भोपाल: मध्यप्रदेशातील आगर येथील आयुष जाडम या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याबद्दल इस्लामवाद्यांनी दि. २० जुलै रोजी हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, आयुष उज्जैन रोडवरून जात असताना १०- १२ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
एका निवेदनात आयुषने म्हटले आहे की हल्ल्यादरम्यान इस्लामवाद्यांनी नुपूर शर्माला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली. आयुष पुढे म्हणाला की काही दिवसांपासून कोणीतरी त्याचा पाठलाग करत असल्याचा संशय होता पण त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. “त्यांनी मला घेरले आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. ते म्हणत होते, ‘त्याचे तुकडे करा’. मी नशीबवान होतो की तिथून लोकांचा एक गट जात होता आणि हल्लेखोर त्यांना पाहून पळून गेले. आयुषच्या डोक्याला खोल दुखापत झाली असून त्याला सात टाके पडले आहेत. त्याला सध्या उज्जैनच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आयुषच्या एका मित्राच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वापरून दोन आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक (एसपी) राकेश सागर म्हणाले की, परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.