेखील होते, हे सिद्ध होते.
यावच्चंद्रदिवाकर। पुरुष बाळ गंगाधर।
चिरंजीव निरंतर। राहील कीर्तिरुपानें॥
संतांसारखाच कर्म, भक्ती, योग अशा व अन्य अनेक मार्गाने जीवन जगलेला आणि समाजाला मार्गदर्शक असलेला हा अवलिया युगपुरुष.गजानन विजय ग्रंथात असा उल्लेख केलेल्या लोकमान्यांना, ’या सम हा’ असलेल्या टिळक महाराजांना आपण सारे शतशः नमन करुयात.
लेखक- श्रीपाद पेंडसे
(लेखक जनजाती कल्याण आश्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे खेलकूद आयाम प्रमुख आहेत.)