भारतीय राजमुद्रा : सारनाथचे सिंहमुद्रा शिल्प

    16-Jul-2022   
Total Views |

currency
 
  
लेखाच्या या शीर्षकाचा संदर्भ आहे भारताच्या राष्ट्रचिन्हाचे-राजमुद्रेचे सिंहमुद्रा शिल्प. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात वर्ष २६८ ते २३२ या काळात निर्माण झालेल्या या शिल्पस्तंभाचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास आणि भूगोल फारच रंजक आहे. नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनावर राजमुद्रेच्या शिल्पाचे अनावरण करण्यात आले. त्यानिमित्ताने प्रतीकशास्त्र, रुपकशास्त्र, चिन्हशास्त्र याच्या माध्यमातून आपण शिल्प-मूर्ती-चित्र याच्या अभ्यासात, विशेषतः सारनाथ येथील शिल्पस्तंभाच्या शिखरावरील सिंहमुद्रेचा आजच्या लेखात परिचय करून घेऊया.
 
 
मौर्य साम्राज्याचा तिसरा राजा सम्राट अशोक याचे साम्राज्य आजच्या प्रचलित नकाशातील भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश अशा आशियातील विशाल भूप्रदेशावर विस्तारले होते. थायलंड-इंडोनेशिया -मलेशिया अशा पौर्वात्य देशातही बुद्ध धर्म प्रचार झाला होता. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात, सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली असलेल्या या सर्व भूप्रदेशात लहान-मोठे शीलालेख आणि शिल्पस्तंभ उभारले गेले. सम्राटाने पादाक्रांत केलेल्या भूभागाला ‘अखंड भारतवर्ष’ म्हटले गेले. या प्रदेशातील नागरिकांना शांतता, विश्वास आणि स्थैर्य देण्याचे संकेत या अशोक स्तंभांची उभारणी करून धम्मचक्राद्वारे प्रसारित केले गेले होते. आजही असे शिलालेख स्तंभ, सम्राट अशोक यांच्या अधिपत्याखाली असलेल्या तत्कालीन भूभागात अस्तित्वात आहेत.
 
 
 
 
currency
 
 
चित्र क्र १ भारताचे त्रिमीती राजमुद्रा - राष्ट्रचिन्ह
 
 
असीम-अपरिमित-अनंत अशा वैश्विक संकल्पनांना, शब्दार्थात सीमित करता येत नाही. अशा संकल्पना पार्थिव म्हणजे मर्त्य मानवाच्या समजुतीसाठी चिन्ह, प्रतीकात मांडल्या गेल्या. समृद्ध शिल्पशैलीत, मूर्तीकलेत आणि अर्थवाही चित्रशैलीत चिरंतन झाल्या, अशी वैश्विक चिरंतन चिन्ह आणि प्रतीके कधीही शब्दांसारखी (अर्थ समजल्यावर) नि:शेष होत नाहीत! ती आपल्याला कायम आव्हान देत राहातात. ‘तू समजतोयस तो अर्थ ठीक आहे, पण माझ्यात अजूनही खूप काही समजण्यासारखे शिल्लक आहे,’ असा इशारा देत राहातात. प्रतीक, रुपक, चिन्ह यामध्ये जे दिसते, त्यापेक्षा वेगळेच काही सूचित केलेले असते. चिन्हार्थ, काही वेगळाच भावार्थ, सूक्ष्मार्थ आणि गुढार्थ सांगतो. मात्र, त्यासाठी सामान्यतः वर्गीकरण शास्त्राचा (Taxonomy) अभ्यास केला जातो. या एका विज्ञानशाखेच्या छत्रीखाली, आपल्या प्रतीक, रुपक, चिन्ह संकल्पनांचे -चिन्हसंकेतांचे-चिन्हार्थांचे विश्लेषण आणि वर्गीकरण करणार्‍या, अनेक विज्ञानशाखा एकवटल्या आहेत. सारनाथ येथील शिल्पस्तंभ आणि त्यावरील चारमुखी सिंहमुद्रेची निर्मिती करताना अनेक विज्ञानशाखांचा एकत्रित अभ्यास नक्कीच केला गेला आहे. शिल्पकला-चित्रकला-स्थापत्यशास्त्र -भूगर्भशास्त्र-मृदाशास्त्र -हवामानशास्त्र-खगोलशास्त्र- प्रस्तरविज्ञान-शीलाखंडविज्ञान- प्राणिशास्त्र-प्राणी शरीर विज्ञान- शेतीविज्ञान-समाजशास्त्र अशा अनेक विज्ञान शाखांचा एकत्रित अभ्यास या शिल्पस्तंभाच्या उभारणीसाठी आवश्यक होता. मात्र, कुठल्याही काळात शिल्पस्तंभाची निर्मिती करण्यासाठी, प्राथमिक संकल्पनेची आवश्यकता असते. ते काम तत्कालीन समाजशास्त्रज्ञ आणि समाज संशोधकांवर सोपवले जात असे. याची कारणमीमांसा पाहूया.
 
 
वैशाली-नंदनगड-रामपूर्व- सांची-सारनाथ इथे सिंहमुद्रा असलेले अशोकस्तंभ आहेत. सांची आणि सारनाथ इथे स्तंभाच्या शिखरावर चार सिंहांची मुद्रा आहे. वैशाली, नंदनगड, रामपूर्व या स्तंभांच्या शिखरावर एकच सिंह अंकित आहे. संकीसा इथे शिखरावर हत्तीचे आणि रामपूर्व झेबु इथल्या शिखरावर बैलाचे शिल्प आहे. नेमक्या याच प्राण्यांची शिल्प या स्तंभांच्या शिखरावर नक्की का रचली गेली असावी, असा प्रश्न आपण आपल्यालाच विचारूया! ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात, सारनाथ शिल्पस्तंभावर चारमुखी सिंहाचे शिल्प शीर्षस्थानी स्थापन केले गेले, त्यामागे निर्मात्याची आणि संकल्पकाची नेमकी भूमिका काय असावी, या प्रश्नाचे उत्तर प्रतीकशास्त्र-रुपकशास्त्र-चिन्हशास्त्र आपल्याला देते.
 
 

currency 
 
 
चित्र क्र २ अशोकस्तंभ भारतातील भौगोलिक विस्तार
  
 
 
सारनाथ येथील या शिल्पाचे भारतीय संविधानाशी असलेले नाते आणि त्याची भारतीय पूर्वपीठिका पाहूया. दि. १५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि दि. २६ जानेवारी, १९५० या दिवशी आपले राष्ट्र प्रजासत्ताक झाले. स्वातंत्र्यानंतर दि. १५ ऑगस्ट, १९४७ मध्ये (चित्र क्र. 3) हा गव्हर्नर जनरलचा ध्वज म्हणून घोषित झाला. दि. १५ ऑगस्ट, १९७१ पर्यंत हा भारताच्या राष्ट्रपतींचा ध्वज म्हणून वापरात होता. त्याच दिवशी भारताचा तिरंगा हा राष्ट्रध्वज, राष्ट्रपतींचा संवैधानिक ध्वज म्हणून घोषित झाला.
 
 
 
currency
 
 
 (चित्र क्र ३) भारतीय गव्हर्नर जनरलचा ध्वज
 
 
 
 
या ध्वजाच्या लाल आणि निळ्या रंगाच्या दर्शनी चार भागात, प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख सांगणारी चार प्रतीके पिवळ्या रंगात अंकित केलेली आहेत. (चित्र क्र 3). राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक अर्थात सारनाथ स्तंभावारील सिंहमुद्रा, संयम आणि शक्तीचे प्रतीक असलेला अजिंठा गुंफेतील हत्ती, न्याय आणि आर्थिक स्थैर्य याचे प्रतीक असलेला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील तराजू आणि समृद्धीचे प्रतीक असलेला सारनाथ येथील कमलकलश अशी चार प्रतीके या ध्वजावर अंकित आहेत.
 
 
 
 
currency
 
 
 चित्र क्र ४ श्री दीनानाथ भार्गव यांचे राष्ट्रचिह्न रेखाचित्र
 
 
 
भारतीय राज्यघटनेच्या मूळ संहितेवर रेखाचित्र काढून सजावट करणार्‍या दीनानाथ भार्गव यांनी सारनाथच्या त्रिमिती शिल्पातील सिंहमुद्रेवरून द्विमिती राष्ट्रचिन्ह रेखाटन केले आहे. (चित्र क्र. 4) सिंहमुद्रा ज्या कमळाच्या फुलावर उभी आहे, त्याचा समावेश या द्विमिती रेखाचित्रात केला गेला नाही. दि. १५ ऑगस्ट, १९४७ या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही राजमुद्रा, हे राष्ट्रचिन्ह संविधान संमत झाले आणि वापरात आले. दि. २६ जानेवारी, १९५० या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या प्रतीकाखाली ‘सत्यमेव जयते’ हे राष्ट्रीय बोधवाक्य लिहिले गेले.
 
 
प्राचीन भारतातील भव्य मंदिरे, गोपुरे, मंदिरातील प्रवेशद्वारांच्या आणि गर्भगृहाच्या कमानी, प्राचीन हवेल्या, भव्य राजवाडे, किल्ले, शिलालेख आणि शिल्पस्तंभ आणि हजारो संस्कृत संहितांमध्ये आपल्याला दिसणारी ही प्रतीके-रुपके-चिन्ह आणि मुद्रा कित्येक शतकांपासून स्थापन झालेल्या आहेत. निखळ बुद्धिमत्ता-चातुर्य- विज्ञान या तीन भक्कम पायांवर स्थापित असलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन अशा या भौतिक शिल्पकला- मूर्तीकला-चित्रकला या माध्यमातून चिरंतन व्यक्त होत असते.
 
 
शिल्प-मूर्ती-प्रतिमा आणि दर्शक यांच्यामधील अव्यक्त आणि मूक संवाद आणि मनोव्यापार यातून आत्मिक प्रगतीचा नेमका संदर्भ मिळण्यासाठी, दर्शकाला काही कौशल्य आणि जाणिवांसह थोडासा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रतीके, रुपके, मूर्ती आणि प्रतिमेतील दर्शनी आणि अव्यक्त संकेतमूल्य याचा विचार आणि विस्ताराने चर्चा, तैत्तरीय उपनिषदामध्ये केली गेली आहे. अभ्यासाशिवाय ही प्रतीके आणि चिन्ह कोणालाही सहज दर्शनाने वाचता येणार नाहीत, उमजणार नाही. मात्र, उत्सुक अभ्यासू विद्यार्थ्याला ती निश्चितच वाचता येतील आणि उमजतीलसुद्धा!
 
 
सारनाथच्या शिल्पस्तंभ शिखरावर असलेली सिंहमुद्रा ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात का बनवली गेली आहे? त्याचा नेमका अर्थ शोधताना तत्कालीन भारतीय समाज आणि जिंकलेल्या प्रदेशातील भिन्न भाषिक-भिन्न धर्म-भिन्न संस्कृती असलेला समाज, तिथल्या लोकश्रुती, स्थानिक लोकपरंपरा यांचा विचार समाजशास्त्रज्ञांनी केला असावा. मूळ भारत भूमीतील वन्य जीवनात सिंहांची लक्षणीय उपस्थिती त्या काळात होती. याचाही नेमका अभ्यास प्राणिशास्त्रात झाला. जंगलातील पर्यावरण अन्न साखळीच्या त्रिकोणात, सर्वांत वर असणारा सिंह हा एकमेव शिकारी प्राणी आहे, जो कळपाने राहतो. वाघ-बिबट्या अशा अन्य शिकारी प्राण्यांपेक्षा त्याचे समाजजीवन वेगळे आहे. आपल्या परिक्षेत्रावरील त्यांचे सार्वभौमत्व, कुटुंब कबिल्याचे रक्षण करून ते राखून ठेवायचे कसब आणि शारीरिक क्षमता, त्यांचे धाडस, त्याचा देखणेपणा आणि राजेशाही रुबाब या त्याच्या निसर्गदत्त गुणवत्ता आहेत.
 
 
सिंहाच्या या सर्व वन्यजीवनातील व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, तत्कालीन प्रगत भारतीय समाजात झाला होता. त्याची शरीररचना, शरीरमुद्रा आणि मुखमुद्रांचा अभ्यास, शिल्पकारांनी वन्यजीवन अभ्यासकांच्या मदतीने केला असावा. कुठल्या दगडात असे कोरीव काम करता येईल आणि तसे दगड कुठे उपलब्ध आहेत, यासाठी भूगर्भशास्त्र आणि प्रस्तरविज्ञान आणि शीलाखंडविज्ञानाचा अभ्यासही नक्कीच झाला होता. त्याची उभारणी करताना या सिंहाच्या चार मुद्रा आणि त्याच्या खाली असलेल्या चार प्राण्यांच्या दिशा कुठल्या आहेत, यासाठी खगोलशास्त्राचाही आधार घेतला गेला.
 
 
प्राचीन भारतीय प्रतीकशास्त्र -रुपकशास्त्र-चिन्हशास्त्र अर्थात डूालेश्रळीा याचे, हा शिल्पस्तंभ महत्त्वाचे उदाहरण आहे. या प्रगत भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये, मानवी जीवनाची मूलभूत उद्दिष्टे, धर्म-अर्थ -काम-मोक्ष या पुरुषार्थचतुष्ट्यात मांडली गेली आहेत. ‘पुरुष’ या संज्ञेचा मूळ अर्थ शरीरात राहाणारा आत्मा असा आहे. त्यामुळे या ‘पुरुषार्थ’ संकल्पनेत स्त्रीचा अंतर्भाव आहेच. ‘पुरुषार्थचतुष्ट्य’ ही भारतीय संकल्पना, नैतिक आचरण-आर्थिक समृद्धी-सुखोपभोग आणि पारमार्थिक कल्याणाची अभिलाषा या मानवी जीवनातील चार शाश्वत घटक मूल्यांनी बनलेली आहे. कुठल्याही नैतिक मूल्य धारण करणार्‍या सुसंस्कृत समाजाची ही ओळख आहे. मुख्य म्हणजे यांत कुठलीही धर्मसंकल्पना समाविष्ट नाही. स्तंभशीर्षावरील चार दिशांच्या चार तीव्र-उत्कट सिंहमुद्रा ‘काम’ म्हणजे ‘सुखोपभोग’ या शाश्वत घटकाचे प्रतीक आहेत. ही मुद्रा ज्या पायावर संतुलित झाली आहे, ते घंटेच्या आकाराचे कमळाचे फूल हे ‘अर्थ’ या शाश्वत घटकाचे राष्ट्राच्या, समाजाच्या आणि व्यक्तीच्या आर्थिक समृद्धीचे प्रतीक आहे.
 
 
 
 
currency
 
 
 
 (चित्र क्र ५) शीर्षस्थानी धर्मचक्र अंकित झालेला, आजही सुरक्षित
 
 
 
सारनाथच्या या शिल्पस्तंभाच्या शीर्षस्थानी २४ आर्‍या असलेले हे धर्मचक्र अंकित झाले होते. मधल्या काळातील परदेशी आक्रमकांनी यातले काही शिल्पस्तंभ उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे आपल्या राजमुद्रेच्या शीर्षस्थानी आज हे चक्र दिसत नाही. मात्र, थायलंडमधील एका अशोकस्तंभावर आजही हे चक्र अंकित आहे. (चित्र क्र. 5) अर्थ आणि काम या शाश्वत मानवी मूल्यांवर ‘धर्म’ संकल्पनेतील नैतिक मूल्यांचे नियंत्रण असावे म्हणून हे धर्मचक्राचे प्रतीक, कमळाचे फुल आणि सिंहमुद्रेच्या वर स्थापन झाले. याला जरी ‘धर्मचक्र’ असे संबोधन वापरले असले तरीही याला कुठल्याही धर्म संकल्पनेशी जोडलेले नाही. शांतता, सद्भावना, प्रामाणिकपणा, सदाचरण, विचारांचे पावित्र्य, न्यायी वृत्ती या मानवी नैतिक मूल्यांचे आणि बौद्ध धर्माच्या २४ तत्वांचे हे धर्मचक्र प्रतीक आहे. सिंहमुद्रेच्या खाली चार प्राण्यांच्या शिल्पमुद्रा अंकित झाल्या आहेत. बैल-सिंह-घोडा-हत्ती या प्राण्यांची शिल्प कमळाच्या फुलाच्यावरील गोलाईवर अंकित झाली आहेत. या प्रतीकांचा संदर्भ, गौतम बुद्धाच्या जन्माशी आणि कार्यकाळाशी जोडला गेला आहे. राशीचक्रातील वृषभ राशीत सिद्धार्थाचा जन्म झाला म्हणून वृषभ म्हणजे बैलाचे रुपक अंकित झाले. बोधिसत्वाने पांढर्‍या हत्तीच्या रूपाने आपल्या गर्भात प्रवेश केला आहे असे स्वप्न, राजपुत्र सिद्धार्थ याची माता मायादेवीला तिच्या गर्भधारणेच्या वेळी पडले होते, म्हणून हत्तीचे रुपक अंकित झाले. सर्वसंगपरित्याग करून राजकुमार सिद्धार्थ त्याच्या आवडत्या कंठक या घोड्यावरून कपीलवास्तू राजधानी सोडून बाहेर पडला, त्या घोड्याचे रुपक अंकित झाले. गौतम बुद्धाने धर्मचक्र गतिमान केले त्यावेळी सिंहांनी गर्जना केल्या म्हणून सिंहाचे रुपक अंकित झाले. ही चार प्राणिशिल्पे, गौतम बुद्धाच्या जीवन काळातील आणि तत्वज्ञानातील पारमार्थिक कल्याणाच्या अभिलाषेची रुपके आहेत. या प्रत्येक प्राण्याच्या रुपकाच्यामध्ये २४ आर्‍या असलेल्या धर्मचक्राची योजना केली आहे. बुद्ध तत्वज्ञान आणि सांख्य तत्वज्ञानानुसार २४ तत्व किंवा सिद्धांताचे हे रुपक आहे. चारही दिशांमध्ये याची वृद्धी व्हावी म्हणून ही चार धर्मचक्रांची योजना आहे. मानवी समाजातील नैतिकतेचा स्पष्ट संदेश या धर्मचक्र प्रवर्तनातून चिरंतन काळ मिळत राहिला आहे.
 
 
प्रतीकशास्त्र आणि चिन्हशास्त्राचा विद्यार्थी म्हणून या भारतीय राष्ट्रीय राजचिन्हाचे विश्लेषण मांडले आहे. काही सहस्त्र वर्षांपूर्वीच्या शिल्पस्तंभाकडून, त्याच्या संकल्पनेपर्यंत पोहोचण्याचा हा अभ्यास, उलट दिशेचा प्रवास आहे. कुठल्याही चिन्हसंकेतांचे विश्लेषण हे नेहमीच तात्विक स्वरूपाचे किंवा सैद्धांतिक स्वरूपाचे (Speculative) असते, हा या चिन्हशास्त्राच्या अभ्यासातला एक नियम आहे. काही विद्वान अभ्यासकांनी या सिंहमुद्रा असलेल्या शिल्पस्तंभाच्या प्रतीकांचे, भारतीय राजचिन्हाचे विश्लेषण केले आहे. त्यात बर्‍याचवेळा मतभिन्नता आहे हे लक्षात येते. आज या राजमुद्रेच्या चिन्हसंकेतांचा अभ्यास, खास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी..!!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.