स्त्रियांचे आरोग्य आणि पर्यावरण यांची सांगड घालणारी उद्योजिका

    15-Jul-2022
Total Views |
 
 
sujata
 
 
 
स्त्रियांच्या आयुष्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळी. स्त्रीत्वाचे संपूर्ण सारच या मासिक पाळीत दडलेले आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. पण, याच मासिक पाळीच्या बाबतीत सध्याच्या आधुनिक युगातही आपण किती मागासले आहोत, हे विविध घटनांवरुन सातत्याने दिसून येते. आजच्या युगातील स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत असताना या मासिक पाळीबाबतीतली आपली हेळसांड करणारी वृत्ती स्त्रियांसमोर असंख्य प्रश्न उपस्थित करते, हे कितीही नाकारले तरी वास्तव. या मासिक पाळीसाठी अनेक आधुनिक गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे ‘सॅनिटरी पॅड्स.’ या ‘सॅनिटरी पॅड्स’च्या वापराने स्त्रियांचे आयुष्य सुकर झाले खरे. पण, हेच ‘सॅनिटरी पॅड्स’ किती आरोग्यदायी असतात? त्यांच्या वापराबद्दल खरेच जागरूकता तयार झाली आहे का? या सर्वच प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच आहेत. त्यामुळे अशा ‘सॅनिटरी पॅड्स’च्या क्षेत्रात नवीन संकल्पना आणणार्‍या आणि आरोग्यदायी आणि कुठल्याही प्रकारे हानिकारक नसणार्‍या पॅड्सची निर्मिती करणार्‍या ‘अस्मी हायजिन प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या सुजाता चव्हाण यांच्या उद्योजकीय प्रवासाविषयी...
 
 
 
सुजाता आधीपासूनच ‘सॅनिटरी नॅपकिन्स’, ‘पॅड्स’च्या क्षेत्रात ‘डीलर’, ‘वेंडर’ म्हणून कार्यरत होत्या. हे काम करताना प्रथम त्यांनी आपली कंपनी ‘प्रोप्रायटरशिप’च्या माध्यमातून ‘रजिस्टर’ केली होती. या क्षेत्रात काम करत असताना सुजाता यांच्या हे लक्षात आले की, महिला जेव्हा हे ‘सॅनिटरी पॅड्स’ विकत घेतात तेव्हा त्यांना या गोष्टींबद्दल खूपच कमी माहिती असते. या ‘पॅड्स’च्या ‘इन्ग्रेडिइंट्स’बद्दल फारच कमी माहिती असते. बरेचदा आता बाजारात मिळणार्‍या ‘पॅड्स’मुळे स्त्रियांच्या शरीरावर ‘रॅशेस’ उठतात, ‘इन्फेक्शन’ होते, असे बरेच प्रकार घडतात, ज्यामुळे स्त्रियांना त्याचा त्रास होतो. पण, बरेचदा या त्रासाकडे महिला सरसकट दुर्लक्ष करतात. त्यामुळे हे त्रास आपल्याला मासिक पाळीमुळेच होत आहेत, असेच त्या गृहीत धरतात. त्यामुळे असे प्रश्न मग पुढे जाऊन गंभीर रूप धारण करतात. बरेचदा या ‘पॅड्स’मध्ये प्लास्टिक वापरलेले असते. त्यामुळे स्त्रियांना अजूनच त्रासांना सामोरे जावे लागते. असे अनेक प्रश्न सुजाता यांनी बघितले आणि मग यावर स्वतःचा या सगळ्या ‘ब्रॅण्ड्स’पेक्षा वेगळा अत्यंत आरोग्यदायी आणि स्वच्छ असा स्वतःचा ब्रॅण्ड असावा, असे त्यांच्या मनात आले आणि हे काम फक्त एकट्यानेच जमणार नाही, त्यासाठी अनेकांचा सहभाग अपेक्षित आहे, मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. यासाठी मोठ्या पातळीवर जाणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘अस्मी’चा ‘अस्मी प्रायव्हेट लिमिटेड’चा जन्म झाला.
 
 
‘सॅनिटरी नॅपकिन्स’, ‘पॅड्स’ यांच्यामध्ये आता बाजारात जे सर्व ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत, त्यांच्या निर्मितीमध्ये सुरक्षा, स्वच्छता, आरोग्यदायी सुविधा यांचा विचार केलेला असतोच, असे नाही. फक्त मोठ्या नावाखाली आणि महागड्या किमतींमध्ये ते विकले जातात. त्यापेक्षा देशांतर्गतच बनवलेले, वापरण्यास सुलभ आणि सर्वात महत्त्वाचे जैवविघटन होणारे, असे ‘पॅड्स’ महिलांना मिळणे गरजेचे आहे, तरच महिला ते नीट प्रकारे वापरू शकतील. अशाच पद्धतीने, ‘अस्मी’चे ‘पॅड्स’ तयार गेले आहे. त्यांच्या वापरानंतर महिलांना अजिबात त्रास होत नाही. ते ‘पॅड्स’ वापरताना त्यांची द्रव शोषण्याची क्षमताही खूप जास्त असल्याने महिलांना ते प्रवासात, फिरायला जाताना, ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात काम करत असतानाही या ‘पॅड्स’चा उपयोग होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या ‘पॅड्स’च्या निर्मितीमध्ये कापूस आणि तत्सम लवकर विघटन होऊ शकणारे पदार्थ वापरले जात असल्याने हे ‘पॅड्स’ वापरून फेकून दिले, तरी त्या ‘पॅड्स’चे विघटन होते. ‘अस्मी’चा या सर्व गोष्टींमधला मुख्य हेतू म्हणजे महिलांना किफायतशीर दरात, जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचे ‘पॅड्स’ वापरायला मिळाले पाहिजेत.
 
 
 
एकवेळेसच जास्तीत जात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ‘अस्मी’ने सध्या ‘फ्रेंचाईजी मॉडेल’वर काम सुरू केले आहे. यातून या क्षेत्रात आपला एक उत्तम ‘ब्रॅण्ड’ तयार व्हावा, हा हेतू आहेच, पण त्याचबरोबरीने व्यवसाय विस्तार होणे गरजेचे आहे. कारण, या गोष्टींमध्ये एक सामाजिक भान जरी असले, तरी व्यवसाय हाही एक भाग आहे. यासाठी संपूर्ण भारतभर ‘डिस्ट्रिब्युटर्स’ची एक साखळी तयार करण्याचे काम यातून करायचे आहे. तसेच या माध्यमातून शेवटच्या थरांतील स्त्रियांपर्यंत हे असे चांगल्या प्रतीचे ‘प्रॉडक्ट’ पोहोचावे आणि त्यांच्यापर्यंत या गोष्टींबद्दलची माहिती पोहोचावी, असा प्रयत्न आहे. तसेच या क्षेत्रात ज्या कुठल्या सामाजिक संस्था कार्यरत आहेत, तसेच शासनाच्या माध्यमातूनही या गोष्टींच्या प्रसारासाठी खूप काम चालू आहे, त्यांच्यापर्यंत हे ‘प्रॉडक्ट’ पोहोचवायचे आहे.या सगळ्यांचा माध्यमातून सातत्याने लोकांपर्यंत चांगले ‘प्रॉडक्ट’ पोहोचवणे तितकेच लोकांच्या मनात याबद्दल जागरूकता निर्माण करणेही महत्त्वाचे आहे आणि हेच या माध्यमातून आपले ध्येय आहे, असे सुजाता सांगतात.
 
 
 
या क्षेत्राकडे खरोखरीच गांभीर्याने बघायची गरज आहे. आजच्या आधुनिक युगात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात समान काम करत आहेत. पण अशा पद्धतीने काम करत असताना त्यांच्या आरोग्याचा विचार किती केला जातो, हा गंभीर प्रश्न आहे. आजही मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्रासालाच सामोरे जावे लागते. त्यांना त्यांचे ‘पॅड्स’ बदलण्यासाठी पुरेशी सोय नसते. त्यामुळे त्यांना ते कुठेतरी टाकावे लागतात.
 
 
बाहेरही प्रवास करताना सार्वजनिक शौचालयांमध्ये ज्या पद्धतींच्या वाईट दर्जाच्या सुविधा असतात, त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांना घरात, तसेच बाहेरही या संपूर्ण मासिक पाळीच्या काळात त्रासच सहन करावा लागतो. हे चित्र बदलायचे असेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना महिलांचाही विचार व्हावा, त्यांचेही आरोग्य महत्त्वाचे आहे आणि त्यातून त्यांना तो त्रास होतो, ही जाणीव खूप महत्त्वाची आहे आणि आपणच यासाठी पुढाकार घेतला, तरच हे चित्र बदलणार आहे. सामाजिक संस्था असतील किंवा शासकीय यंत्रणा सगळीकडेच स्वस्त दरात जास्तीत जास्त ’प्रॉडक्ट’ वाटणे, हाच हेतू ठेवून काम चालते.
 
 
 
हे चित्रही बदलणे गरजेचे आहे. आपण किती देतो, यापेक्षाही काय दर्जाचे देतो, हा विचार असणे गरजेचे आहे. हाच विचार स्त्रियांच्या एकूणच सर्व प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, असे मत सुजाता व्यक्त करतात.स्त्रियांच्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर काम करून त्यातून फक्त व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जबाबदारीसुद्धा सांभाळत एक मोठा दृष्टिकोन समोर ठेवत काम करणार्‍या सुजाता चव्हाण यांचे काम खूप महत्त्वाचे आहे.
 
 
 
 - हर्षद वैद्य