मुंबई: नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटलेला ट्रक रस्त्यालगतच्या झोपडीवर उलटुन झोपडीमध्ये झोपलेली १४ वर्षीय मुलगी मधू भाटी हिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी सकाळी ठाण्याहून नाशिकच्या दिशेने निघालेला ट्रक समोरच्या वाहनाने अचानक त्याचे वाहन थांबवल्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो ट्रक रस्त्यालगतच्या झोपडीवर जाऊन उलटला. या झोपडीमध्ये झोपलेल्या १४ वर्षीय मधू भाटी हिच्या अंगावर हा ट्रक उलटला. पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूस करून मधूला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तिचा त्यापूर्वीच मृत्यू झाला.