नवी दिल्ली : आर. माधवन लिखित आणि दिग्दर्शित नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकेट्री-द नंबी इफेक्ट’ चित्रपटावरून ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ नंबी नारायण चर्चेत आले आहेत. आर. माधवनच्या दिग्दर्शनातील पदार्पणाची सर्वत्र प्रशंसा होत असताना, अनेक डाव्या समीक्षकांनी पूजा करणार्या आणि हिंदू परंपरांचे पालन करणार्या शास्त्रज्ञाचे चित्रण केल्याबद्दल टीका केली आहे. या सर्व प्रश्नांबाबत एका मुलाखतीत नंबी नारायण यांनी आपले रोखठोक मत मांडले.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नंबी नारायण म्हणाले की, “हिंदू असणे पाप आहे का? जर मी हिंदू असेल आणि हिंदू धर्माचे पालन करत असेल तर माझ्या चरित्रातही तेच दाखवले जाईल. मी हिंदू असेल, तर फक्त हिंदूच दाखवले जाईल, शीख, मुस्लीम किंवा ख्रिश्चन दाखवता येणार नाही. मी हिंदू आहे आणि मला हिंदू असण्याची लाज वाटत नाही,” असे ठणकावतानाच, “हिंदू असणे पाप आहे का,” असा सवालही त्यांनी टीका करणार्यांना केला.
नंबी नारायण पुढे म्हणाले की, “आपण कशाबद्दल बोलत आहोत? ब्राह्मण असणे पाप आहे का? मी ब्राह्मण नाही, हा वेगळा मुद्दा आहे. पण ब्राह्मण असेल, तर त्यालाही चित्रपटातून बाजूला ठेवाल का? किती ब्राह्मण आहेत, ज्यांनी या देशाची सेवा केली. मी तुम्हाला यादी देऊ शकतो.”
मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत ते म्हणाले की, “मी नरेंद्र मोदी आणि पिनारायी विजयन या दोघांशी बोललो. दोन्ही पुरुष शीर्षस्थानी आहेत. जर माझी बाब योग्य नसती, तर हे दोघे माझ्यासोबत का आले असते? माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. पण विजयन यांनीही मला खूप साथ दिली. मी जितके जास्त सांगेन तितके कमी आहे. त्यांनी माझा खटला लांबवण्यापासून रोखले, मग मला तुम्ही डावे म्हणाल का?” नंबी नारायण म्हणाले की, “मला एवढेच सांगायचे आहे की, या प्रकरणाला विनाकारण विशिष्ट रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नरेंद्र मोदींना आपण पंतप्रधान नाही तर भाजपचे नेते म्हणतो. तुम्ही मला प्रश्न विचारू नका. कारण, तुम्ही एक प्रकारची मानसिकता तयार केली आहे की, तुम्ही मला भाजपचे लेबल लावू इच्छित आहात.”
दरम्यान, नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित ‘रॉकेट्री-द नंबी इफेक्ट’ चित्रपट दि. 1 जुलै रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही आर. माधवननेच केले आहे. एवढेच नाही, तर या चित्रपटात त्याने मुख्य भूमिकाही साकारली आहे.