अकालींच्या ज्ञानाचा अकाल

    20-Jul-2022   
Total Views |

atr
 
 
पंजाबमध्ये आप सरकार स्थापन केल्यानंतर शिरोमणी अकाली दल हा पक्ष पुरता बिथरला आहे. आधी शेतकर्‍यांच्या मुद्द्यांवरुन शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली. त्यानंतर मायावतींच्या बसपासोबत संधान साधत निवडणूकही लढवली. पण, त्यांच्या पदरी पराभवच पडला. भाजपशी फारकत घेऊन अकाली दल अस्तित्वाची लढाई लढत आहे.
 
 
अकाली दलाचे अमृतसरचे खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी दिवसाढवळ्या अकलेचे तारे तोडून आपल्या अज्ञानाचा परिचय संपूर्ण देशाला करून दिला. सिमरनजीत यांनी गरळ ओकत भगतसिंगांचा उल्लेख चक्क ‘दहशतवादी’ म्हणून केला. एवढ्यावरच न थांबता या साहेबांनी खलिस्तानचेही समर्थन केले. अर्थात, या महाशयांसाठी ही गोष्ट काही नवीन नाही. १९८४ पासूनच त्यांनी खलिस्तानचे समर्थन केले असून २००५ पासूनच ते भगतसिंगांना ‘दहशतवादी’ म्हणून संबोधत आहेत. “भगतसिंगांनी क्रांतिदरम्यान लाहोरमध्ये ब्रिटिश सार्जंटची हत्या केली. त्यावेळच्या ब्रिटिशांच्या अंकित असणार्‍या पार्लमेंटमध्ये बॉम्ब फेकला. हे क्रांतिकारी कृत्य नव्हते, तर दहशतवादी कृत्य होते,” अशा शब्दांत अकाली दलाच्या या खासदार महाशयांनी गरळ ओकली. खलिस्तानच्या बाजूने बोलताना ते आपले अजबगजब तर्क सांगायलाही विसरले नाही. इस्लामिक पाकिस्तानकडे, हिंदू भारताकडे आणि कम्युनिस्ट चीनकडे अणुबॉम्ब आहेत. परंतु, खलिस्तानची निर्मिती करून जर स्वतंत्र राष्ट्र तयार केले, तर ते तीनही देशांसाठी ‘बफर स्टेट’ ठरेल आणि भारत-पाकिस्तान-चीन यांच्यात कधीच अणुयुद्ध होणार नाही, असा दावा सिमरनजीत यांनी केला आहे.
 
 
२००५ साली चंदीगढ विमानतळाला हुतात्मा भगतसिंग यांचे नाव देण्यालाही त्यांनी विरोध केला होता. तत्कालीन राज्य सरकारने त्यांच्यावर खटला दाखल केला खरा, पण त्यांचा गुन्हा सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे आता भगवंत मान सरकार या वाचाळ महाशयांवर कोणती कारवाई करणार, हे पाहावे लागेल. कारण, भगवंत मान यांनी तर भगतसिंगांच्या गावी म्हणजे हुसैनीवाला येथे जाऊन शपथ घेतली होती. एकीकडे शिरोमणी अकाली दल रसातळाला जात असताना त्यांच्या खासदारांकडून केल्या जाणार्‍या अशा दिव्य वक्तव्यांमुळे पक्षाची अवस्था काय होईल, हे वेगळे सांगायला नको.
 
राजवीर की वादवीर?
 
 
 
मोदी सरकारने घोषित केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेच्या घोषणेपासूनच अनेकांच्या जळफळाटाला सुरुवात झाली होती. या योजनेत अनेक आडवाटा निर्माण करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे. योजना जाहीर झाल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शनांचा धडाका विरोधी पक्षाने लावला होता. यामध्ये सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणार्‍या नवयुवकांची माथी भडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात फारसे यश न आल्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून या योजनेविषयी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या ट्विटने पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला आहे. मोदी सरकार ‘अग्निवीर’ बनवत आहे की जातीवीर असा प्रश्न त्यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे.
 
 
त्याचप्रमाणे, राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीही ट्विट करून सैन्य भरतीत जात विचारली जात असल्याचा आरोप केला. मात्र, खरं सत्य वेगळच आहे. वाद वाढल्यानंतर स्वतः राजनाथ सिंह यांनी यावर स्पष्टीकरण दिले. आधीपासून लागू असलेल्या व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. विरोधकांनी उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार सुरू केला असून सत्य परिस्थिती जाणूनबुजून लोकांपर्यंत पोहोचवू न देण्याचा विडाच उचलला आहे. भाजपकडूनही याविषयी स्पष्टीकरण देण्यात आले असून विरोधकांचा आरोपही खोडून काढला आहे. २०१३ साली भारतीय सैन्य दलाने सर्वोच्च न्यायालयानेही याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली होती. भारतीय सैन्य दलात धर्म किंवा जातीच्या आधारावर भरती केली जात नाही. भरती प्रक्रियेत जातीचा प्रश्नच येत नाही.
 
 
अर्जात जाती-धर्माचा जो एक कॉलम असतो, तो केवळ प्रशासकीय गरजेसाठी असतो. उदा. एखादा जवान हुतात्मा झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारांसाठी जात-धर्म माहिती असणे आवश्यक असते. ज्या अरविंद केजरीवालांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्यांचा पक्ष आता या योजनेवर टीका करतो आहे. तिकडे मोदींसमोर अवघ्या चार मिनिटांचे भाषण करताना तेजस्वी यादवची तत...फफ झाली होती आणि आता हेच तेजस्वी व्यक्तिमत्व ‘अग्निवीर’ की ‘जातीवीर’ असा प्रश्न विचारत आहेत. जात-धर्मावरून भडकाविण्याचे प्रकार राजदसाठी नवे नाहीत, पण आता त्या मार्गावर आपनेही मार्गक्रमण करायला हळूहळू का होईना सुरुवात केली आहे, इतकच....
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.