सगुण भक्ती

    21-Jul-2022
Total Views |

ramdas
 
खरा भक्तही सगुणाची उपासना करतो आणि त्याच्या मनात त्याविषयी भ्रम असत नाही. सगुणोपासनेमागचे तत्त्व त्याने जाणलेले असते, हे ज्ञानीभक्ताचे लक्षण आहे. समर्थांना ज्ञानीभक्त अपेक्षित आहे. त्याचेच वर्णन या ४९व्या श्लोकात आहे. या ज्ञानीभक्ताला कधीही आपल्या भक्तीचा उपासनेचा गर्व अभिमान ताठा असत नाही. त्यामुळे तो भ्रमापासून दूर राहून भगवंताची सगुणोपासना मनोभावे करू शकतो.
 
 
मनाच्या श्लोकांतील क्र. ४७ ते ९६ या दहा श्लोकांतील शेवटची ओळ ‘जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा’ अशी आहे, ज्या पुरुषाने भगवंताला प्रयत्नपूर्वक जाणले, त्या कृतकृत्य झालेल्या सर्वोत्तमाच्या दासाचे वर्णन या श्लोकांतून सविस्तरपणे आलेले आहे. या दहा श्लोकांत वर्णन केलेले एकनिष्ठ भक्ताच्या अंगचे गुण समर्थांच्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे ही लक्षणे सांगताना त्या गुणांची प्रचिती स्वामींनी अनुभवली होती, ही उघड होते. काहीवेळा असेही वाटते की, समर्थ जणूकाही या श्लोकांतून आपले चरित्र उघड करून सांगत आहेत. स्वामींनी देवकारणाबरोबर राजकारणही केले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले, देह झिजवला. स्वधर्माने चालणार्‍या या महात्म्याच्या अंत:करणात नेहमी रामनाम चाललेले असे, हे आपण श्लोक क्र. ४८च्या विवरणात मागील लेखात पाहिले. आता यापुढील श्लोकांतून एकनिष्ठ भक्ताच्या अंगी असलेल्या आणखी काही गुणांचा परिचय स्वामी करुन देत आहेत.
 
 
सदा बोलण्यासारिखें चालताहे॥
अनेकीं सदा एक देवासि पाहे॥
सगुणीं भजे लेश नाही भ्रमाचा॥
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४९॥
 
 
एकनिष्ठ भक्ताचे व्यक्तिमत्त्व सर्वांगांनी विकसित झालेले असते, अशा व्यक्तीच्या ठिकाणी आत एक आणि बाहेर दुसरेच असे कधीही असत नाही, जे मनात आहे तेच तो भक्त बोलतो आणि बोलल्याप्रमाणे वागत असतो. निर्मळ अंत:करण असेल, तर असे वागता येते. तुकारामबाबाही म्हणतात की, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले.’ याचा अर्थ निर्मळ अंत:करण असलेला भक्त वंदनीय आहे, अशा भक्ताबद्दल सर्वांना आदर असतो. ‘बोेले तैसा चाले’ यासाठी महत्त्वाचे म्हणजे जे बोलायचे ते विचार करून मगच बोलावे. विचारपूर्वक बोलल्याने, त्याप्रमाणे वागण्याची जबाबदारी सहजपणे पार पाडता येते. बोलतो तसे आचारण ठेवणार्‍या माणसाचे सांगणे लोक ऐकतात, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा समाजमनावर प्रभाव असतो, समर्थांनी त्यांच्या शिष्यांना महंतांना बोलणे आणि वागणे यात एकवाक्यता ठेवायला सांगितली आहे. कारण, या महंतांना, शिष्यांना समाजात जाऊन काम करायचे आहे, बोलल्याप्रमाणे वर्तन ठेवणे, हे समाजात काम करणार्‍या पुढार्‍यासाठी अतिशय महत्त्वाचे असते.
 
 
स्वामी दासबोधात सांगतात की,
बोलल्यासारिखे चालणे। स्वये करुन बोलणे।
तयांचि वचने प्रमाणे। मानिती जनी॥ (१२.१०.३९)
 
 
अविचारी माणसाला किंवा विचारात धरसोड करणार्‍याला बोलल्याप्रमाणे चालणे अवघड जाते. विचारपूर्वक बोलणे व बोलल्याप्रमाणे आचरण असणे, याला स्वामींनी ‘उत्तमगुण’ म्हटले आहे. अशा उत्तमगुणी पुरुषाच्या भजनाने भगवंतही तृप्त होतो, असे समर्थांनी दासबोधात सांगितले आहे. इतके ‘बोले तैसा चाले’ याला महत्त्व आहे. समर्थ म्हणतात,
 
 
ऐसा उत्तमगुणी विशेष। तयास म्हणावे पुरुष।
जयाच्या भजने जगदीश। तृप्त होये ॥ (१२.१०.१५)
 
 
यापुढे निष्ठावान भक्ताची आणखी लक्षणे सांगताना स्वामींनी समन्वयाची भूमिका स्वीकारली आहे. माझेच म्हणणे बरोबर अशी उपासनेसाठी आग्रही भूमिका स्वामी ठेवत नाहीत. स्वामींचे आराध्य दैवत राम आहे. परंतु, इतर देवांना मानू नये, असे समर्थ सांगत नाहीत. त्याप्रमाणे एकनिष्ठ भक्त सर्व देवांना मानतो. कारण, सर्व देवांच्या ठिकाणी तो एकाच देवाला पाहत असतो. त्याला मनापासून वाटत असते की, कुठल्याही देवाला केलेले वंदन हे नेहमी एकाच देवाकडे पोहोचते, तथापि समाजात सगळीकडे देहबुद्धीचा विलक्षण पगडा असल्याने जो-तो आपापल्या देवाचा, आपल्या उपासनेचा अभिमान धरून असतो. माझा देव श्रेष्ठ, माझी उपासना श्रेष्ठ अशा कल्पना सोडून देणे ‘देहबुद्धीप्रधान’ माणसाला जमत नाही.
 
 
त्यामुळे तो आपल्या देवाचा उपासना पद्धतीचा अभिमान, गर्व बाळगून असतो. एकनिष्ठ भक्त मात्र अनेक देवांत एकच देव पाहतो आणि कोणतीही उपासना आपल्या देवाकडे जाते, हे त्याला माहीत असते. हिंदू समाजाचा समाजशास्त्रीय अभ्यास करताना लक्षात येते की, अनेक परंपरागत प्रथा आणि देवदेवता यांची उपासना चालू असून त्यांना हिंदू समाजाने धर्माने मान्यता दिली आहे. देवदेवतांच्याबाबतीत कसलीही मोडतोड न करता समन्वयाची भूमिका कायम ठेवून हिंदू समाजाने अनेकविध देवांत एकच देव पाहिला, हे हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणता येईल, हेे तत्त्व एकनिष्ठ भक्त पाळत असतो. त्यामुळे ‘अनेकी सदा देवासि पाहे।’ हे त्या भक्ताचे लक्षण असते.
 
 
‘कृतकृत्य’ अशा सर्वोत्तमाच्या दासाचा आणखी एक गुण म्हणजे तो ‘सगुणोपासना’ करीत असला, तरी त्याच्या ठिकाणी यत्किंचितही भ्रम असत नाही. वास्तविक पाहता सर्व संतांनी भगवंताची सगुण उपासना करायला सांगितले आहे, तथापि संतांनी अविनाशी शाश्वत ब्रह्म ओळखून सगुणोपासना केलेली असते. संतांनी अंतरंगात ब्रह्म जाणून नंतर आत्मबुद्धीने सगुणाची उपासना करायला सांगितले असते. शाश्वत ब्रह्माचे दासबोधातील वर्णन पाहिले म्हणजे ‘भ्रमविरहित सगुण’ भजन कसे असते, ते समजते. स्वामींनी दासबोधात सांगितले आहे की, बाह्य जगतातील सर्व वस्तुजात विघटनशील आहेत. कुठल्याही पदार्थाचे, वस्तूचे विघटन झाल्यावर त्या नावाची वस्तू उरत नाही.
 
 
या अर्थाने बाह्य जगतातील सर्व वस्तुजात विघटनशील आहेत. तथापि परब्रह्म अविघटनशील म्हणजे शाश्वत असल्याने त्याचा नाश संभवत नाही. संतांनी अविनाशी ब्रह्माला जाणून सगुणोपासना सांगितली असल्याने संतांच्या मनात सगुण उपासनेबद्दल कसलीही शंका नसते. खरा भक्तही सगुणाची उपासना करतो आणि त्याच्या मनात त्याविषयी भ्रम असत नाही. सगुणोपासनेमागचे तत्त्व त्याने जाणलेले असते, हे ज्ञानीभक्ताचे लक्षण आहे. समर्थांना ज्ञानीभक्त अपेक्षित आहे. त्याचेच वर्णन या ४९व्या श्लोकात आहे. या ज्ञानीभक्ताला कधीही आपल्या भक्तीचा उपासनेचा गर्व अभिमान ताठा असत नाही. त्यामुळे तो भ्रमापासून दूर राहून भगवंताची सगुणोपासना मनोभावे करू शकतो. समर्थांनी दासबोधातील समास १०.६ मध्ये भ्रमाचे नानाविध प्रकार सविस्तरपणे सांगितले आहेत. त्यात मुख्यत: अहंकार, गर्व हे भ्रमाच्या मुळाशी असतात, असा स्वामींचा अभिप्राय आहे.
 
 
देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान कुळाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान या नावभ्रम संत भगवंताच्या सगुण साकाररुपाला निर्गुण निराकाराप्रमाणे श्रेष्ठ मानतात. संतांच्या मते, भगवंत दयाळू असल्याने तो सगुण साकाररुपात भगवंताचा प्रत्यय आणून देतो आणि मग भक्ताचे सगुण रुपावर प्रेम जडते. यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात,
 
 
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव।
मी भक्त तूं देव ऐसे करी॥
 
 
 
- सुरेश जाखडी