मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरण सर्वत्र पसरले होते. या प्रकरणामुळे आर्यनची सगळीकडे कुप्रसिद्धी झाली होती. तसेच आर्यनसह शाहरुखला देखील यादरम्यान लोकांच्या टीकांचा बराच सामना करावा लागला. शिवाय आर्यन जवळपास महिनाभर तुरुंगातही होता. काही महिन्यांपूर्वी त्याला या प्रकरणाबाबत एनसीबीकडून क्लीनचिट देण्यात आली. पण आता पुन्हा एकदा त्याचा पार्टीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकताच एका क्लबमध्ये पार्टी करत असतानाचा आर्यनचा एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत तरुण मंडळींची गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीत एक मुलगा दारू पिताना यामध्ये दिसत आहे. हा मुलगा आर्यन खान असल्याचे म्हटले जात आहे. आर्यनने मास्क लावला आहे. हातात दारूचा ग्लास घेतल्यानंतर तो मास्क खाली करतो आणि पुन्हा चेहऱ्याला मास्क लावत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ आर्यनच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला. आणि ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे त्यांनी त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये #आर्यन खान असे म्हटले आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला हा मुलगा खरंच आर्यन खान आहे का? हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. पण या व्हिडीओमुळे आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
२ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर एनसीबीने टाकलेल्या छाप्यात आर्यनला अटक करण्यात आली होती. आता हे संपूर्ण प्रकरण मिटले आहे असे वाटत असताना पुन्हा एकदा या विषयाला नवे तोंड फुटले आहे. त्यामुळे आता परत एकदा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागणार आहे.