मुंबई : धम्माल विनोदी पण तरीही भावनिक पदर असलेला महेश मांजरेकर यांचा चित्रपट 'दे धक्का' अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यामुळे 'दे धक्का'चा भाग २ देखील यावा अशी प्रेक्षक इच्छा व्यक्त करत होते. त्यामुळे महेश मांजरेकरांनी त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण केली आहे. कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी मुहूर्त मिळत नव्हता, परंतु आता येत्या ५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होत आहे. नुकताच या चित्रपटाचा धम्माकेदार ट्रेलरसुद्धा रिलीज झाला आहे.
या ट्रेलर लॉंचनंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक पोस्ट शेअर करत चित्रपटाबद्दल सांगितले आहे. पहिल्या भागातील या चित्रपटातल्या जाधव कुटुंबांचा प्रवास कोल्हापूर ते मुंबईनंतर थेट लंडनकडे सुरु झाला आहे. या ट्रेलरमध्ये जाधव कुटुंब विमानातून उतरतून एका आलीशान गाडीतून मोठ्या हॉटेलात पोहोचलेले दाखवलेले आहे. तिथे असलेल्या माणसांकडून मकरंद यांचा अपमान होतो, यावेळी 'मराठी माणसाला कमी लेखायचं नाही' असं मंकरद म्हणतात. त्यामुळे ट्रेलर मधील हे वाक्य प्रेक्षकांस सर्वाधिक आवडले आहे.
एवढेच नाही तर लंडनमध्ये पोहचलेले हे जाधव कुटुंब एका संकटात सापडले आहे. एका गुन्ह्याखाली त्यांना अटक होऊ शकते असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर येण्याची वेळ येणार असे संवादही ऐकू येतात. पण सूर्यभान जाधव मात्र सर्वांना हरायचं नाही अशी प्रेरणा देऊन उभारी देतात. त्यामुळे या संकटातून जाधव कुटुंबीय कसे बाहेर पडणार हे बघण्यासारखे आहे. पहिल्या भागात टमटम होती तर या भागात एक जुनी खटारा गाडी आहे. शिवाय लंडन मध्ये मकरंद जाधव आणि त्याची बायको सुमती, मुलगी सायली, किस्ना, धनाजी, हेमल्या आणि तात्या असे सर्वचजण प्रेक्षकांचे पुन्हा एकदा धम्माल मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.