गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी 'धर्मवीर एक्सप्रेस' सोडा

कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साकडे

    20-Jul-2022
Total Views |
Ganeshotsav 
 
 
 
 
ठाणे : कोरोनामुळे दोन वर्ष कोकणातील सण - उत्सवाच्या जल्लोषाला मुकलेल्या चाकरमान्यांना यंदा गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. दि. ३१ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव असल्याने यंदा गावी जाण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडणार आहे. तर सर्वाधिक चाकरमानी ठाणे स्थानकांतुन प्रस्थान करण्याला प्राधान्य देतात. तेव्हा, धर्मवीर आनंद दिघे यांची कर्मभूमी असलेल्या ठाण्यातुन २९ ऑगस्टच्या मध्यरात्री 'ठाणे ते थिविम' अशी धर्मवीर एक्सप्रेस अनारक्षित गाडी सोडण्यात यावी. अशी आग्रही मागणी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
 
गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील मोठा सण असुन जणु वार्षिक महोत्सवच असतो. या काळात चाकरमानी आपल्या मुळ गावी संपूर्ण कुटुंबासह मिळेल त्या वाहनाने जात असतात. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोकणवासिय आपल्या गावच्या विविध सण-उत्सवांना मुकले होते. आता कोरोना प्रादूर्भाव घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या असुन कोविड प्रतिबंध नसल्याने चाकरमान्यांची अक्षरशः झुंबड उडण्याची शक्यता आहे.
 
 
धर्मवीर आनंद दिघे यांची कर्मभूमी असलेल्या ठाणे शहरातुन कोकणात जाणाऱ्या भाविकांची सर्वाधिक पसंती ठाणे स्थानकाला असते. तेव्हा, २९ ऑगस्ट या दिवशी मध्यरात्री ठाणे स्थानकातुन 'धर्मवीर एक्सप्रेस' नावाने अनारक्षित गाडी सोडण्यात यावी. जेणेकरून बहुतांश चाकरमान्यांना कोकणात गावी जाता येईल. अशी मागणी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाचे अध्यक्ष सुजित लोंढे, मार्गदर्शक राजू कांबळे, सचिव दर्शन कासले आदींनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.