नवी दिल्ली: देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा २०० कोटींच्या पुढे गेला आहे. लसीच्या मात्रांची ही संख्या लसीच्या पहिल्या, दुसर्या आणि ‘प्रीकॉशन डोस’सह आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम जानेवारी २०२१ मध्ये देशात सुरू करण्यात आली. तेव्हापासून एकूण १८ महिन्यांत भारताने २०० कोटी लस देऊन इतिहास रचला आहे. यासह भारत कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत सामील झाला आहे.
गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १६ हजार, ४७८ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे, शेवटच्या दिवशी देशातील १३ हजार, ६६५ रुग्णांचा कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. शुक्रवारी देशात १६ हजार, २८१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आणि २८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात १ लाख, ४१ हजार, ५७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सर्व भारतीयांचे अभिनंदन: पंतप्रधान
भारताने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. ‘कोविड’ प्रतिबंधक लसमात्रांचा २०० कोटींचा विशेष टप्पा पार केल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन. भारताची लसीकरण मोहीम इतक्या वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यात सहकार्य करणार्या सर्वांबद्दल मला अभिमान वाटतो. या लसीकरण मोहिमेमुळे ‘कोविड-१९’ विरोधातला जागतिक लढा आणखी मजबूत होण्यास मदत होईल. संपूर्ण लसीकरण प्रक्रियेत देशवासीयांनी विज्ञानावर आपला विश्वास दाखवला. आपले डॉक्टर, परिचारिका, पहिल्या फळीतले कर्मचारी, वैज्ञानिक, संशोधक आणि उद्योजक यांनी सुरक्षित भूमी ठेवण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या धैर्याचे आणि अथक परिश्रमाचे कौतुक करतो.