चंडीगड: हरयाणामधील डीएसपी सुरेंदर सिंग बिश्नोई यांची हत्या करणाऱ्या ट्रक चालक शब्बीरला राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. बुधवार दि. 20 जुलै रोजी हरियाणा पोलिसांनी प्राथमिक आरोपी असलेल्या ट्रक चालकाला पकडले. त्याने मंगळवारी दि. १९ रोजी डीएसपी सुरेंदर सिंग बिश्नोई यांची हत्या केली होती . भरतपूर जिल्ह्यातील पहारी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गंगोरा गावात आरोपीला पकडण्यात आले.
मिळालेल्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव शब्बीर उर्फ मित्तर आहे. त्याच्या वडिलांचे नाव इसाक आहे. शब्बीरने आपला फोन बंद केला होता. आणि तो सतत त्याचे लोकेशन बदलत होता. त्याच्या ठिकाणाचा मागोवा घेण्यासाठी आणि त्याला शोधण्यासाठी दहा हून अधिक पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. अखेर भरतपूरच्या गंगोरा गावात शब्बीरला पकडण्यापूर्वी पोलिसांनी ३० हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते.
तांत्रिक साहाय्याने त्याचा माग काढणे शक्य नसल्याने अखेर शब्बीरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सूत्रे आणि माहिती देणाऱ्यांवर विश्वास ठेवला. शब्बीर आणि त्याचा साथीदार इकरार यांनी डीएसपी बिश्नोई यांना त्यांच्या ट्रकने धडक देऊन त्यांची निर्घृण हत्या केली होती. डंपरवरील क्लिनर आणि पाचगावचा मूळ रहिवासी असलेल्या इकरार याला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. हरियाणातील नूह जिल्ह्यात, ५९ वर्षीय डीएसपी सुरेंदर सिंग बिश्नोई हे बेकायदेशीर दगड खाणकामाचा तपास करत असताना त्यांना ट्रकने चिरडले.