'रोकेट्री' बघून अनुपम खेर यांना अश्रू अनावर

    20-Jul-2022
Total Views |

rocketry
 
 
 
 
मुंबई : नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' या चित्रपटाला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आर. माधवनने दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सिनेमात शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची भूमिका देखील आर. माधवन यानेच साकारली आहे. ज्या पद्धतीने माधवनने या सिनेमाच्या कथेचा आलेख चढता ठेवला आहे, ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे ते पाहून सर्वसामान्यांपासून बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांपर्यंत सारेच सिनेमाचे कौतुक करताना दिसत आहेत. या प्रशंसकांमध्ये बॉलीवूड स्टार अनुपम खेर यांचे नाव देखील घेतले जात आहे. अनुपम खेर यांना हा सिनेमा एव्हढा आवडला की सिनेमा पाहत असताना त्यांना अश्रू अनावर झालेत.
 
 
 
अनुपम खेर हा सिनेमा पाहिल्यानंतर ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी आर.माधवनचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये लिहिले आहे, 'नुकताच मी अभिनेता माधवनने नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित 'रॉकेट्री' सिनेमा पाहिला, सिनेमाला पाहिल्यानंतर मन शांत होईपर्यंत मी रडलो. वास्तवात हा सिनेमा खूपच असामान्य आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येक भारतीयाने सिनेमा नक्की पाहिला पाहिजे आणि नंबी नारायणन यांची प्रत्येकाने माफी मागायला हवी. यामुळे आपण इतिहासात केलेल्या चुका सुधारू शकते. ब्रावो! प्रिय मित्र माधवन!.'
 
 
 
 
 
या सिनेमासाठी आर. माधवनने नंबी नारायणन यांचा अतिशय बारकाईने अभ्यास केला आहे. प्रत्येक गोष्टीत लक्ष दिले आहे. शिवाय सिनेमाचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय अशा भूमिका त्याने पार पडल्या आहेत. शिवाय या सिनेमाचा प्रीमियर यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडला तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात चित्रपटाचे कौतुक केले.
 
 
 
rocketry
 
 
 
याचबरोबर पूर्वी एका बर्थ डे पार्टीमध्ये शाहरुख आणि आर. माधवन यांची भेट झाली होती तेव्हा, शाहरुख ने माधवनला 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' प्रोजेक्ट सोबत जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे या चित्रपटात किंग खान म्हणजेच शाहरुख खान याने देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.