आय२यु२मध्ये भारत मध्यवर्ती

    14-Jul-2022   
Total Views |

I2U2
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या केंद्रीय सत्तापदी आल्यापासूनच राष्ट्राला परम वैभवाला नेण्यासाठी, राष्ट्राचे जागतिक पटलावरील वर्चस्व अधिकाधीक मजबूत करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. वेगवेगळ्या देशांबरोबर वेगवेगळ्या गटांची स्थापना करुन भारताला शक्तीशाली करण्याची नरेेंद्र मोदींची योजना आहे.
 
 
नुकताच भारत आय२यु२ या शक्तीशाली गटात सहभागी झाला असून त्या माध्यमातून भारताची जागतिक पत प्रतिष्ठा आणखी वाढणार आहे. भारताने नुकतीच अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीबरोबर (युएई) संयुक्तपणे एका नव्या क्वाडची स्थापना केली असून त्याला आय२यु२ असे नाव देण्यात आले आहे. या नव्या क्वाडमध्ये आय२ चा अर्थ भारत आणि इस्रायल असून यू२ चा अर्थ अमेरिका आणि युएई असा आहे. या गटाला पश्चिम आशियाचा क्वाड गट म्हटले जात आहे. या क्वाडमध्ये भारताची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. गुरुवारी आय२यु२ या नव्या क्वाड गटाची पहिली आभासी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात या गटातील देशांचे शीर्षस्थ नेतृत्व एकत्र आले. आय२यु२च्या पहिल्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, इस्रायलचे पंतप्रधान यायर लापिड आणि युएईचे राष्ट्रपती मोहम्मद बिन यांनी भाग घेतला. आय२यु२ गट पाणी, ऊर्जा, परिवहन, अवकाश, आरोग्य आणि खाद्यान्न सुरक्षेसारख्या सहा परस्परांशी संबंधित क्षेत्रांमध्ये संयुक्त गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार आहेत.
 
 
आय२यु२ गटाच्या पहिल्या बैठकीचे आयोजन चालू आठवड्यात केले असले तरी या गटाचा पाया गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातच घातला गेला होता. त्यावेळीही भारत, इस्रायल, अमेरिका आणि युएईच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या बैठकीत भाग घेतला होता. भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बैठकीत भाग घेण्यासाठी इस्रायलला गेले होते. त्यावेळी या गटाला इंटरनॅशनल फोरम फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन नाव देण्यात आले होते. त्यावेळी बैठकीत सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्टर आणि परिवहनासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात आय२यु२ गटाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे, या गटाच्या माध्यमातून चारही देशांचे संबंध अधिक प्रगाढ होतील. भारताच्या दृष्टीने पाहिले तर आय२यु२ गट अतिशय महत्त्वाचा म्हटला पाहिजे. एका प्रकारे भारत या गटात नेतृत्वाची भूमिका निभावताना पाहायला मिळू शकते. कारण आय२यु२मधील उर्वरित तीन देशांशी भारताचे संबंध अतिशय उत्तम आहेत. अमेरिकेनेदेखील म्हटले की, आय२यु२मध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तर इस्रालयच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी, भारत नव्या देशांमध्ये आणल्या जाणार्‍या अब्राहम कराराचा परिघ वाढवण्याची सहकार्य करु शकतो, असे विधान केले होते. आय२यू२ची स्थापना वैश्विक हित लक्षात घेऊन करण्यात आल्याचेही ते म्हणाले होते. इस्रायल आणि युएईमध्ये धोरणात्मक सहकार्याची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. भारताची भूमिका युरोप आणि इस्रायलदरम्यान एका सेतुसारखी असून दोघेही भारताचे व्यापारी भागीदार आहेत.
 
 
भारतासाठीही आय२यू२ गटात भाग घेणे महत्त्वाचे आहे. कारण, एका बाजूला पाताळयंत्री चीन आशियात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी छोट्या देशांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे. अशात भारताने जगात आपले वर्चस्व मजबूत करणे अत्यवश्यक ठरते. दुसरीकडे सध्याच्या परिस्थितीत अरब नाटोच्या चर्चा होत आहेत. इराणबरोबरील तणावात पश्चिम आशियात एका नव्या एअर डिफेन्स अलायन्सच्या स्थापनेची तयारी सुरु आहे. नव्या गटाला मिडल ईस्ट एअर डिफेन्स अलायन्स असे नाव देण्यात आले आहे. अमेरिका या गटाचे नेतृत्व करेल, आणि यात इस्रायल, युएई, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि इजिप्तसारखे देश सहभागी होऊ शकतात. अरब नाटो प्रत्यक्षात येण्याच्या आधी भारत पाश्चात्य देशांमध्ये आय२यु२ माध्यमातून स्वतःला शक्तीशाली करु शकतो. कारण, आय२यु२मध्ये इस्रायल आणि युएई सहभागी असून हे दोन्ही देश अरब नाटोतही भाग घेऊ शकतात. तर भारताने याआधी अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाबरोबर क्वाड गटात भाग घेतला आहे. याव्यतिरिक्त चीन, रशिया आणि ब्राझीलसारख्या देशांचा सहभाग असलेल्या ब्रिक्समध्ये भारताची भूमिका महत्त्वाची मानली जाते. आता पाश्चात्य देशांबरोबरील या नव्या सहकार्याने भारत पाश्चात्य देशांसमोरही मजबूत होऊ पाहत आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.