नवी दिल्ली : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी पात्र असलेल्या ६० टक्के मतदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे. सोमवारी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानासाठी मुदत असेल.
स्वच्छ, सुसंस्कृत आणि आदिवासी समाजाचे नेतृत्व अशी मुर्मू यांची प्रतिमा असल्याने त्यांना एनडीए व्यतिरिक्त झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेना या दोघांनीही आपला पाठिंबा मुर्मू यांना दिल्याने मुर्मू यांची ताकद वाढली आहे. झारखंडमधील संथाल समाजाच्या नेत्या असणाऱ्या मुर्मू यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आपला प्रवास सुरु करत, झारखंडचे राज्यपाल पदही भूषवले आहे. भाजपमधील आदिवासी समाजाच्या चेहरा असणाऱ्या मुर्मू यांच्या रूपाने देशाला दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती लाभणार आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्व खासदार आणि आमदार मतदान करीत असतात. या निवडणुकीतील मतांचे एकूण मूल्य १० लाख, ८६ हजार, ४३१ आहे. मुर्मू यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता, ६० टक्क्यांहून अधिक मते त्यांना मिळू शकतात. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विजयी झाल्यास मुर्मू या देशातील पहिल्या महिला वनवासी राष्ट्रपती ठरणार आहेत तसेच, या पदावर विराजमान होणार्या त्या दुसर्या महिला राहणार आहेत.
संसद भवन तसेच प्रत्येक राज्याच्या राजधानीतील विधानभवनात या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने मतपत्रिका, मतपेट्या आदी साहित्य सर्व राज्यांमध्ये पोहोचवले आहे. द्रौपदी मुर्मू तसेच यशवंत सिन्हा यांनी देशातील विविध राज्यांच्या राजधानीत जाऊन प्रचार केला. झारखंडच्या माजी राज्यपाल असलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला भाजपच्या नेतृत्वातील रालोआतील मित्रपक्षांशिवाय अन्य काही पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. बिजू जनता दल, बसपा, वायएसआर काँग्रेस, जनता दल सेक्युलर, तेलुगू देसम, शिवसेना तसेच शिरोमणी अकाली दलाने पाठिंबा दिला आहे.
माजी केंद्रीय मंत्री असलेले यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, सपा, डावे पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा, राज्यसभेचे खासदार तसेच, देशातील सर्व विधानसभांचे आमदार या निवडणुकीत मतदान करू शकतात. राज्यसभेतील तसेच, विधान परिषदेतील नामनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. खासदारांना हिरव्या रंगाची तर आमदारांसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका ठेवण्यात आली आहे.