कृत्रिम पाऊस आणि परकीय कट!

    21-Jul-2022   
Total Views |

jp
 
 
तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलेला दावा जरी मान्य तरीही ढगफुटी आणि पूरस्थितीमध्ये परकीय शक्तींचा हात असू शकतो का? अशाप्रकारे कृत्रिम ढगफुटी करता येऊ शकते का? या चर्चांचं एक पिल्लू सोडून राव मोकळे झाले. परंतु, देशविघातक किंवा देशविरोधी शक्तींना अशाप्रकारे कृत्रिम ढगफुटी किंवा पूरस्थिती निर्माण करता येऊ शकते का? या शक्यतेचा केलेला हा उहापोह.
 
 
दि. १७ जुलै रोजी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ढगफुटी हे परकीय शक्तींचे कारस्थान असल्याचे म्हटले होते. त्याच घटनेपूर्वी ८ जुलै रोजीच ढगफुटीची घटना उघडकीस आली होती. त्यापैकी तब्बल ४० जण बेपत्ता झाले. यातून संशयाची सुई थेट चीनकडे जाते. त्याला कारणही तसेच आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये ऑलिम्पिक सुरू होते. ही गोष्ट आहे २००८ या सालातील. चिनी हवामान विभागाने खेळांच्या दिवशीच पाऊस पडणार असल्याचे म्हटले होते. मात्र, चीनने कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून एक दिवस आधीच पाऊस पाडला होता. व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने ‘ऑपरेशन पोपॉय’ चालविले होते. त्यावेळी अमेरिकन सैन्याने ‘क्लाऊड सिडींग’द्वारे ढगफुटी घडवून आणली शत्रूसैन्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला.
 
 
एका अहवालानुसार, १९७० ते २०१६ या दरम्यान तब्बल ४६ देशांत ढगफुटीच्या घटना घडल्या. तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांच्या वक्तव्याचा सोशल मीडियावर चांगलाच समचार घेण्यात आला. अर्थातच, चंद्रशेखर राव यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पूरपरिस्थितीवरून मुद्दा भरकटवण्यासाठी असे वक्तव्य केले, हे वेगळे सांगायला नको. मात्र, ढगफुटीच्या आजवरच्या समस्यांकडे यामुळे दुर्लक्ष करता येत नाही. छोट्याशा भागात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. उदा. पॉलिथीनच्या पिशवीत पाणी भरून एकदा मोठ्या दाबाने ती फोडली तेव्हा ज्या प्रकारे पाण्याचा प्रवाह होईल, तशीच काहीशी प्रक्रिया ढगफुटीवेळी घडते. इंग्रजीत याला ’cloudbrust’ म्हटले जाते.याचे गणित आखायचे झाल्यास हवामान विभागाने केलेल्या व्याख्येनुसार, ३० वर्ग किमी भागात एका तासात १०० मिमी किंवा त्याहून जास्त प्रमाणावर पाऊस कोसळला, तर त्याला ‘ढगफुटी’ म्हटले जाते. भारत-चीन सीमावर्ती भागात ढगफुटीचे प्रमाण जास्त असल्याने राव यांनी हे वक्तव्य करून भ्रमनिर्माण करण्याचा प्रयत्न केला. कारण,मुळात चीन हा असला प्रयोग करू शकतो, हे खुद्द राव यांनाही माहिती आहे.
 
 
भारत, चीन अमेरिकेसह तब्बल ६० देशांमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे तंत्रज्ञान अवगत आहे. चीन तर या सगळ्यात आघाडीवर आहे. कित्येकदा या तंत्रज्ञानाचा वापर चीनकडून झाला आहे. वातावरणीय नियंत्रण करण्याच्या प्रयोगाचा फटका चीनलाच बसला हेदेखील वेगळे सांगायला नको. ढगांना कृत्रिमरित्या पावसामध्ये बदलण्याच्या तंत्राला ‘कृत्रिम पाऊस’ म्हटले जाते. सिल्वर डायऑक्साईड, पोटॅशियम डायऑक्साईड, सॉलीड कार्बन डायऑक्साईडची हेलिकॉप्टरद्वारे ढगांमध्ये फवारणी केली जाते. त्यानंतर हे कण हवेतून बाष्प आकर्षित करतात. त्यामुळे ढग तयार होऊन पाऊस कोसळू लागतो. ही प्रक्रिया केवळ अर्ध्या तासाची आहे. दुष्काळग्रस्त भागात पाऊस पडावा. तसेच, विमानतळ परिसर वायू प्रदुषणमुक्त करण्यासाठी हा प्रयोग केला जातो. याचा पहिल्यांदा वापर १९४७मध्ये अमेरिकेचे वैज्ञानिक विसेंट शेफर यांनी केला होता. त्यानंतर विमान, अग्निबाण, तोफांद्वारेही ढगांमध्ये कृत्रिम पावसासाठी बीजण केले जाते.
 
 
अमेरिकेने अशा प्रकारच्या कृत्रिम ढगफुटीचा वापर १९६७च्या व्हिएतनाम विरोधातील युद्धात केला. व्हिएतनामच्या चि मिन्ह शहरावर कृत्रिम पावसाद्वारे ढगफुटी निर्माण केली आणि पूरपरिस्थिती निर्माण केली. ढगफुटी झाली. अचानक पडलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. भूस्खलन झाले. यानंतर अमेरिकेने युद्धात पुढील चाल खेळली होती. दुबईतही अशाप्रकारचे प्रयोग करताना ‘इलेक्ट्रिक चार्जिंग’चाही वापर केला जातो. दुबईतील तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर २०२१ मध्ये असा प्रयोग करण्यात आला होता.
 
 
जगभरात अशाप्रकारे कृत्रिम पावसाचे प्रयोग शक्य आहेत. मात्र, तेलंगणचे मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे ढगफुटीसाठी परकीय शक्तींचा कट असण्याची शक्यता भारताच्या बाबतीत तरी कुठेही दिसली नाही!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. तीन वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन.