तेमजेन इमना अलांग...

    16-Jul-2022   
Total Views |

Temjen Imna Along
 
 
 
तेमजेन इमना अलांग. तुम्ही कदाचित प्रथमच हे नाव ऐकलं असेल. परंतु, नागालँडमध्ये या नावाचा प्रचंड दबदबा आहे. काही दिवसांपूर्वीच्या त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘रिट्विट’ केल्याने ते प्रकाशझोतात आले. व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी पूर्वोत्तरमधील लोकांच्या व्यथा आणि कथा अगदी मनमोकळ्या पद्धतीने मांडल्या. बारीक डोळ्यांवरून विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी त्याचे फायदे मिश्किलपणे सांगत खरे वास्तव समोर आणले. नागा लोकं माणसं खातात का, जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवरही मला नागालँड नेमके कुठे असते, तिथे जाण्यासाठी पासपोर्ट लागतो का, असे प्रश्न विचारण्यात आले, त्याबद्दलची खंतही त्यांनी आपल्या भाषणांतून बोलून दाखवली. १९९९ साली ताजमहाल पाहण्यासाठी गेल्यानंतर तिथे काऊंटरवर मी हिंदुस्तानी आहे आणि नागालँडमधून आलोय, हे पटवून द्यावे लागल्याचेही ते सांगतात. पण, सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि नागालँड आणि तेथील भाजप प्रदेशाध्यक्ष दोन्ही चर्चेत आले. भले त्यातील मुद्दे त्यांनी हसतखेळत सांगितले असले, तरीही त्यातून नागालँडसहित पूर्वोत्तरवासीयांच्या भावना आणि पूर्वीपासून झालेली हेळसांड स्पष्ट दिसून येत होती. सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलेले अलांग हे २०१८ साली अलोंग टाकी मतदारसंघातून विजयी झाले. ते नागालँड भाजपचे अध्यक्ष असून राज्य सरकारमध्ये उच्च, तंत्रशिक्षण आणि आदिवासी मंत्री आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या ते जवळचे मानले जातात. तरूणांमध्ये आणि नागालँडच्या तळागाळात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बारावी उत्तीर्ण अलांग अविवाहित आहेत. त्यांच्या पत्नीविषयी लोकांनी सर्च केल्यानंतर त्याचाही स्क्रिनशॉट त्यांनी शेअर करत अविवाहित असल्याचे स्पष्ट केले. विपरीत परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी भाजपमध्ये आपले स्थान भक्कम केले आहे. पूर्वोत्तरमधून भाजपने काँग्रेसचा संपूर्ण सफाया केल्यानंतर भारतीयांना काँग्रेसने झाकलेला आणि दाबून टाकलेला खरा पूर्वोत्तर दिसला. आसामच्या मुख्यमंत्र्यांची कार्यशैली सध्या देशभरात प्रसिद्ध आहे. अलांग यांच्या रूपाने भाजपला असा आश्वासक चेहरा मिळाला आहे. हाच काँग्रेस आणि भाजपमधला फरक म्हणावा लागेल.
 
 
असून अडचण, नसून खोळंबा!
 
येत्या सोमवारी राष्ट्रपतीपदाची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, त्याआधीच देशातील राजकीय आणि पक्षीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. ‘रालोआ’च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या प्रचंड विजय मिळवतील, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्याचे कारण म्हणजे, विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का बसला आहे. आधी एकतेच्या गप्पा मारणार्‍या विरोधी पक्षांची आघाडीच फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ममता बॅनर्जींनी पुढाकार घेऊन भाजपचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना गळाले लावले. राज्यसभेची खासदारकी हातावर टेकवत मग भाजपच्या उमेदवाराविरोधात सिन्हा यांनाच ममतांनी उभे केले. बैठकांवर बैठका घेऊन सिन्हा यांना अखेर बळीचा बकरा बनविण्यात त्या यशस्वीदेखील ठरल्या. मुर्मू यांच्या रूपाने देशाला पहिला वनवासी राष्ट्रपती मिळणार आहे. परंतु, असे असतानाही मोदीविरोध हेच ध्येय मानून पुढे जाणार्‍या विरोधी पक्षांनी एकतेची मोळी बांधली. पण, भाजपने मुर्मू यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर या मोळीचा पार चेंदामेंदा झाला. खासदारांच्या दबावामुळे उद्धव ठाकरेंनीही नाईलाजास्तव मुर्मूंना पाठिंबा दिला. तिकडे, झारखंडमधील हेमंत सोरेन यांनीही काँग्रेससोबत सत्तेत असताना मुर्मूंना पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यासोबतच बिजू जनता दल, अकाली दल, वायएसआर काँग्रेस, तेलगू देसम, जनता दल सेक्युलर यांनीही पाठिंबा दर्शवला. विशेष म्हणजे, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, तेलगु देसम आणि जनता दल सेक्युलर या पक्षांनी आधी सिन्हा यांना समर्थन दिले होते. मात्र, मुर्मू यांच्या नावाची घोषणा झाल्याने त्यांचीही गोची झाली. परिणामी, त्यांनी ममतांच्या यशवंत सिन्हा आणि काँग्रेसला वार्‍यावर सोडून दिले. सपाचे शिवपाल यादव, झारखंडच्या काही काँग्रेस आमदारांनीही मुर्मू यांना समर्थन दिले असल्याने आता मुर्मू तब्बल सहा लाखांहून अधिकचे मताधिक्य घेऊन विजयी होतील, अशी शक्यता आहे. मोदी विरोधापायी झपाटलेल्या ममतांनी यासाठी पुढाकार घेतला खरा, मात्र त्यांची अवस्था आता असून अडचण, नसून खोळंबा अशी झालेली आहे. ‘भाजपने आधीच सांगितले असते, तर आम्ही विचार केला असता,’ अशी उपरती त्यांना झाली. चांगला विधायक निर्णय घेणे सोडून, हाती असलेल्या बलाबलाचा विचार न करता आपलं हसं करून घेण्यात विरोधी पक्ष माहिर आहेत, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले..



 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.