अरे बाबा! 'त्यांना' सकाळी उठून तेच काम असतं ! मला दुसरीही कामं आहेत!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हाणला राऊतांना टोला

    16-Jul-2022
Total Views |

Shinde




मुंबई
: "संजय राऊतांच्या टीकेला उत्तर द्यायला मला वेळ नाही. त्यांना सकाळी उठून तेच काम असतं. मला सकाळी उठून दुसरीही काम आहेत. पूरपरिस्थितीचा आढावा, जनहिताचा निर्णय सर्वच महत्वाची कामे मला आहेत," असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावला आहे. मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात राऊतांनी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारत असताना त्यांनी राऊतांच्या टीकेला चोख उत्तर दिले.
 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील विमानतळ, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधीमंडळात या संदर्भातील ठराव मंजूर झाल्यानंतर केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील पूरपरिस्थितीबद्दलही चर्चा झाली. राज्यातील पूरस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच ठाकरे सरकारने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाबद्दल बोलताना ते म्हणाले, "यापूर्वी घेण्यात आलेला निर्णय हा अवैध ठरवण्यात आला होता. सरकार अल्पमतात असतानाही कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सरकारला हा निर्णय पुन्हा घ्यावा लागला.", असेही ते म्हणाले.
 
 
औरंगाबाद आता छत्रपती संभाजी नगर

ठाकरे सरकारने औरंगाबादचे नामांतरण संभाजी नगर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, फडणवीस-शिंदे सरकारने औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी नगर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.