मुंबई: राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी मिळत आहे, तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, अशी भूमिका शिवसेना पक्षाकडून व्यक्त केली जात होती. १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे मुर्मू यांना मतदान केलं आहे.
दरम्यान, युवानेते आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिर केलं होत की, कोणत्याही राजकीय पक्षासोबत आमचे राजकीय मतभेद असतील तरी एक महिला उमेदवार म्हणून मुर्मू या निवडणुकीसाठी पुढे आल्या आहेत. आम्ही त्यांना जाहीरपणे समर्थन दिलं असून मतदान केलं आहे. राष्ट्रपती हे सर्व राजकीय पक्षांपेक्षा मोठे पद असते. याआधीही आम्ही प्रतिभा पाटील यांना मतदान केलं आहे. आम्ही पक्षप्रमुखांचा आदेश पाळला आहे. निकालानंतर आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून जेव्हा मुर्मू या विजयी होतील, तेव्हा या राज्यातील आदिवासी पाड्यांचा विकास होईल." असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.