वाढत धार्मिक दहशतवाद - पाळेमुळे आणि परिणाम

    02-Jul-2022
Total Views | 83

रुपाली कुळकर्णी - भुसारी
 
 
दहशतवादाचे बदलते स्वरूप
जागतिक पातळीवर दहशतवादाचे स्वरूप झपाट्याने बदललेले दिसते. आता केवळ बॉम्बस्फोट घडवून आणणे म्हणजे दहशतवाद इतका दहशतवाद हा मुद्दा सीमित नाही. विशेषत: अमेरिकेवरच्या ‘९/११’ हल्ल्यानंतर तर स्वत:हून आत्मघातकी दहशतवादी हल्ले करण्याकडे या संघटनांचा कल वाढलेला दिसतो. दहशतवाद हा विचारसरणीचा थोपवण्याचाच एक प्रकार. पारंपरिक पद्धतीप्रमाणे एखाद्या संघटनेने दहशतवाद्यांना ‘रिक्रूट’ करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि मग आपली विचारसरणी न मानणार्‍यांवर दहशतवादी हल्ला चढवणे, हा पूर्वीसारखा क्रम आता राहिलेला नाही. ज्या व्यक्तीला जिथे वाटते, तिथे तिनेच धर्मासाठी हल्ला चढवावा, ही पद्धत आता रूढ झाली आहे. म्हणजे स्वयंघोषित दहशतवादीसुद्धा तयार झालेले दिसतात. काही वर्षांपूर्वी जागतिक पातळीवर इस्लामिक राजवट प्रस्थापित करणे, हे ध्येय बाळगून अशा अनेक दहशतवादी संघटनांनी जगभरात डोके वर काढले आहे.
 
‘अल्ला’ हा आमचा उद्देश, ‘कुराण’ ही राज्यघटना, ‘पैगंबर’ हा आमचा नेता, ‘जिहाद’ हा आमचा मार्ग आहे. अल्लाहसाठी मरण पत्करता येणे, हे भाग्य आहे. या तत्त्वांवर १९२८ साली ‘मुस्लीम ब्रदरहूड’ ही संस्था इजिप्तमध्ये हसन-अल-बन्ना याने सुरु केली. ‘उम्मा’ म्हणजेच ‘जागतिक इस्लामिक बंधुत्व’ अथवा ऐक्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा होता आणि पुढे याच्याच प्रभावातून अनेक इस्लामिक दहशतवादी कारवायांनी जगाला हादरवून सोडले.
 
 
इस्लाम आणि अन्य धर्म परस्परसंबंध
सर्वंकषवाद म्हणजेच व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक घटकावर प्रभाव पाडणारी तसेच नियंत्रण आणणारी विशिष्ट विचारप्रणाली. इस्लाम धर्मात अशी रचना जास्त प्रभावी आहे. जगात इस्लामचा संघर्ष अनेक धर्मांशी असल्याचे आढळते. बहुतांश वेळा इस्लामी व्यक्ती स्वत:ची वेगळी ओळख घेऊनच वावरते.
१) इस्लाम आणि ज्यू धर्म : इस्लामच्या मते, ज्यू लोक हे शापित असून त्यांना देव कधीही मदत करणार नाही. ज्यू लोकांना कधीही राज्यात वाटा मिळणार नाही, पण तरीही ज्यूंनी इस्रायल हे राष्ट्र पॅलेस्टाईनमध्ये उभे केले. परिणामी, ते नष्ट करण्यासाठी इस्लामी देश सज्ज झाले. प्रेषित मोहम्मद पैगंबर हे जेव्हा स्वर्गात ‘रात्रीचा प्रवास’ यासाठी निघाले तेव्हा ते जेरुसलेमयेथे आले. त्या ठिकाणी आता ‘अल अक्सा’ ही मशीद उभी आहे. त्यामुळे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम असा संघर्ष तेथे आहे.
२) इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म : कुराणने मोहम्मद पैगंबरांना शेवटचा प्रेषित मानले आहे. त्या आधीचे सर्व प्रेषित म्हणजे मोझेस आणि जिझस-येशू हा काही अंतिम प्रेषित मानलेला नाही. ‘कुराण’ हा इस्लामचा अंतिम धर्मग्रंथ असून त्या आधीचा ‘बायबल’ हा त्यांनी रद्दबातल ठरवलेला आहे. कुराणने जिझसला केवळ एक ‘देवदूत’ मानलेले आहे. ‘मरियमपुत्र येशू याशिवाय काहीही नाही की, तो फक्त एक प्रेषित होता.’ (संदर्भ- ५.७५ सूरह अलमाइदा, पारा - ६, पृष्ठ क्र. २४४ दिव्य कुरआन-अटीप मराठी भाषांतर, सय्यद अबुल आला मौदूदी, इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई) ख्रिश्चन धर्माची सुरुवातच जिझसच्या क्रूसावरच्या मृत्यूपासून होते. कुराणने अ‍ॅडमपासून प्रेषित मोहम्मदांपर्यंत सलगता राखली आहे. मात्र, ख्रिश्चनांच्या मते, जिझस हाच खरा देव आहे. यातच इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या संघर्षाची बीजे आहेत.
३) इस्लाम आणि अन्य धर्म : मूर्तिपूजेला इस्लाममध्ये स्थान नाही. हिंदू हे मूर्तिपूजा करणारे असल्याने त्यांना इस्लाम विरोध करतो. देवांची मंदिरे तोडणे, मूर्तीभंजनाची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. तालिबानने बामियान येथे बुद्धाच्या मूर्ती फोडल्या होत्या. मध्ययुगात इस्लामी राज्यकर्त्यांनी शीख धर्मगुरूंना हालहाल करून मारलेले आहे.
 
 
 
जगभरात इस्लामी दहशतवादी संघटना इस्लामी व्यक्तींवर प्रभाव पाडत आहेत. इस्लामिक मूलतत्त्ववादीविचारांना आपल्या संघटनेचा पाया मानून अनेक दहशतवादी संघटना निर्माण आलेल्या आहेत. काही ठळक उदाहरणे :
१) अल कायदा-अफगाणिस्तान, पाकिस्तान.
२) इराक आणि सीरियाच्या सीमेवर इसिस - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेवांत.
३) बोको हराम- नायजेरिया.
४) हिजबुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मद, लष्कर -ए-तोयबा - भारत
५) अल शबाब -सोमालिया, केनिया आणि येमेन
यांचा प्रभाव व्हिडिओ, बातम्या, समाजमाध्यमांद्वारे तथाकथित धर्मरक्षणासाठी व्यक्तीने त्याग करण्याची आव्हाने याचा समाजावर प्रभाव पडतो.
 
 
 
इस्लामचा प्रभाव आणि लादेनचे उदाहरण
ओसामा बिन लादेनवरती कुराणचा प्रभाव होता. ‘खिलाफत’ म्हणजेच जागतिक मुस्लीम शासनाची निर्मिती करण्यासाठी नेता हा ‘अरब’ विशेषतः ‘कुरेश’ म्हणजेच प्रेषिताच्या वंशाचा हवा. मग ओसामा त्याच वंशाचा असल्याने त्याने ‘अल कायदा’चे नेतृत्त्व केले. कुराणमध्ये वर्णिल्याप्रमाणे ‘मजलिस-ए-शूरा’ म्हणजेच कौन्सिलची स्थापना केली. मोहम्मद पैगबरांनी ज्याप्रमाणे ‘हिजरत’ केले, म्हणजे मक्केहून मदिनेला स्थलांतर केले, तसेच १९९६ मध्ये ओसामा अफगाणिस्तानात आला. त्याआधी तो सुदान आणि अरेबियामध्ये सक्रिय होता. प्रेषित मोहम्मदांनी कुणाही गैरमुस्लिमाला विशेषतः ज्यू आणि ख्रिश्चनांना अरेबियामध्ये दीर्घकाळ वास्तव्य करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे अमेरिकन सैन्याची सौदी अरेबियातील उपस्थिती थेट धर्माच्या विरोधात आहे, हे ओसामा बिन लादेनला पटलेले होते. यातूनच ‘अल कायदा’च्या माध्यमातून अमेरिकेवर हल्ला झाला. कुराणातील आणखीन एक तत्त्व म्हणजे काफिरांसह राहायचे नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी इस्लाम बहुसंख्याक होत गेले, त्या ठिकाणी धर्माच्या आधारे एकत्रिकीकरण वाढले. तसेच इस्लामिक फुटीरतावादी सक्रिय झाल्याचे दिसते. कट्टर इस्लामचा धार्मिक पगडा एखाद्या व्यक्तीवर किती तीव्र असू शकतो, याचे हे उदाहरण आहे.
 
 
 
‘लोनवूल्फ’ हल्ले आणि सोशल मीडिया
एकट्याने दहशतवादी हल्ला चढवणे, यालाच ‘लोनवूल्फ’ हल्ला म्हटले जाते. व्यक्ती स्वत: मोठ्या प्रमाणात मूलतत्त्ववादी साहित्य वाचून, व्हिडिओ पाहून, भाषणे ऐकून दहशतवादी हल्ला चढवण्यास उद्युक्त होते. याचे प्रमाण वाढत आहे. यात सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे. जरी एखादी व्यक्ती दहशतवादी हल्ला चढवत असली, तरी त्यामागे मोठी धार्मिक, मानसिक, सामाजिक तसेच राजकीय प्रकिया असते. विशेषत: इंटरनेटच्या माध्यमातून समान विचारसरणीचे गट तयार होतात, वैचारिक देवाणघेवाण शक्य होते. याचा मानसिक पातळीवर मोठा प्रभाव पडत जातो. जहाल मते सहज मांडता येतात. इंटरनेटवर ‘कॉमप्रेहेन्सिव्ह एन्सायक्लोपीडिया फॉर दि प्रीप्रेशन ऑफ जिहाद’ आणि ‘बॉम्ब बनवण्याच्या कृती’सुद्धा उपलब्ध होत्या. यातून एकट्याने किंवा मित्रांसह हल्ला चढवणे सोपे झालेले आहे. संघटनेच्या मदतीशिवाय असे हल्ले चढवता येत आहेत. असे हल्ले चढवणे हे काहींना धर्मरक्षणासाठी हौतात्म्य वाटते.
 
 
 
अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि धार्मिक दहशतवाद
इस्लाम धर्मात प्रेषित मोहम्मदांच्या विरोधात व्यक्त होणार्‍यांना म्हणजेच ईशनिंदा करणार्‍यांना ठार मारण्याची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे हत्या करणारी व्यक्ती तिच्या धर्माचेच पालन करत आहे, असे तिच्यावर बिंबवले गेलेले असते. त्यात कोणताही गुन्हा आपण करत नसून केवळ आपल्या धर्माचे रक्षण करत आहोत, अशी धारणा असते. सलमान रश्दी यांना त्यांच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’, तर तस्लीमा नसरिन यांना त्यांच्या ‘लज्जा’ कादंबरीवरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर व्यक्त झाल्यावरूनसुद्धा अनेक हत्या गेल्या काही वर्षांत झालेल्या आहेत. भारताच्या बाजूला असणार्‍या राष्ट्रांमधील धार्मिक कट्टरतासुद्धा वाढत आहे. त्याचा प्रभाव भारतावर पडत आहे.
 
 
 
भारतातील वाढता इस्लामिक मूलतत्त्ववाद
उदयपूरला कन्हैयालाल यांनी सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ टाकलेल्या पोस्टसाठी त्यांची चाकूने निर्घृण हत्या केली गेली. त्यासाठी मोहम्मद रियाज अख्तारी आणि घौस मोहम्मद यांना अटक करण्यात आली. त्यांनी या हत्येचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ठार मारण्याची धमकीसुद्धा यात देण्यात आली. ही घटना ‘धर्म’ या संकल्पनेशी जोडलेली असून लोकशाहीतील ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ या संकल्पनेचा संकोच करणारी आहे. यातील मोहम्मद रियाज अख्तारी याने आपल्या मोटरसायकलला ‘२६११’ नंबर मिळावा, यासाठी नऊ वर्षांपूर्वी हजार रुपये दिल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईवरच्या २००८ मध्ये झालेल्या हल्ल्याची तारीख म्हणून ‘२६/११’ प्रचलित आहे. यातूनच त्याच्या मानसिकतेची कल्पना येते. यांचा संबंध आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी संघटना तसेच पाकिस्तानच्या ‘दावत-ए-इस्लामी’शी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. (हिंदुस्थान टाईम्स, दि. १ जुलै २०२२) घौस मोहम्मद हा २०१४ ला कराचीला जाऊन आलेला आहे. तसेच दोन्ही गुन्हेगार ‘इसिस’च्या संपर्कात होते, अशाही बातम्या येत आहेत. यातील आरोपी मोहम्मद रियाझने दि. १७ जूनला एक व्हिडिओ तयार केला होता.
 
 
 
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात बोलणार्‍याचे शिर कापण्याची धमकी त्यात होती. त्याने दि. २८ जूनला कन्हैयालालची निर्घृण हत्या केली. याचा थेट संबंध ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या तत्त्वज्ञानाशी असल्याचे दिसते. कट्टर इस्लामिक धार्मिक मानसिकता वर्षानुवर्षे कायम असून आता भारतात ती प्रभावीपणे रुजल्याचे दिसत आहे. यात-
१) वैयक्तिक नव्हे, तर धार्मिक कारणासाठी आपल्या आयुष्याला उद्ध्वस्त करण्याची हीन मानसिकता आहे.
२) व्हिडिओ चित्रीकरण करून हत्या करण्याचे पूर्वनियोजन आहे.
३) प्रसिद्धी माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा व्हावी, ही सुप्त इच्छा आहे.
४) इस्लामच्या विरोधात बोलणार्‍यांची ही अवस्था केली जाईल, ही धमकी आहे.
५) अन्य इस्लामी व्यक्तींसाठी आपल्या धर्मरक्षणासाठी दिलेली विकृत प्रेरणा आहे.
६) समाजमाध्यमांचा बिभीत्स वापर आहे.
७) धर्मग्रंथात सांगितलेली शिक्षा अमलात आणली गेली आहे.
८) धर्मरक्षणासाठी केलेल्या या कृत्याचे उघडपणे केलेले समर्थन आहे.
यातूनच या हल्ल्याची पाळेमुळे फार दूरवर आणि खोलवर गेलेली आहेत, यात शंका उरत नाही. हल्लेखोरांनी थंड डोक्याने चित्रीकरण करत एका जीवंत व्यक्तीला कापून टाकलेले आहे, ही वस्तुस्थिती भयंकर आहे. यातून हल्लेखोरांची क्रूर मानसिकता दिसून येते.
 
 
 
एकूणच, येत्या काळात धर्माच्या आधारावर असणारा दहशतवाद वाढतच जाणार आहे. लोकशाही मूल्यांना, चर्चा करून समस्या सोडवायला, मते मांडायला फारसा वावच नाही. कारण, धर्मांध दहशतीच्या पुढे कुणाच्या जीवाचीच शाश्वती उरलेली नाही!
 
 
रुपाली कुळकर्णी - भुसारी
 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121