नवी दिल्ली : विरोधी पक्षांकडून माजी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी आणि काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची सत्ताधारी भाजपचे उमेदवार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्याशी लढत होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांसह घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. शिवसेनेतील शिंदे गटाने जरी जगदीप धनखड यांना पाठिंबा दिला असला तरी संजय राऊत हे विरोधी पक्षांसोबत पत्रकार परिषदेत असल्याने शिवसेनेचा पाठिंबा नेमका कोणाला? याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या असलेल्या मार्गारेट अल्वा यांनी विलासराव देशमख यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी म्हणूनही काम केले आहे. याशिवाय लोकसभा, राज्यसभा सदस्यत्व, गोवा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात या राज्यांचे राज्यपालपदही भूषवले होते. उत्तराखंड राज्यचा कारभार हाती घेताना त्या उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल ठरल्या होत्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे झालेले वादंग प्रसिद्ध आहेत.