सायकलवरून जगभ्रमंती

    21-Jul-2022   
Total Views |

mansa
 
 
 
सायकलवरून भारतभर तसेच २८ देश पादाक्रांत करणारे राजेश जयश्री राम खांडेकर या ध्येयवेड्याविषयी...
 
 
ध्येयाने झपाटलेली माणसंच इतिहास घडवतात, असं म्हटलं जातं. सायकलवरून देशाटन करणारे ठाण्यातील राजेश खांडेकर यांचा दोन चाकांवरील जिद्दीचा प्रवास अवर्णनीय आहे.
 
 
मुंबईत जन्मलेल्या राजेश खांडेकर यांचे बालपण ठाण्यातील वर्तकनगर येथे तसे हलाखीतच गेले. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वर्तकनगर येथील महापालिकेच्या शाळेत इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षणही नजीकच्या सावित्रीबाई थिराणी विद्यालयात केले. सुरुवातीपासूनच अभ्यासात विशेष रुची नसल्याने कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून एका खासगी कंपनीमध्ये ‘टूल ऑपरेटर’ म्हणून कामाला लागले. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कंपनीतील ‘अप्रेंटीशीप’ला दोन वर्ष पूर्ण होण्यास आठ दिवस शिल्लक असतानाच तब्बल ३०० किलोचा ‘जॉब’ त्यांच्या पायावर पडला. निकामी झालेल्या पायामध्ये चार इंचाचे स्क्रू बसवून पायाचे हाड जोडण्यात आले. या अपघाताने नोकरी तर गेलीच, पण काही अंशी अंपगत्वही आले. परंतु, खचून न जाता राजेश यांनी सायकल चालवण्याचा छंद जोपासला. त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी एक छोटेखानी किराणामालाचे दुकान सुरू केले.तब्बल १५ वर्षे किराणा दुकान चालवले.
वयाच्या १९व्या वर्षी १९८९ मध्ये राजेशने ठाणे ते वज्रेश्वरी हा तब्बल ६० किलोमीटरचा पल्ला सायकलने पार केला.
 
 
शहरापासून दूर अशा या सहलीने राजेशला अनोखा आनंद तर मिळालाच; त्याशिवाय प्रखर आत्मविश्वास अन् बळ प्राप्त झालं. या सहलीनंतर दोन वेळा ठाणे-शिर्डी, एकदा ठाणे-तिरुपती आणि दोन वेळा ठाणे-गोवा असा प्रवास त्यांने सायकलीवरून केला.
छोट्या छोट्या सहलीतून राजेशचा उत्साह दुणावत होता आणि १९९७ मध्ये त्याने पहिली मोठी ‘सायकल एक्स्पेडिशन’ करण्याचा निर्णय घेत भारत दौरा केला. चार महिन्यांच्या सायकल भ्रमंतीच्या कालावधीत तब्बल १३ हजार, ८०० किलोमीटरचं अंतर कापत त्याने कन्याकुमारी, चेन्नई, कोलकाता, आसाम, भूतान, अलाहाबाद, वाराणसी, दिल्ली, कुलू-मनाली, वैष्णोदेवी, चंदिगढ, अमृतसर, गांधीनगर आदी भागांची सफर केली. २००० मध्ये त्याने कारगील युद्धानंतर कारगीलमधील भागाचा ४० दिवसांकरिता सायकल दौरा केला. याच दौर्‍यादरम्यान सर्वांत उंचावर म्हणजेच १८ हजार, ३८३ फुटांवर असलेल्या खाडदुगलापास या रस्त्यावरही त्यांनी सायकल सफारी केली होती. या दौर्‍यानंतर २००७ मध्ये श्रीनगर ते चंदिगढ असा २९ दिवसांचा सायकलीवरून प्रवास केला. अनेक छोट्या सायकल मोहिमांचा अनुभव गाठीशी असलेल्या राजेशला जागतिक सायकल दौर्‍याचे वेध लागले होते अन् २००९ मध्ये सायकलवरून १६ देशांचा जागतिक दौरा केला.
 
 
‘ग्लोबल वॉर्मिंग’चा संदेश देण्याकरिता केलेल्या या जागतिक दौर्‍यात राजेशने चक्क सात महिने सायकल प्रवास केला. यात म्यानमार, थायलंड, हाँगकाँग, चीन, कोरिया, जपान, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया, जर्मनी, बेल्जियम, पोलंड, फ्रान्स, स्पेन, इटली, ग्रीस, तुर्की आदी देशांची सफर त्यांनी केली. मुंबई ते म्यानमार हा सुरुवातीचा आणि परतीचा ग्रीस ते नागपूर हा विमान प्रवास वगळता संपूर्ण प्रवास सायकलनेच केला. तब्बल १६ हजार, ८०० किलोमीटरच्या या दौर्‍यासाठी साडेसहा लाखांचा खर्च आला. मित्रमंडळींची साथ, छोटेखानी व्यवसायातले उत्पन्न आणि मलेशियाच्या महाराष्ट्र मंडळाकडून मिळणारे आर्थिक पाठबळ यांच्या जोरावर राजेश सायकलवरुन देशोदेशीची भ्रमंती करत आहेत.
 
 
२०१४-१५ साली दुसरी जागतिक मोहीम झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं एक ‘फॅब्रिकेशन शॉप’ सुरू केले असून, सध्या तिथेच काम करीत आहेत.
 
 
सायकलिंगच्या मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे श्रेय राजेश सायकलिंग गुरु आणि प्रेरणास्थान उमेश ठाकूर आणि सविता ठाकूर यांना देतात. सर्व मोहिमा आई- वडिलांचे आशीर्वाद आणि ठाकूर यांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच पूर्ण करू शकल्याचे ते सांगतात. सायकलिंग सोबत मैदानी खेळ आणि ट्रेकींगमध्ये रमणार्‍या राजेश यांचे कलेशी मात्र वावडे. मुक्या प्राण्यांबाबत ते नेहमीच भूतदया दाखवतात. सायकलच्या यशस्वी मोहिमांमुळे बर्‍याच संस्थांचे पुरस्कार मिळाले. पण, ठाणे महापालिकेचा पुरस्कार अद्याप मिळाला नसल्याची खंत राजेश व्यक्त करतात. आपल्या मोहिमा बघून अनेक सायकलपटू तयार झाले असून ते छोट्या छोट्या मोहिमा पूर्ण करीत असल्याने त्यांना समाधान वाटते.
 
 
पर्यावरण वाचवण्यासाठी सायकलिंग करा, त्यामुळे प्रदूषण कमी होऊन आरोग्यही उत्तम राहील, असा संदेश नवीन पिढीला देणार्‍या राजेश खांडेकर यांना आता ‘गिनिज’ बुकात नाव नोंदवण्याचा ध्यास लागला आहे. ८ ऑगस्टला नव्या मोहिमेवर कूच करणार्‍या राजेश यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.